24 January 2021

News Flash

विनय सर

मला एक शब्द बोलायची संधी न देता पलीकडून नेहमीच्या खर्जात आदेश झाला होता.

विनय आपटें

कॉलेजच्या पहिल्या वर्षांला ‘डॅडी, आय लव्ह यू’ नावाचं नाटक पाहिलं. ती माझी विनय आपटे नावाच्या संस्थेशी पहिली भेट. सरांच्या नाटकातल्या परफॉर्मन्सनं भारावून गेलो. स्मिता तळवलकरांना कॉर्नर करताना ते एकेका प्रश्नासरशी बिलियर्डस् टेबलवरचा एकेक बॉल पॉकेटमध्ये घालतात तो सीन तर वेड लावून गेला. त्याक्षणी विनय आपटे माझे हीरो झाले.. आजही आहेत. तेव्हा मी नुकताच एकांकिकांमधून लुडबुड करू लागलो होतो. या क्षेत्रात फुलटाइम करिअर करू असा विचारही नव्हता. पण तेव्हा मनापासून देवाकडे एक मागणं मागितलं होतं- ‘या माणसाबरोबर एकदा काम करण्याची संधी दे!’ देव बहुतेक त्यावेळी बऱ्या मूडमध्ये होता. त्यानं ‘तथास्तु’ म्हटलं आणि माझ्या आयुष्यात मला विनय आपटे भरपूर लाभले!

माझा जीवलग मित्र सुनील भोसले तेव्हा विनय आपटेंकडे काम करत होता. मी एन. एस. डी.हून आल्यानंतर सगळ्यात पहिला फोन नंबर मला ‘अ‍ॅडिक्ट’च्याच ऑफिसचा मिळाला. स्ट्रगल करायला गेलो. साक्षात् विनय आपटे समोर! माझ्या- आधी आणखी एक होतकरू आला होता. त्यानं आपले फोटो पुढे केले. ‘सर, मी एक अ‍ॅक्टर आहे..’ ‘ते मी ठरवेन!’ क्षणाचा विलंब न लावता विनय सर गुरगुरले! तो तिथेच गारठला. त्याच्यापेक्षा जास्त मी गारठलो. माझा नंबर आला तेव्हा माझ्या फोटोंवरून एक तुच्छतादर्शक नजर फिरली. दुसऱ्या सेकंदाला ते बाजूला पडले आणि सवाल उमटला, ‘वाचता येतं का?’ ‘ह्.. हो सर.’ ‘बसंत, याला स्क्रिप्ट दे.’ त्यानं स्क्रिप्ट दिलं. टेलिफिल्म होती- ‘जेव्हा मी जात चोरली’! मी काय आणि कसं वाचलं माहीत नाही; पण ४ फेब्रुवारी २००४ रोजी मी माझ्या आयुष्यातला पहिला शॉट ट्रॉम्बेच्या एस्सेल स्टुडियोत विनय आपटेंच्या दिग्दर्शनाखाली दिला. तिथून पुढचे टप्पे घडत गेले. ‘अवघाची संसार’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मी लिहिलेल्या मालिकांमधून सरांनी केलेल्या भूमिका असतील, ‘एक लफडं विसरता न येणारं’ हे थेट त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी केलेलं काम असेल, किंवा ‘सूत्रधार’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ यांसारख्या सिनेमांमधून त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं असेल.. या साऱ्या गोष्टी घडत गेल्या.

मी ‘आदिपश्य’ नाटक दिग्दर्शित करत असताना एकदा खुद्द सर यशवंत नाटय़गृहाच्या गच्चीत अवतरले. ‘काय बसवलंयस बघू..’ आदेश झाला. सरांनी शांतपणे तालीम पाहिली. मला वाटलं, सर आता सोलून काढतील. ‘दिग्दर्शनातला ‘द’ तरी येतो का xxx?’ असा प्रेमळ सवाल विचारतील. सर तालीम पाहून उठले. म्हणाले, ‘चल, चहा मारू.’ मला खाली घेऊन गेले. आणि बापानं आपल्या मुलाचं प्रगतीपुस्तक ज्या कौतुकानं पाहावं, त्या कौतुकानं माझ्याशी बोलले. बदल सुचवले; पण त्यात आपलेपण होतं, दादागिरी नाही. नंतर आम्हाला हॉटेलमध्ये नेऊन पार्टी दिली. त्या रात्री अंगावर मूठभर अधिक मांस घेऊनच मी घरी परतलो.

२०१० साली मी पंढरपुरात ‘गजर’ या माझ्या चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो. आषाढीच्या आधीचा दिवस होता. फोन वाजला. ‘विनय सर’ नाव फ्लॅश झालं. मी फोन घेतला.

‘मी एक नाटक करतोय. त्यात तू काम करतोयस. स्क्रिप्ट मेल करतो. वाचून घे. ते वाईट आहे असं तुला वाटू शकतं. पण तू काम करतोयस.’

मला एक शब्द बोलायची संधी न देता पलीकडून नेहमीच्या खर्जात आदेश झाला होता. मी ‘बरं सर,’ एवढंच म्हणून फोन ठेवला. दुपारी स्क्रिप्ट आलं. मी वाचलं. मुळात ते नाटकाचं स्क्रिप्ट आहे यावरच माझा विश्वास बसेना. कारण त्यात अनेक छोटे प्रसंग आणि जवळजवळ अकरा गाणी होती. मी रात्री घाबरत सरांना फोन केला.

‘वाचलंस?’ सवाल झाला.

‘हो सर. ते..’

‘मी विक्रमकडून (नाटककार विक्रम भागवत) काही बीटस् रीराइट करून घेतोय. स्ट्रक्चर बदलणार आहे. अकरापैकी दोन गाणी जातील. नऊ उरतील.’

‘सर, पण ती गाणी.. म्हणजे ती गाणी गायचीयत?’

‘नाही. नाचायचंय. फुलवा खामकर कोरीओग्राफर आहे. तू करशील. माझा विश्वास आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे?’ यावर काय बोलणार? नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. विनय सरांना तद्दन व्यावसायिक नाटकांच्या पलीकडचं नाटक दिसत होतं. दोनच पात्रं, आठ डान्सर्स, नऊ गाणी. मी आणि अदिती सारंगधरनं ‘लफडं’चे प्रयोग खूप एन्जॉय केले.

‘तू तयार झाला नसतास तर रंगा बाजलकरचा रोल मीच केला असता..’ पुण्याच्या  प्रयोगाआधी सर सहज म्हणाले.

‘डान्स केला असतात?’ मी विचारलं.

विनय सरांनी मला ट्रेडमार्क तुच्छतादर्शक लुक दिला. ‘एकदा कुठे ते आठवत नाही.. डॉकयार्ड रोडला बहुतेक- मी, माझ्या मागे विवेक (आपटे) माझ्या जुन्या येझदीवर होतो. सोळा चाकांच्या दोन ट्रॉलर्सच्या मधून मी नव्वदच्या स्पीडनं माझी येझदी कट मारून काढली होती आणि माझा केसही वाकडा झाला नव्हता. जो हे करू शकतो, तो काहीही करू शकतो.’

हा माज नव्हता. हा अत्यंत दुर्दम्य सेल्फ कॉन्फिडन्स होता. आणि याच सेल्फ कॉन्फिडन्सच्या अर्कातून जे रसायन तयार झालं होतं, त्याचं नाव- विनय गोविंद आपटे!

एकदा सुबोध भावेनं नाशिकला ‘चंद्रपूरच्या जंगलात’ नाटकाचा प्रयोग केला होता. नाशिकच्या सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये नाटकाचा प्रयोग अशी  अभिनव कल्पना होती. ‘आपल्याला सपोर्ट म्हणून आपले इंडस्ट्रीतले बरेच मित्र येतायत. बस करतोय आपण नाशिकला जायला,’ सुबोधनं मला सांगितलं तेव्हा त्याच्या आवाजात उत्साह होता. पण प्रत्यक्ष सीमोल्लंघनाच्या वेळी आम्ही फक्त क्वॉलिसभर माणसं होतो. आणि ज्या मित्रमंडळींनी सुबोधला ‘येणारच!’ असा शब्द दिला होता, त्यातले फक्त विनय सरच आले होते. नाटक उत्तम पार पडलं. परतीचा प्रवास रात्री नऊ वाजता सुरू झाला. घोटीपर्यंत पोहोचलो तेव्हा रस्त्यावर वाहनांची मोठ्ठी रांग. पुढे कुठलातरी छोटा पूल कोसळल्यामुळे महामार्गावरची सगळी वाहतूक ठप्प झाली होती.

‘बाजूने पुढे घे,’ सर ड्रायव्हरला म्हणाले. तिथे पोलीस बंदोबस्त होता. विनय सरांना पाहिल्यावर पोलीस अ‍ॅलर्ट झाले. ‘किती वेळ लागेल?’ राजानं कोतवालाला विचारावा तसा प्रश्न विचारला गेला.

‘तीन-चार तास लागतील.’

‘दुसरा कुठला रस्ता आहे का.. आतूनबितून?’

पोलीसदादांनी अंदाज घेतला. ‘हितून राइटनं गावातला रस्ता आहे साहेब. आतून डायरेक्ट इगतपुरीला बाहेर पडतो. पण तो रस्ता घेऊ नका साहेब. डेंजर आहे.’

‘डेंजर?’ आता आवाजातल्या खर्जाला एक वेगळीच धार चढली.

‘चोरीमारी लई होते साहेब. नका जाऊ.’ एवढा भांबावलेला पोलीस मी पहिल्यांदाच पाहत होतो.

विनय सर ड्रायव्हरकडे वळले. मग कमरेचा ‘घोडा’ बाहेर आला. ‘चल.’

एक क्षण ड्रायव्हर गारठला. चोरीमारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या आडवाटेवर गाडी घालायला तो धजेना. मग त्याचं लक्ष विनय सरांच्या ‘घोडय़ा’कडे गेलं. ‘नथुराम’च्या वादळी दिवसांत विनय सरांना पोलीस प्रोटेक्शन होतं. ‘पण च्यायला! मुतारीत गेलं तरी ते दोघं सोबत यायचे. मग होम मिनिस्टरना विनंती केली- प्रोटेक्शन नको, लायसन्स द्या.’ हा इतिहास मला एकदा सरांनीच सांगितला होता. असो. घोडाधारी विनय सर पहिल्या सीटवर आणि मागे जीव मुठीत धरलेले आम्ही- अशी आमची गाडी त्या आडवाटेवरून निघाली. जवळजवळ तास-दीड तास जंगलातल्या वाटांवर चुकून थांबत, ठेचकाळत आमचा प्रवास झाला. अख्खा वेळ विनय सर हातात घोडा घेऊन शिकाऱ्यासारखे फ्रंट सीटवर होते. आता बहुधा आपल्याला मुख्य रस्ता पुन्हा कधीच दिसणार नाही असं वाटत असतानाच आमची गाडी हायवेला लागली. तोवर बारा वाजले होते. मग एका धाबेवाल्याला उठवण्यात आलं आणि बुडत्या जहाजातून जीव वाचलेले खलाशी किनाऱ्यावर पोहोचल्यावर जशी मेजवानी करतील तशी मेजवानी आम्ही केली. पण त्याआधी सरांनी काढलेला ‘घोडा’ म्यान करताना तीन बार हवेत उडवून आनंद व्यक्त केला. त्या अंधाऱ्या वाटेवरून चकवा लागलेल्या अवस्थेत प्रवास करताना दोनच गोष्टींच्या जोरावर मी तग धरून होतो.. देवाचा धावा आणि विनय सरांवरचा विश्वास!

‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा बहुधा सरांचा शेवटचा चित्रपट (दावा नाहीये.. बहुधा). त्याच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही खूप एकत्र प्रवास केला.. राहिलो. त्याआधी सरांचं बारीकसं हॉस्पिटलायझेशन झालं होतं. पण आवाजातली ताकद, डोळ्यांतली जरब आणि अंगातली जिगर कमी झाली नव्हती. ‘डॅडी’वर सिनेमा करायचाय.. ‘रानभूल’ पुन्हा करायचंय.. ‘एका कोळीयाने’वर फुल फ्लेज सोलो परफॉर्मन्स करायचाय. नवतरुणाच्या उत्साहानं सर तेव्हाही स्वप्नं पाहत होते, शेअर करत होते. ते सगळं मधेच सोडून ते गेले असं मी म्हणणार नाही. कदाचित माझ्यासारख्या त्यांच्या अंगाखांद्यावर वाढवलेल्या अनेकांच्या डोळ्यांत त्यांनी ती स्वप्नं पेरली असतील.

अजूनही अनेकदा त्यांची आठवण येते. अजूनही त्यांचा उल्लेख ‘होते’ असा करायला जीभ धजत नाही. अजूनही आपल्या नवीन नाटकाची अनाऊन्समेंट विनय सरांनीच रेकॉर्ड करावी असं मनोमन वाटतं. ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस’ नाटकाच्या पुण्यातल्या एका प्रयोगावरून खूप वादंग झाला होता. मी, मधुरा वेलणकर आणि प्रियदर्शन जाधववर खटला चालवण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्या सगळ्या वादंगाच्या वेळी प्रशांत दामलेंसारखे ज्येष्ठ खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. पण त्या काळात जवळजवळ रोज मला विनय सरांची आठवण येत असे. ते असते तर.. खरंच या वाटण्याला काही अंत नाही.

सरांचा विषय निघाला की त्यांचा माज, त्यांची जरब, त्यांची बेफिकिरी, त्यांचा भारदस्तपणा यांचीच चर्चा जास्त होते. त्यांच्या अफलातून सेन्स ऑफ ह्य़ुमरबद्दल फार कमी लोक बोलताना दिसतात. ‘लफडं’च्या शुभारंभाच्या प्रयोगाला एका माणसानं मेकअप रूममध्ये विनय सरांना विचारलं होतं, ‘काय मग? नवीन काय?’ क्षणाचाही विलंब न लावता, ‘ही पॅन्ट नवीन आहे. कालच घेतली विकत,’ असं उत्तर सरांनी अत्यंत भोळे भाव चेहऱ्यावर आणत दिलं होतं. त्यांच्या रासवट चेहऱ्याखाली आणि चिरेबंद आवाजाखाली दडलेलं मार्दव फार कमी- जणांच्या प्रत्ययाला आलं असेल कदाचित.. पण ते होतं.. भरभरून होतं. म्हणून ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये जेव्हा राधाच्या वडिलांचं.. महेशचं कास्टिंग झालं आणि विनयसर तो रोल करणार असं ठरलं तेव्हा मी ते कॅरेक्टर जाणूनबुजून बदललं. महेश देसाईला राधाची आई केलं, घरातली कर्ती स्त्री केलं. आणि सर तो रोल कमालीचे जगले.

घरातलं र्कत माणूस निघून गेल्यावर जे रिकामपण जाणवतं ते आजही विनय सरांच्या बाबतीत जाणवतं. आमच्या ओळखीतल्या दहा वर्षांत या ‘संस्थे’नं जे काही दिलंय ते आयुष्यभर पुरण्यासारखं आहे. आमच्या कुळात अभिनय वगैरे क्षेत्रात आलेला मी पहिलाच. त्या अर्थानं आमचं कुठलंच ‘लिनीयेज’ नाही. पण या क्षेत्रातली अनेक दिग्गज माणसं बापाच्या मायेनं जवळ आली. त्यातलेच एक ‘डॅडी’ विनय सर! लव यू विनय सर! मिस यू! ऑलवेज.. फॉरेवर..

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2017 2:18 am

Web Title: chinmay mandlekar article on vinay apte
टॅग Vinay Apte
Next Stories
1 विशाल विजय माथुर (भाग ३)
2 विशाल विजय माथुर (भाग २)
3 विशाल विजय माथुर
Just Now!
X