एखाद्या जुन्या वाडय़ाची भिंत फोडून उंबराचं झाड उगवावं तसा जेहत्ते काळाचे ठाई कधीतरी पक्यामामा नाक्यावर उगवला, तिथेच वाढला, फोफावला. आज देहानं तो बहुतांश वेळ त्याच्या वांगणीच्या घरी राहत असला तरी मनानं अजूनही तो नाक्यावरच आहे. मी माझ्या लहानपणापासून त्याला नाक्यावर पाहत आलेलो आहे. सहा फूट होता होता राहिलेला शिडशिडीत देह. कान लपवणारे केस आणि गाल झाकणारे  कल्ले. तरतरीत नाक. त्या नाकाच्या वर कायम शेंदराचा बारीक ठिपका. कोरलेल्या मिशा. अंगात फुल बाह्यंचा, वरची दोन बटणं उघडी टाकलेला शर्ट.

पक्यामामानं जगण्यासाठी आयुष्यभर काय केलं, हे मोठं रहस्यच आहे. त्यानं आयुष्यभर फक्त ‘राडा’ केला. लहानपणी बाबा रात्री जेवायला बसले की बऱ्याचदा कुणीतरी दारावर यायचं. ‘‘दीपक चल. पक्याला उचललाय. राडा केला त्यानं..’’ की बाबा ताट झाकून ठेवायला सांगून, हातावर पाणी सोडत खुंटीवरचा शर्ट अंगावर चढवायला घ्यायचे. पण असे राडे करूनही पक्यामामा गुंड नव्हता. ‘‘गुंड बोलला तर दात पाडीन हां. साहेबांचा मावळा आहे मी.’’ आपला शर्ट खांद्यावरनं मागे सरकवत पक्यामामा म्हणायचा. मग कुणीतरी पक्यामामासाठी ‘सोशल वर्कर’ ही उपाधी शोधून काढली. ‘कार्यकर्ता’ हा शब्द कळायलाही लागण्याच्या आधीपासून मी पक्यामामाला कार्य करताना पाहिलं आहे. गल्लीतलं कुठलंही सार्वजनिक कार्य असलं की पक्यामामा लग्नघरातल्या नारायणासारखा सगळ्यात आघाडीवर. वर्गणी गोळा करण्यापासून, ते मांडव बांधण्यापर्यंत आणि उत्सवात कुणी मुलीची छेड काढलीच तर त्याला यथेच्छ बदडण्यापर्यंत जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याचं अस्तित्व जाणवायचं. गणपतीत मामा त्याच्याच भाषेत सांगायचं तर एकदम ‘कडक’ राहायचा. म्हणजे गणपतीचे दहा दिवस तो नॉनव्हेज खात नसे. आणि मुख्य म्हणजे ‘दारा वाइन शॉप’मधून नित्यनेमाचा ‘क्वार्टर’चा रतीबही एकदम बंद. पण विसर्जनाच्या रात्री या सगळ्याचं उट्टं काढून पक्यामामाची ‘फुल टाइट’ अवस्थेतली बडबड हा मनोरंजनाचा कार्यक्रम असे. मग त्यात गेल्या दहा दिवसांत कुणी कसा कामचुकारपणा केला, मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना अक्कल कशी नाही, इथपासून पाकिस्तानमध्ये डायरेक्ट घुसून आपण कसा ‘राडा’ घातला पाहिजे- इथपर्यंत सर्व मुद्दय़ांना पक्यामामा आपल्या खणखणीत आवाजात हात घाले. अशावेळी आम्ही पोरं दुकानांच्या फळकुटांवर बसून पक्यामामाला ‘हॅन्डल’ देत असू. मग गल्लीतलं कुणी वडीलधारं माणूस गॅलरीतून ओरडायचं- ‘‘पक्या, बास आता! जाऊन झोप.’’ मग ‘‘साला मराठी माणूसच मराठी माणसाचा आवाज दाबतो,’’ असं म्हणत पक्यामामा आपलं भाषण आवरतं घ्यायचा.  दुसऱ्या दिवशी पुन्हा कपाळाला शेंदराचा ठिपका लावून खांद्यावरची कॉलर मागे टाकत नाक्यावर पक्यामामा उभा!

त्यानं लग्न केलं नाही. मामाची मामी आली असती तर तो आजन्म ‘राडा’ करत नाक्यावर उभा राहू शकला असता का, हा कल्पनाविलासाचा विषय आहे. मामाच्या मोठय़ा  भावाची फॅमिली होती. भाऊ येता-जाता मामाच्या नावानं बोटं मोडायचा. तो बिचारा मानेवर खडा ठेवून एका डाय बनवणाऱ्या कंपनीत राबणारा साधा माणूस. मामाला कधी पोलिसांनी उचललाच, तर सोडवायला पोलीस स्टेशनला जायलाही तो घाबरायचा.  मग मामाची वहिनी गल्लीतल्यांची दारं वाजवायची. वहिनीचा मामावर भारी जीव. पण ती मामावर चिडायचीही खूप. मामाच्या रोजच्या दारू पिण्याला कंटाळून कधी कधी ती त्याला घराबाहेरच ठेवायची. मग मामा तिथेच बसून ‘‘वयनी! तू मला आईसारखी आहेस. यू इज द माय मम्मीऽऽऽ’’ असा हंबरडा फोडायचा. त्याच्या रडगाण्याचे आरोह-अवरोह झाले की धाडकन् दार उघडल्याचा आवाज येई, मग वहिनीचा तारसप्तक, त्याला मामाच्या धडपडण्याच्या आवाजाची साथ आणि शेवटी दार जोरात आपटून बंद केल्याची सम.. की शांतता! ही मैफल मी लहानपणी अनेकदा ऐकलीय. पण या कशामुळेच मामाचा नाक्यावरचा रुबाब कमी झाला नाही. याला कारण एकच- मामा कुणाच्याही अडल्यानडल्याला बोलावल्याशिवाय धावून जायचा. शाळेच्या अ‍ॅडमिशन्सच्या वेळी तर मामाला जवळजवळ येशू ख्रिस्ताइतकं महत्त्व यायचं. आणि पक्यामामाही दांडीयात्रेला निघालेल्या गांधीजींच्या उत्साहानं सगळ्यांसाठी शाळांचे उंबरे हिरीरीनं झिजवायचा. आपल्या अचाट  इंग्रजीत कॉन्व्हेंट शाळांच्या फादर प्रिन्सिपलांकडे अमक्याला अ‍ॅडमिशन द्या म्हणून शिफारस करायचा. ‘‘फ्यूचर ऑफ चिल्ड्रेन्स इज द फ्यूचर ऑफ द कंट्रीज..’’ अशा थाटात शिफारस झाल्यावरही ते काय पाहून त्या मुलाला अ‍ॅडमिशन देत, कोण जाणे! पण ही सगळी उरस्फोड मामा घरचं कार्य समजून करे. बरं, या सगळ्याच्या बदल्यात एका पैशाची अपेक्षा नाही. कुणी पैसे देऊ केलेच तर ‘‘भाऊबीजेला ओवाळून घ्यायला येतो तेव्हा करंजी खायला घाला,’’ असा डायलॉग मारून समोरच्याला भावविव्हल करून टाकायचा. हाच मामा एखाद्या वृद्धेला नकार देणाऱ्या नाठाळ रिक्षावाल्याला ‘तुझ्या आयचा घो रे भैया! तेरा बाप भी जाएगा श्टेशन!’’ असं म्हणून स्वत:च्या हातानं त्याचं मीटर पाडतानाही दिसायचा.

मामा राजकीय पक्षात होता, पण तो राजकारणी नव्हता. ते त्याला कधीच कळलं नाही. साहेब बोट उंचावून दाखवतील ती दिशा. ‘‘साला, मी आऊटलाइनलाच जायचा! पेपरात फोटो पायला असता तुमी माझा. कुख्यात गँगस्टर प्रकाश सातवडेकर ऊर्फ पक्या डांबिस एन्काउंटरमध्ये ठार. पण साहेबांचं भाषण ऐकलं आणि लाइफ बदललं आपलं. चार बाकडे टाकून टेज केला होता त्यावर उभे राहून साहेब बोलत होते. मी गटाराच्या झाकणावर बसून ऐकत होतो. तेव्हापासून ठरवलं, साहेब बोट दाखवतील तिथे आपण जायचं.’’ दसऱ्याला मामा शिवाजी पार्कचा रस्ता धरायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वारीला निघालेल्या वारकऱ्याचे भाव असायचे. निवडणुकांच्या वेळी तर मामा रात्रीचा जागता पहारा द्यायचा. आपल्या पोरांना कोण फोडत नाही ना? मतदारयादीत कोण झोल करत नाही ना? बोगस वोटिंग होत नाहीए ना? याकडे मामाचं बारकाईनं लक्ष असे. पण एवढं असूनही मामाला राजकारण कधीच कळलं नाही. युतीबितीच्या भानगडी तर त्याला कधी उमगल्याच नाहीत. साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानणे, लोकांची कामं करून देणं आणि ती करताना कुणी आडवा आला तर ‘राडा’ करणं, या त्रिसूत्रीवर मामानं आपलं आयुष्य काढलं.

एकदा मी एका प्रायोगिक नाटकात काम करत होतो. रिहर्सलला जागा मिळेना. मी आमच्या दिग्दर्शकाला घेऊन मामाकडे गेलो. मामाने लगेच मनावर घेतलं. त्याच संध्याकाळी मामानं मला नाक्यावर थांबवलं. ‘‘बाज्याच्या व्यायामशाळेची जागा उद्यापासून संध्याकाळी तुमी वापरायची रेसल करायला.’’ मामानं फर्मान काढलं. नाटक उभं राहिलं. प्रयोगाच्या दिवशी दिग्दर्शक कृतज्ञ भावनेनं म्हणाला, ‘‘मामांना इन्व्हाइट कर हां.’’ मला या प्रसंगाचीच धास्ती होती. एकतर नाटक प्रायोगिक; त्यात मामाच्या राजकीय विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध जाणारं. ते नाटक पाहिल्यावर मामा मलाच नाक्यावर गाठून ‘‘तुझ्या आयला चावला काळा कुत्रा..’ असं म्हणून राडा घालेल अशी मला भीती होती. पण मामाला पास न देणं कृतघ्नपणाचं झालं असतं. मी पास दिला. सातचा प्रयोग होता. पावडरबिवडर लावलेला मामा चार वाजताच हजर झाला. ‘‘काय मदत पायजेल तर आपण स्पॉटवर असायला पायजेल ना, म्हणून आलो.’’ असं म्हणून मामा प्रयोगाची तयारी न्याहाळू लागला. मी मेकअपच्या गडबडीत होतो. मध्येच कधीतरी काहीतरी विचारायला बाहेर आलो तेव्हा मामा मला घोडय़ावर चढलेल्या लाइटवाल्याला खालून जिलेटिन पेपर देताना दिसला. उत्सवमूर्ती म्हणून बसून राहणं मामाच्या प्रकृतीतच नव्हतं. तो कार्यकर्ता होता. कार्य करत राहणं हा त्याचा स्वभावधर्म होता. नाटक सुरू झालं. संपलं. मामाचं नेमकं काय मत झालं असेल, असा विचार मला आतून कुरतडतच होता. मी मेकअप काढायला मेकअपरूमकडे जात असतानाच स्टेजच्या मागे ठेवलेल्या अडगळीतल्या लेव्हल्सवर मामा निवांतपणे घोरत पडलेला दिसला. ‘स्पेशल गेस्ट’ म्हणून बोलावला गेलेला मामा प्रयोगाच्या आधी राबून राबून तिसऱ्या घंटेलाच गाढ झोपी गेला होता.

आता मामाचं वय झालंय. केस अजूनही कान झाकतात. पण गिरगावातून डोंबिवलीला राहायला गेलेल्या मराठी माणसासारखी त्यांची कपाळावरून मागे पीछेहाट झाली आहे. तिथे आता टक्कल स्पष्ट दिसतं. पक्ष फुटला. एकदा नाही, अनेकवेळा फुटला. तेव्हा मामा वर्षांनुवर्षांच्या प्रेमिकेनं दगा दिल्यावर बधीर झालेल्या प्रियकरासारखा झाला होता. काही वर्षांपूर्वी साहेब गेले आणि तेव्हा मामा मनातून मोडला. साहेबांच्या अंत्ययात्रेला ‘न भूतो, न भविष्यति’ असा जनसमुदाय लोटला. त्या महाप्रवाहातला एक छोटासा नगण्य ठिपका होऊन मामा साहेबांचं शेवटचं दर्शन घेऊन आला. एरवी ‘शिवतीर्थावर निघालो’ असं अख्ख्या गल्लीला ओरडून सांगत जाणारा मामा त्या दिवशी मुका झाला होता. पक्षनिष्ठा अजूनही कायम आहे. अजूनही निवडणुकीच्या वेळी मामा टेबलावर मतदारयादी घेऊन बसलेला दिसतो. पण गल्ल्यागल्ल्यांत फिरून ‘‘चला मामी, मराठी माणसानं व्होटिंग नाही केलं तर मुंबई कशी जगणार?’’ असा जागर करत फिरणारा मामा आता थकलाय. काही दिवसांपूर्वी मी मामाला डिवचलं, ‘‘आता तू जवान असायला हवा होतास मामा. हल्ली पिक्चरबिक्चरवर बंदी घालायला एवढे राडे होतात. तू सगळ्यात पुढे असतास, नाही?’’ मामा शून्यात बघत हसला. ‘‘लुंगीवाले आपल्या नोकऱ्या आणि जागा पळवतायत म्हणून आम्ही राडा करायचो. भैये घुसले तर आपल्या मराठी माणसाची वाट लागेल म्हणून राडा करायचो. पिक्चर बंद पाडायला कशाला करायचा राडा? ज्याला बघायचंय बघेल, नाय बघायचं नाही बघणार. तसं पण पिक्चर बघून कोणाची जिंदगी बदलते?’’असा प्रतिप्रश्न करून मामानं मलाच गप्प केलं.

वहिनी गेल्यावर मामानं आपल्या हिश्श्यातून वांगणीला छोटीशी जागा केली आणि तिथे राहायला गेला. आता पूर्वीचा नाकाही राहिला नाही. वाणी जाऊन तिथे एका परदेशी बँकेचं एटीएम आलंय. पानाची गादी जाऊन सायबर कॅफे. आता तेही जायच्या मार्गावर आहे. या बदललेल्या नाक्यावर मामा तसाही रमला नसताच. गणपतीचे दहा दिवस अजूनही मामा न चुकता येतो. रिडेव्हलप झालेल्या बिल्डिंगमध्ये भावाची सून आता त्याला घरात झोपायलाही विचारत नाही. दहाही दिवस मांडवात झोपतो. विसर्जन झालं की ट्रेन पकडून गुपचूप वांगणीला निघून जातो. मागच्या गणपतीत आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलो. ‘‘डॉन! तू अभी भी वैसा का वैसा है.’’ मी उगीच छेडलं. ‘‘वांगणीला कुणी मामी पटली वाटतं तुला!’’ मामा निरलस हसला. ‘‘तू ओपनिंगला येतो काय?’’ मामानं अचानक सवाल टाकला. ‘‘कसलं ओपनिंग?’’ मी विचारलं. ‘‘आपल्या एरियात रिक्षा स्टँड टाकलाय एक. तिथे दम देऊन ठेवलाय सगळ्यांना. आपल्या मराठी पोरांच्या रिक्षा लागल्या पाहिजेत. भैयांना एन्ट्री दिलीत तर..’’ मामा उत्साहानं बोलत राहिला. साठीला आलेल्या मामामध्ये अजूनही ‘राडा’ करायची खुमखुमी आहे. फक्त नेमकं कुठल्या साहेबांच्या उंचावलेल्या बोटाकडे पाहायचं, याबाबतीत तो बिचारा गोंधळलाय.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com