24 January 2021

News Flash

विशाल विजय माथुर (भाग २)

सुरुवातीचं वर्ष त्याच्या नेहमीच्या हसतमुखपणात तसूभरही फरक झाला नव्हता.

(संग्रहित छायाचित्र)

माझ्या पाच फुट अकरा इंच उंचीच्या आडदांड शरीराच्या मित्राला लहान मुलासारखं रडताना पाहून मला कुठे बघावं तेच कळेना. मॅक्डोनल्डस्मधली सगळी माणसं आपली कामंधामं सोडून आमच्याकडे पाहतायत असा भास मला होऊ लागला.

‘‘यार हुआ क्या?’’ प्रश्न विचारण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं. ‘‘किसीने कुछ कहा? कुछ.. कुछ हुआ? तेरा बटवा तो नहीं मारा किसीने?’’ मला आजवर पाहिलेले ते सगळे जुने हिंदी सिनेमे आठवले.. ज्यांत काठीला गाठोडं बांधलेला गावठी नायक (त्यावेळच्या) व्ही. टी. स्टेशनवर उतरत असे आणि दुसऱ्या सेकंदाला मुंबई शहरातले चोर त्याचं सामान पळवून नेत असत. विशालनं माझ्या या प्रश्नावर फक्त नकारार्थी मान हलवली.

‘‘अंकलने जिस इस्टेट एजंट का नंबर दिया था, उसने आज मुझे छ:-सात घर दिखाए.’’आमच्या शेजारचे गुणेकाका ज्या तल्लीनतेनं शिल्पा शेट्टीला योगा करताना पाहतात त्याच एकाग्रतेनं मी विशालकडे पाहू लागलो.  क्षणभर तो काहीच बोलेना.

‘‘फिर क्या  हुआ?’’ मला आता हा सस्पेन्स अस होऊ लागला होता.

‘‘यार मॅक्स! एक भी घर के सामने लॉन नहीं है!’’ त्याचं हे वाक्य माझ्या मेंदूपर्यंत पोहोचायला काही सेकंद गेले.

‘‘तो?’’ यापलीकडे मला काहीच बोलायला सुचेना.

‘‘तो?’’ विशाल उसळला. ‘‘मैं. .कैसे? हाऊ कॅन आय सर्वाईव हीअर? घर शुरू होते ही खत्म हो जाते हैं. आय कॅन डू विथ अ स्मॉल हाऊस.. पर घर के सामने ओपन स्पेस ही नहीं है!’’

मला हसावं की रडावं कळेना. मला त्याला सांगावंसं वाटत होतं- ‘मित्रा, काही वर्षांनी मुंबईत चालायलाही जागा नसणार आहे. अर्धी मुंबई उरलेल्या अर्ध्या मुंबईच्या खांद्यावर बसून फिरणार आहे. अन् तू लॉन नाही म्हणून रडतोयस!’ पण मी यातलं काहीच बोललो नाही. माझ्या या जीवलग मित्राला हाताला धरून घरी घेऊन गेलो आणि माझ्या आईच्या हातचं कोलंबीचं कालवण खायला घालून त्याचा आत्मा शांत केला.

दोष विशालचा नव्हता. माझी एक मैत्रीण हिमाचल प्रदेशची आहे. तिच्या तीनमजली घराच्या  गच्चीवर उभं राहिलं की तीन बाजूंनी फक्त बर्फानं लगडलेले डोंगर दिसतात. त्या माझ्या मैत्रिणीला जेव्हा मी एका संध्याकाळी सहा वाजता ईरॉस थिएटरसमोर उघडणाऱ्या चर्चगेट स्टेशनच्या गेटसमोर उभं केलं तेव्हा तिथली गर्दी पाहून तिचा चेहरा नुकताच चुना लावलेल्या भिंतीइतका पांढराफटक पडला होता. विशालचं जयपूरमधलं घर मी तोवर पाहिलं नव्हतं. खरं तर तोवर मी जयपूरच पाहिलं नव्हतं. पण मागच्या वर्षी पाहिलं तेव्हा माझा हा मित्र त्या दिवशी  मॅक्डॉनल्डस्मध्ये  बसून का रडला होता, हे माझ्या लक्षात आलं. जयपूरमध्ये मुळात ‘बिल्डिंगी’ नाहीत.. बैठी घरंच आहेत. आणि आता जिथे बिल्डिंग्ज झाल्यात तिथेही इमारतीमध्ये असलेल्या प्रत्येक फ्लॅटच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात त्या इमारतीसमोर  मोकळी जागा हवीच असा तिथल्या महापालिकेचा नियम आहे. मुंबईत बाकी सगळं मिळेल, पण मोकळी जागा मिळणार नाही, हे विशालला समजवायला मला काही दिवस लागले. एखाद्या माणसानं ‘आपल्याला डायबिटीस झालाय’ ही बातमी ज्या निर्धारानं स्वीकारली असती, त्या निर्धारानं विशालनं ही वस्तुस्थिती स्वीकारली आणि अंधेरी वेस्ट नामक प्रांतात डी. एन. नगर नामक परगण्यात विशाल विजय माथुर यांनी दोन खोल्यांच्या एका घरात आपला तंबू ठोकला.

वर्ष २००३ ते २००८- पाच वर्ष विशाल मुंबईत राहिला. ज्या ‘लक्ष्य’ सिनेमाच्या वारूवर स्वार होऊन विशाल मुंबईत आला होता, तो ‘लक्ष्य’ आला. बऱ्यापैकी चाललाही. विशालच्या त्या एका सीनची दखलही घेतली गेली. पण त्यानंतर पुढची पाच वर्ष विशालला मुंबईत एकही काम मिळालं नाही. सुरुवातीच्या काळात ‘‘मुझे सिर्फ फिल्म्स् करनी हैं. नो टेलिव्हिजन!’’ असा जाहीरनामा विशालनं घोषित केला. मग निर्मात्यांच्या ऑफिसेसच्या चकरा सुरू झाल्या. मुळातच अत्यंत गमत्या स्वभाव असल्यामुळे  रात्री भेटला की विशाल त्या निर्मात्यापासून त्याच्या ऑफिसमधल्या प्यूनपर्यंत प्रत्येकाच्या नकला करून  दाखवायचा. ‘लक्ष्य’च्या दिवसांमध्ये त्याची हृतिक रोशनशी माफक मैत्री झाली होती. एकदा तो हृतिकलाही त्याच्या घरी जाऊन भेटून आला. हृतिकनंही मोठय़ा मनानं त्याला वेळ दिला. आस्थेनं चौकशी केली. प्रोत्साहन दिलं. पण मुंबई शहरात प्रोत्साहन हे चलनी नाणं नाही. जो काम देतो तोच देव. आणि तो देव काहीही केल्या विशालला भेटायला तयार नव्हता.

सुरुवातीचं वर्ष त्याच्या नेहमीच्या हसतमुखपणात तसूभरही फरक झाला नव्हता. शाहरूख खान कसा ओबेरॉय हॉटेलच्या समोरच्या कट्टय़ावर झोपायचा, आणि अक्षयकुमार कसा स्ट्रगल करायचा, याचे किस्से एकमेकांना सांगून सगळेच नवतरुण  एकमेकांना दिलासा देत असतात. पण बऱ्याचदा हे किस्से फक्त पेनकिलरचं काम करतात. पेनकिलरनं मूळ आजार जात नाही; तात्पुरती वेदना थांबते. चारचौघांत जग जिंकण्याची स्वप्नं पाहता येतात, छाती ठोकून तसे दावेही करता येतात. पण एकांत ते सगळे स्वप्नांचे पापुद्रे सोलून दाहक वास्तव समोर ठेवतो. म्हणूनच असेल कदाचित- संघर्षांच्या दिवसांत माणसं एकटं राहायला घाबरतात.

मला त्यावेळी मराठीत बऱ्यापैकी कामं मिळू लागली होती. त्यामुळे आधीइतका वेळ विशालला देता येत नसे. पण शूटिंग संपलं की आम्ही भेटत असू. त्याला एक-दोनदा सांगूनही तो सेटवर मात्र कधीच आला नाही.

जसजसे दिवस सरले तसं विशालनं स्वत:ला मुंबईकर करून घेतलं. घरासमोर लॉन नाही म्हणून रडणारा हा मुलगा सव्वीस जुलैच्या पावसानंतर सत्तावीस जुलैला मित्रांच्या पुरात अडकलेल्या, वाहून गेलेल्या बाईक्स शोधायच्या मोहिमेत हिरीरीनं सहभागी झाला. बेस्ट बसेसबरोबर फारशी सलगी  त्याला जमवता आली नव्हती, पण लोकलला तो सरावला होता. मधेच एखाद् दिवशी फोन यायचा.. ‘‘यार, झाकिर हुसैन की कॉन्सर्ट के पास मिले हैं. चलेगा?’’ की मग आमची स्वारी निघायची. हे पासेस तो कुठून, कसे मिळवायचा, तोच जाणे.

आम्ही सिनेमे पाहत होतो. कुलाब्याला जाऊन बगदादीची बिर्याणी खात होतो. रिकाम्या दिवशी खूप उनाडक्या करत होतो. पण आता विशालला मुंबईत येऊन तीन वर्ष लोटली होती; मात्र हाती एकही काम नव्हतं. आता त्याच्या डोळ्यांत मला हळूहळू भीती दिसू लागली होती. घरचं बरं होतं. वडील जयपूर युनिव्हर्सिटीतून रिटायर झाले होते. आई बँकेतून रिटायर व्हायच्या मार्गावर होती. धाकटय़ा भावाला नोकरी लागली होती. पण तिचा पदर धरणाऱ्या प्रत्येकाला लाथा घातल्यानंतर का होईना, भरभरून देणारी मुंबानगरी विशालच्या झोळीत कुठलंच दान टाकायला तयार नव्हती.

एका सकाळी विशालचा फोन आला..

‘‘यार, कास्टिंग हो गई मेरी. एकता कपूर की सीरियल है.. कार्बन कॉपी!’’

सीरियल! तीन वर्षांच्या थपडांनंतर पाठीचा कणा थोडा मऊ झाला होता. विशालनं आपल्या दुकानावरचा ‘नो टेलिव्हिजन’चा बोर्ड काढून टाकून माळ्यावर फेकला होता. एकता कपूरची सीरियल म्हणजे चांगलाच ब्रेक की! मला मनापासून आनंद झाला. विशालचं शूटिंगही सुरू झालं. त्यात एकता कपूरबरोबर त्याची प्रत्यक्ष भेट एखाद् वेळेलाच झाली असावी; पण त्यातही त्यानं तिची अस्खलित  नक्कल करून दाखवली. आता तुम्ही विचाराल- एकता कपूरची ‘कार्बन कॉपी’ (‘सी’ फॉर कार्बन नाही बरं का.. ‘के’ फॉर कार्बन!) नावाची सीरियल कधी आली होती? तर ती सीरियल कधीच आली नाही. एरवी टेलिव्हिजनची सम्राज्ञी असलेल्या एकता कपूरची ही एक सीरियल कधीच कुठल्याच वाहिनीवर आली नाही. काही भागांचं चित्रीकरण झालं आणि मालिका ‘स्क्रॅप’ करण्यात आली. इथे विशाल खचला. त्याचवेळी वडिलांची बायपास करावी लागेल अशी बातमी जयपूरहून आली.

विशाल आणि मी सी. एस. टी स्टेशनवर उभे होतो. तो परत कधी येईल, काहीच माहीत नव्हतं. मी उगीचच इकडचे तिकडचे फालतू विनोद करून वेळ मारून नेत होतो. माझ्या लक्षात आलं, की विशालचा फोन सतत वाजतोय. तो पुन्हा पुन्हा कट् करत होता. सातव्यांदा हे झालं तेव्हा मी न राहवून विचारलं, ‘‘कौन है?’’

‘‘कास्टिंग एजंट है. अनुराग कश्यप की किसी फिल्म की कास्टिंग कर रहा है. कह रहा है- आपका नाम शॉर्टलिस्ट में है. मिलने आ जाओ.’’

‘‘तो? जा आज. कल की ट्रेन पकड ले. वैसे भी..’’

‘‘आय अ‍ॅम नॉट किमग बॅक मॅक्स! मुंबई मेरे लिए नहीं हैं.’’

मी हादरलो. तो परत येण्याचा विचारच  करत नव्हता! आणि हे त्यानं मला या क्षणापर्यंत सांगितलं नव्हतं! मी त्याला समजावण्याचा हरतऱ्हेनं प्रयत्न केला. पण तो काहीच बोलला नाही.

आज या घटनेला नऊ वर्ष झाली. विशाल आता जयपूरमध्येच राहतो. वडील काही वर्षांपूर्वी गेले. भाऊ दिल्लीला शिफ्ट झाला. आता चार खोल्यांच्या मोठय़ा घरात तो, त्याची आई आणि त्याचं लाडकं कुत्रं ‘लड्ड’!

नऊ वर्ष आम्ही फोनवर बोलतोय. आधी दिवसाला एक या गतीनं फोन व्हायचे. पुढे पुढे तो ‘स्ट्राईक रेट’ मंदावला.

मागच्या वर्षी माझं आणि माझ्या पत्नीचं लग्नाच्या वाढदिवसासाठी राजस्थानला जायचं ठरलं. मी हिरीरीनं फ्लाईटचं बुकिंग केलं. तिनं मला विचारलं, ‘‘अरे, आपण राहायचं कुठे?’’

एखाद्या खुळ्या माणसाला अत्यंत साध्या-सोप्या गोष्टीबद्दल प्रश्न पडल्यावर आपण त्याच्याकडे पाहतो तसं मी तिच्याकडे पाहिलं.

‘‘कुठे राहायचं म्हणजे? विशालकडे!’’

(क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2017 2:30 am

Web Title: chinmay mandlekar article vishal vijay mathur part 2
Next Stories
1 विशाल विजय माथुर
2 अमित सुळे
3 कल्पना
Just Now!
X