16 January 2021

News Flash

कोमल

कोमल नाटकाबिटकातली अजिबातच नव्हती.

‘‘च्यायला! काय पण नाव ठेवलंय आई-बापानं. नावातच विकेट काढलीय माझी.’’ ती कॉफीचा रिकामा मग बोटानं गरागरा फिरवत म्हणाली.

‘‘का? चांगलं आहे की नाव. खूप कॉमन वगैरे आहे. पण वाईट काय आहे? प्लीज- तो मग असा फिरवायचा थांबव. फुटला तर भरून द्यावा लागेल.’’

‘‘प्रश्न कॉमनचा नाहीये. पण मुळात ‘कोमल’ या नावातच एक वीकनेस आहे. खूप बायलं नाव वाटतं मला तर.’’ मग आता जवळजवळ भोवऱ्याच्या वेगानं गरगरू लागला होता.

‘‘फॉर युवर काइंडेस्ट इन्फर्मेशन तू बाईच आहेस. म्हणजे आता ‘मुलगी’ या कॅटेगरीत आहेस. ‘बाई’ होऊ घातलीयस.’’

‘‘तुला काय माहीत? मी ऑलरेडी बाई झालेलीही असेन!’’ इथे क्षणभरासाठी माझी नजर मगवरून हटली. माझ्या मध्यमवर्गीय डोळ्यांनी चमकून कोमलकडे पाहिलं. ती भुवया उंचावून मला चिडवत होती. आणि तोच तो क्षण होता! थोरामोठय़ांनी म्हटलंच आहे- ‘नजर हटी, दुर्घटना घटी.’ त्या एका क्षणीच गरगरणारा तो मग तिच्या बोटातून सटकून थेट कॉफी शॉपच्या फरशीवर जाऊन आदळला आणि त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. मी कपाळाला हात मारला. दुसऱ्याच क्षणी कॉफी शॉपचा वेटर पोलिसासारखा हजर झाला. ‘‘कप फुट गया.’’ वेटर महाशय उद्गारले. ‘‘फुट गया तो भर के देंगे..’’ वगैरे म्हणायची ऐपत त्या काळात खरंच नव्हती. मुळात त्या कॉफी शॉपमधली पंचवीस रुपयाला मिळणारी कॉफी ‘चैन’ या सदरातच मोडत होती. एरवी टपरीवरचा कटिंग चहा हाच खरा होता. आपल्या खिशात दहाच्या मोजून तीन नोटा असताना कॉफीच्या पंचवीस रुपयांवर या फुटलेल्या कपाचा भरुदड कसा भरायचा, या चिंतेत मी असतानाच कोमलनं मंजूळ स्वरात वेटरला साद घातली. ‘‘आय अ‍ॅम सो सॉरी अंकल! गलती से गिर गया मेरे हात से. इस बार जाने दीजिये. प्लीऽऽऽज.’’ तिच्या या मोहिनीअस्त्रानं तो कर्दनकाळ वेटर विरघळताना दिसला. कोमलनं या मखमली सुराबरोबर घायाळ करणारं स्मितहास्याचं शस्त्रही उगारलं होतं. त्यासमोर तर वेटरनं गुडघेच टेकले. ‘‘संभाल के वापरना मंग्ता ना बेबी! मालिक अमको डाटता.’’ त्याच्या स्वरात अजीजी दाटली होती. ‘‘मेरे पास अभी चेंज नहीं है. नहीं तो मैं आपका नुकसान..’’ कोमल उगीचच पर्सशी चाळा करू लागली. खरं तर तिच्या पर्समध्येही वट्ट सत्तावीस रुपयेच होते हे मला ठाऊक होतं. हिशोबाचा ताळमेळ जमवूनच आम्ही त्या कॉफी शॉपमध्ये शिरलो होतो. ‘‘नहीं ऱ्हेने दो.. ऱ्हेने दो!’’ असं म्हणत वेटरमहाराज तोवर फुटलेल्या मगचे तुकडे गोळा करू लागले होते. कोमलनं मला हसून डोळा मारला.

आमची ओळख एका कंप्युटर क्लासमधली. ‘‘तुझ्या बाजूला बसले तर चालेल का? तिथे पोरींची बडबड ऐकून माझ्या डोक्याचा ० झालाय.’’ एके दिवशी कोमल माझ्या शेजारच्या खुर्चीत बॅग टाकत म्हणाली होती. एका मुलीच्या तोंडून असा अस्खलित शब्दप्रयोग ऐकून मला गंमतच वाटली होती. तोच आमच्या मैत्रीचा पाया. रूढार्थानं कोमल ‘टॉमबॉय’ नव्हती. पेहेरावात तर अजिबातच नव्हती. सुटसुटीत पंजाबी ड्रेस हा तिचा नेहमीचा पोशाख. पण तिच्याशी बोलताना आपण एखाद्या मित्राशी बोलतोय असंच वाटायचं. एखाद्या सराईत गवयानं उगीचच तानांचं प्रदर्शन न मांडता योग्य वेळी  ठेवणीतली तान काढावी तसं कोमलचं शिव्या घालणं असे. बरं, कधी ठेचकाळली, काही लागलं म्हणून आपण स्त्रीदाक्षिण्य दाखवायला जावं तर ‘मर्द को कभी दर्द नहीं होता..’ असा अमिताभ बच्चनचा डायलॉग तोंडावर फेकून वात आणायची. एरवी पुरुषी वाटणारी ही सखी मोक्याच्या वेळी  ठेवणीतला मधाळ आवाज लावून समोरच्याला नामोहरम करून टाकत असे. एकदा आम्ही वरळीला ‘नेहरू फेस्टिवल’मधलं नाटक बघायला गेलो होतो. कोमल नाटकाबिटकातली अजिबातच नव्हती. पण मला एकटय़ाला जायला भीषण कंटाळा आला होता म्हणून मी तिला सोबत नेलं होतं. नाटक थोडं ‘अ‍ॅब्सर्ड’ होतं. ‘‘काय बोअर मारतायत यार हे!’’ कोमलनं पंधराव्या मिनिटाला माझ्या कानाशी भुणभुण सुरू केली. नाटक संपून बाहेर पडताना कोमलनं तिचा शिव्यांचा बटवा उघडला. मी तिला नाटकातली सौंदर्यस्थळं पटवून द्यायचा कसोशीनं प्रयत्न करत होतो. बोलत, भांडत आम्ही बसस्टॉपवर आलो. ‘‘मी नाही बसणार आता बसमध्ये. टॅक्सी कर.’’ कोमल पाय आपटत म्हणाली. ‘‘येडी आहे काय तू? टॅक्सी? इथून दादर स्टेशनपर्यंत? कपडे विकायला लागतील मला.’’ मी म्हणालो. ‘‘घेणार कोण आहे?’’ असं म्हणून ती सरळ टॅक्स्यांना  हात दाखवू लागली. ‘‘कोमल, पैसे खरंच नाहीयेत यार. उद्या तुला आर. के.मध्ये वडा- सांबार खायला घालतो. बास?’’ मी अजीजी करू लागलो. पण ती टॅक्सी थांबवायची थांबेना. माझ्या सुदैवानं कुणीच टॅक्सीवाला यायला तयार होईना. तेवढय़ात लांबनं मला बस येताना दिसली. माझ्या जिवात जीव आला. ‘‘चल, चल. बस आली..’’असं मी म्हणत असतानाच आमच्या-समोरून एक काळी मर्सिडिज पास झाली. कोमलनं बिनदिक्कत त्या गाडीला हात केला. तो गाडीवालाही बावचळून थांबला. कोमलनं त्याच्या काचेवर टकटक केली. त्यानं काच खाली केली. ‘‘भय्या, दादर स्टेशन चलेंगे?’’ कोमलच्या या प्रश्नावर गाडीवाला आणि मी दोघेही चमकलो. ‘‘अरे, चलो ना. मीटर से दस रुपया ज्यादा ले लेना.’’ मर्सिडिजवाला अजूनही बेशुद्धीत असल्यासारखा तिच्याकडे बघत होता. मी मात्र शुद्धीवर आलो होतो. मी कोमलला मागे ओढलं. ‘‘काय फालतूगिरी लावलीयस?’’ मी आवाज शक्य तितका खाली ठेवत फुत्कारलो. एव्हाना मर्सिडिजवाला शुद्धीत आला होता. त्यानं अस्खलित इंग्लिशमध्ये आमच्या दिशेनं एक शिवी फेकली आणि तो काच वर करून बुंगाट वेगानं पुढे निघून गेला. डबल डेकर बसच्या वरच्या मजल्यावरच्या सगळ्यात पहिल्या सीटवर  बसून दादर स्टेशन येईपर्यंत यावर कोमल बांध फुटल्यासारखी हसत होती.

आमच्या दोन-तीन वर्षांच्या मैत्रीत पब्लिकमध्ये शर्मिदा होण्याचे अनेक प्रसंग कोमलनं माझ्यावर आणले. ‘पुन्हा तुला घेऊन कुठे जाणार नाही, तुझं तोंड बघणार नाही,’ अशा धमक्या देऊनही आम्ही दर तीन-चार दिवसांनी चहा प्यायला आमच्या नेहमीच्या टपरीवर भेटत असू. कोमल दिसायला सुंदर नव्हती, पण नेटकी होती. बॉयफ्रेंडस्च्या बाबतीतही तिची कारकीर्द उज्ज्वल होती. दर काही महिन्यांनी आम्हाला एका वेगळ्या भावोजींचं नाव कळायचं. ‘‘सध्या याला ठेवलाय मी.’’ कोमल निर्लज्जपणे सांगायची. मागचं प्रकरण का तुटलं? काय बिनसलं? यावर चर्चा नाही. एकदा मी तिला ‘‘कोमल, तुझी लिस्ट संपतच नाही यार!’’ असं सहज म्हटलं होतं. ‘‘साल्या, मुलगा असते तर अनेक मुली फिरवणारा म्हणून अभिमान वाटला असता ना तुला माझा? तुझा तो नितीन सावे.. स्वत:ला कोलडांगरीचा जॅकी श्रॉफ समजतो. त्याची एवढी लफडी आहेत. त्याचं कौतुक तुम्हाला! आणि मी केलं तर पाप काय? तुम्हारा खून खून और हमारा खून पानी क्या०?’’असं बोलून तिनं माझ्या तोंडाला कुलूपच लावून टाकलं होतं.

डिग्री कॉलेजच्या शेवटा-शेवटाकडे मी नाटकांत जास्त रमायला लागलो तसा माझा आणि कोमलचा संपर्क कमी होत गेला. तिला नाटकांत काडीचाही रस नव्हता. ‘‘लोकांना समजेल असं काहीतरी करा ना. बाप मेल्यासारखा चेहरा करून अख्खं नाटकभर बसला होतास तू. लाइफ में इतना टेन्शन है, तो नाटक कायको करने का?’’ या चारच वाक्यांत कोमलनं मी काम करत असलेल्या प्रयोगाची समीक्षा करून टाकली होती. त्यानंतर मी तिला प्रयोगाला बोलावण्याच्या फंदात पडलो नाही. मी तीन वर्षांसाठी दिल्लीला निघून गेलो आणि मग आमचा संपर्कच तुटला. काही वर्षांपूर्वी ‘फेसबुक’वर कोमल भेटली. स्टेटस ‘मॅरीड’ असं दिसलं. मला एकदम सगळे जुने दिवस आठवले. या तुफानी मुलीला नेमका सापडलाय तरी कोण नवरा म्हणून- मी फोटो शोधायचा प्रयत्न केला. पण ‘फेसबुक’वर फोटो शेअर करण्यावर कोमलचा विश्वास नसावा. लग्न करून बाई कोल्हापूरला गेलीय- एवढाच काय तो बोध झाला. ‘फेसबुक’वरच्या माझ्या मेसेजला तिनं सुरुवातीला उत्साहानं ‘‘काय स्टार? ओळख ठेवलीयस तू? नशीब आहे माझं.’’ असा एक टिपिकल रिप्लाय दिला. पण नंतरही काही फार घट्ट संपर्क राहिला नाही.

मागच्या वर्षी मी गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमासाठी बंगलोरला गेलो होतो. परतीच्या फ्लाइटची वाट पाहत एअरपोर्टवरच्या लाऊंजमध्ये बसलो होतो. त्याचवेळी माझ्या बाजूच्या खुर्चीत एक बॅग येऊन पडली. मी वर पाहिलं. समोर कोमल. तिचा आविर्भाव जणू काही आम्ही पाच मिनिटापूर्वी एकत्रच सिक्युरिटी चेकला उभे होतो असा होता. ‘‘मघापासून बघतेय तुला. म्हटलं, तूच आहेस की तुझा डुप्लिकेट? नसलास तर परत पोपट!’’ कोमलनं नेहमीप्रमाणे तोंडाचा पट्टा सोडला. ‘‘तू इथे कशी?’’ मला आश्चर्य लपवता नाही आलं. ‘‘तिकीट काढून आलेय. विदाऊट तिकीट नाही.’’ कोमलमध्ये तसूभरही फरक पडलेला नाही हे कळलं. कोमल बंगलोरहून दिल्लीला निघाली होती. ‘‘तू आता बंगलोरला असतेस का?’’ मी चौकशी केली. ‘‘आताच शिफ्ट झाले.’’ ‘‘काय नवऱ्याची ट्रान्सफर?’’ मी सहज विचारलं. एक सेकंदाचा पॉज गेला. मग समोर गेट नं. चार लिहिलेल्या बोर्डवर नजर खिळवून कोमल म्हणाली, ‘‘त्याची ट्रान्सफर मागच्या वर्षीच  झाली.’’ मला काहीच कळेना. ‘‘मग तू आता त्याला जॉइन झालीयस का?’’ मी अंधारात चाचपडल्यासारखा प्रश्न विचारला. यावेळी तिनं थेट माझ्या नजरेला नजर दिली. डोळ्यात कुठलेच भाव नव्हते. ‘‘नाही झाले मी त्याला जॉइन. तो एकटाच गेला.’’ वर्षभरापूर्वी मुंबई-गोवा हायवेवरील अपघातात कोमलचा नवरा गेला होता. कोमलही त्यावेळी गाडीत होती. त्या अपघातामुळे आज तिच्या पायात रॉड आहे. पण तेवढय़ावरच निभावलं. पुढं काय बोलावं, मला काहीच कळेना. आमच्यातली शांतता जीवघेणी झाली. तशी तीच म्हणाली, ‘‘माझी फ्लाइट दुसऱ्या गेटला आहे. पळते मी. तुला भेटून बरं वाटलं.’’ एवढं बोलून कोमल आपली बॅग सावरत चालू लागली. मीही तिला थांबवायचा प्रयत्न केला नाही. बंगलोर-मुंबई परतीच्या फ्लाइटवर मला अमिताभचा डायलॉग पुन्हा पुन्हा आठवत राहिला.. ‘‘मर्द को कभी दर्द नहीं होता.’’

aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2017 12:33 am

Web Title: chinmay mandlekar article on komal story
Next Stories
1 डॉक्टर, पोलीस, इसम वगैरे..
2 केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर (भाग ३)
3 केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर भाग २
Just Now!
X