30 September 2020

News Flash

कौतुक

माणूस लहान असताना अत्यंत निरागस असतो आणि मोठा झाल्यावर तो निर्दयी होत जातो,

‘‘माझं नाव कौतुक.’’

या त्याच्या पहिल्या वाक्यातच मी मनोमन म्हटलं होतं, ‘हा गिऱ्हाईक आहे!’

त्यावेळी तो जेमतेम साडेपाच फूट उंच होता. आजही तितकाच आहे. केसांचा मधून भांग पाडलेला. भारतनाटय़म डान्सर्स जसे डोळे मोठे करून हातांनी नानाविध मुद्रा करतात तसे हातवारे करत बोलायची त्याची सवय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवाजातला आणि हावभावांतला बायकी नाजूकपणा. ही सगळी त्याच्या ‘गिऱ्हाईक’पणाची लक्षणं होती.

माणूस लहान असताना अत्यंत निरागस असतो आणि मोठा झाल्यावर तो निर्दयी होत जातो, अशी एक सर्वमान्य समजूत आहे. पण मला नेहमी उलटं वाटतं- शाळकरी मुलांइतकी निर्दयी जमात जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. आठवीच्या वर्गात असताना ‘एल’चा उच्चार ‘यल’ आणि ‘एम’चा उच्चार ‘यम’ करणाऱ्या एका नवीन, शिकाऊ शिक्षिकेला आम्ही हाफ चड्डी घालणाऱ्या मुलांनी वर्गात रडवलं होतं.

‘बाहेरच्या जगात पाऊल ठेवू पाहणाऱ्या शाळकरी मुलांना उपदेश’ म्हणून आमच्या शाळेत कधी कधी काही वक्ते बोलावले जायचे. ‘चुकूनही या शाळेची पायरी पुन्हा चढू नका..’ असा उपदेश ते नंतर इतरांना देत सुटतील याची चोख व्यवस्था अशा वेळी आम्ही आमच्या वागण्यानं करून ठेवायचो. ‘ढापण्या’, ‘चकण्या’, ‘जाडय़ा’, ‘काण्या’, ‘काळ्या’ या विशेषणांचं विशेषनामात रूपांतर करून आपण एखाद्याच्या भावना दुखावतो आहोत असं आम्हाला कधीच वाटलं नाही.

अशा आम्हा गिधाडांच्या हाती कौतुकसारखं वासरू सापडल्यावर त्याची गत काय विचारता! कौतुकला चिकटायचं ते ऑबवीयस विशेषण अडीचाव्या मिनिटाला चिकटलं होतं.. ‘बायल्या’! त्यात त्याला पहिल्यांदा अशी हाक मारण्यात आल्यानंतर तो ओठ पुढे काढून रडला होता. मग आम्ही कशाला सोडतोय? एखाद्याच्या पाठीत जोरात गुद्दा हाणायचा आणि वर त्याला ‘लागतंय?’ असं विचारायचं. आणि तो ‘हो’ बोलला की ‘लागतंय मग अजून घे,’ असं म्हणत तितकाच जोरात गुद्दा पुन्हा हाणायचा; अशा विचारसरणीत आमचं संगोपन झालेलं. चिडवल्यावर रडणाऱ्याला आम्ही कशाला सोडतोय? मग कौतुकशी बोलताना मुद्दाम मुलीसारखा आवाज काढून बोल, ट्रिपला गेलेलो असताना मुद्दाम ‘लेडीज’ लिहिलेल्या पाटीकडे बोट करून त्याला तिथे जायला सांग, तो वर्गात आल्यावर उगीच ‘मेरे हाथों में नौ-नौ चुडियाँ है’ हे गाणं मोठमोठय़ानं म्हण- असा सगळा बाष्कळपणा आम्ही सततच करत असू. माणसाचा स्पर्श झालेल्या कावळ्याला इतर कावळे टोचतात, अशी एक समजूत आहे. कौतुकशी आमचं वागणं सुरुवातीच्या काळात तसंच होतं.

पण हळूहळू एखाद्याला छळण्याचाही आपल्याला कंटाळा येतो. कौतुकच्या बाबतीत आमचं तेच होत गेलं असावं. पहिल्यांदा तो शाळेच्या गायन स्पर्धेत पूजा भटवर चित्रित झालेलं ‘ओ मेरे सपनों के सौदागर’ हे ‘दिल है की मानता नहीं’ चित्रपटातलं गाणं गायला तेव्हा आम्ही त्याला ‘श्रीदेवी’ असं नाव बहाल केलं होतं. पण जशी र्वष सरली तशी कौतुकच्या स्त्री-स्वरातल्या गाण्यांची आम्हाला सवय झाली.

‘‘मी काय करणार होतो रे? माझ्या घरी मी आणि बाबा सोडलो तर आई, ताई, मोठी ताई, आत्या अशा सगळ्या बायकाच बायका. सो.. मी बोलतो थोडा त्यांच्यासारखा.’’

‘‘थोडा! अरे, कुणी डोळे बंद करून जर तुझं बोलणं ऐकलं तर असं वाटेल, की मुलगीच बोलतेय.’’

‘‘सो वॉट?’’ कौतुक उसळला, ‘‘पुरुषी आवाजाच्या बायकाही असतात. नेहमी मुलांचेच कपडे घालणाऱ्या बायकाही असतात. मिशा असलेल्यासुद्धा बायका असतात. त्यांना कधी कुणी रिडीक्युल नाही करत ते! अ‍ॅण्ड एफ. वाय. आय मी गे नाहीये.’’

‘‘नक्की?’’ मी विचारलं. यावर त्यानं मला जूही चावलासारखं गाल फुगवून लटकं रागवून दाखवलं. म्हणाला, ‘‘मला मुली आवडतात.’’

‘‘हा! आता मुलींना तू आवडतोस का बघायला हवं.’’ मी समोरची कोकची बाटली तोंडाला लावत म्हणालो. इथे कौतुकनं माझ्या दंडावर एक मोहक चापट मारली.

हा आमचा संवाद तसा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला होता. पण एकदा आमच्या एका मित्राच्या घरी होळीच्या पार्टीत दोन पेग डाऊन झालेल्या कौतुकनं त्याच्या अंतरीचा अत्यंत दुखरा कप्पा माझ्यासमोर उघडला होता.

‘‘माय डॅड ऑलवेज हेटेड मी. म्हणजे तसं कधी बोलले नाहीत ते. बट देन ते माझ्याशी कधी बोललेच नाहीत. एकदा ममला भांडणात म्हणाले होते, ‘उपयोग काय मुलाचा? त्याला बाईच बनवून ठेवलंयस तू.’

तुला माहित्ये- त्यानंतर मी आठ-दहा दिवस जिमला जाऊ लागलो. म्हटलं, इफ माय डॅड वॉन्टस् मी माचो.. आय विल बी माचो!’’

‘‘मग?’’ मी विचारलं.

‘‘आपण जसे नाही तसे होण्याचा प्रयत्न केला तर काय होतं आपलं? आठवडाभरात सोडली जिम. फिटनेससाठी दीड तास बॅडमिंटन खेळतो मी रोज. निर्बुद्धासारखी वजनं कसली उचलत बसायची?’’

‘‘बट आय अ‍ॅम शुअर.. आज त्यांना अभिमान वाटत असेल तुझा.’’ तेव्हा कौतुक एका मोठय़ा कंपनीचा व्ही. पी.- फायनान्स होता. त्यानं फक्त खांदे उडवले आणि तो पुन्हा ग्लास भरायला निघून गेला.

शेफाली त्याला ट्रेनमध्ये भेटली! महिना पाच आकडी पगार घेऊनही कौतुक तेव्हा ट्रेननंच प्रवास करत असे. ‘‘मी तासन् तास त्याच त्याच गाडीचा नंबर बघत गाडी नाही चालवू शकत बाबा!’’ भर हिवाळ्यात निर्मात्याकडे आइस्क्रीमसाठी हट्ट धरून बसणाऱ्या हीरॉइनच्या मम्मीसारखा चेहरा करत कौतुक म्हणाला होता.

त्या दिवशी घाईनं ट्रेन पकडण्याच्या नादात शेफालीचा लेडीज डबा चुकला होता. ऐन गर्दीच्या वेळी ती जेन्ट्समध्ये शिरली होती.

‘‘माझी वाट लागली होती. एक तर मी मुंबईत नवीन. त्यात जेन्ट्स डब्यात चढले. काखा वर केलेली माणसं आपल्यावर रेलतायत.. कुणाच्या तोंडाला गुटख्याचा वास येतोय.. कोणी उगीचच आपल्याकडे रोखून बघतंय. अशात हा समोर उभा होता- कानात इअरफोन घालून. ही वॉज नॉट इन धिस वर्ल्ड.’’ शेफाली त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल मला एकदा सांगत होती.

मग कधीतरी कौतुकचं लक्ष समोर अवघडून उभ्या असलेल्या त्या मुलीकडे गेलं होतं आणि त्यानं सहजच तिला हात दिला होता. तिनं त्या अनोळखी मुलाचा हात धरला आणि दुसऱ्याच सेकंदाला ती दरवाजाच्या बाजूला पार्टिशनला टेकून सुरक्षित उभी होती. काही सेकंदांच्या त्या स्पर्शानं दोघांचं आयुष्यभराचं नातं जुळलं होतं.

‘‘मला माहित्ये- माझ्या मैत्रिणी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटतात तेव्हा आमची पाठ वळल्या वळल्या त्या कौतुकची मस्करी करतात. माझी खिल्ली उडवतात. पण बॉल्स टू देम! आय हॅव बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्डस्! हो. माझा नवरा बाईसारखा विचार करतो. आणि एका बाईसाठी हा किती मोठा आधार आहे, हे त्यांना नाही कळत.’’

कौतुक आणि शेफालीला आज दोन मुली आहेत. एकदा मला सकाळी सकाळी कौतुकनं फोन केला. ‘‘बोका आणलाय मी घरी. बाबा गेल्यानंतर आणि या पोरी झाल्यानंतर पुरुषांची संख्या खूपच घटली होती घरात. अ‍ॅण्ड आय नो युवर नेक्स्ट जोक यू सिक बगर.. पुरुषांची संख्या कमी नव्हती झाली; संपलीच होती. कारण तूही बाईच आहेस. बट आय केअर अ डॅम!’’

पुढे तो त्याच्या बोक्याचं कौतुक करत राहिला. मी काहीच नाही बोललो. मला त्याला सांगायचं होतं- ‘मित्रा, तुझ्याचमुळे मी असे शेलके विनोद करायचे सोडून दिलेत.’

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2017 2:11 am

Web Title: chinmay mandlekar article on friend kautuk
Next Stories
1 इनाम उल हक (भाग २)
2 इनाम उल हक (भाग १)
3 हलवाई
Just Now!
X