‘अत्याचार सहन होत नसेल तर त्यातून आनंद घ्यायचा प्रयत्न करावा..’ अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. केमसेंच्या आमदनीत त्या सिनेमात काम करणाऱ्या प्रत्येकानं ही म्हण आपल्या अंगी बाणवली होती. एखादं विमान दरीत कोसळणार हे कळल्यावर त्यात बसलेल्यानं आपल्या जवळच्या शेवटच्या चॉकलेटचा रॅपर फोडून ते चॉकलेट तोंडात टाकून जिभेवर गोडवा घोळवावा तशी माझी अवस्था होती. या चित्रपटाचं विमान दरीत कोसळणार हे एव्हाना स्पष्टच झालं होतं. ‘ब्राझीलमध्ये गाणं उडवू’ असं आश्वासन देऊन उडून गेलेले निर्माते एखाद्या शनिवार-रविवारी दर्शन देत. त्यांच्या चकचकीत बीएमडब्ल्यूमधून ते उतरत. सोबत कुटुंबकबिला, मित्रपरिवार असे. एकूणच एखाद्यानं अलिबागला वगैरे रम्य ठिकाणी जागा विकत घ्यावी आणि सुटीच्या दिवशी आपल्या रिकामटेकडय़ा मित्रांना ती दाखवायला न्यावी, तसा त्यांचा वावर असे. नाही म्हणायला त्यांनी त्यांचा एक पुतण्या प्रतिनिधी म्हणून सेटवर मुक्कामाला ठेवला होता. पण तो गडी फक्त आपण काल कुठल्या ब्रॅण्डचे कपडे घेतले आणि आज कुठल्या ब्रॅण्डचा गॉगल घातला, एवढंच सांगण्यात मश्गूल असे. एकूणच सगळा कबिला ‘आपण सिनेमा बनवून ऱ्हायलोय’च्या नशेत गुंगला होता. ती नशा आता त्यांना किती कोटीला पडते, एवढाच प्रश्न उरला होता.

मी आणि माझ्याबरोबरच्या काही सुज्ञ सहकलाकारांनी जनजागृतीचा निष्फळ प्रयत्न एकदा करून पाहिला. एकदा असेच आमचे निर्माते ‘व्हिजिट’ला आले असता आम्ही त्यांना एकूणच अनागोंदीची कल्पना द्यायचा प्रयत्न केला. पण सिनेनिर्मितीची नशा सगळ्यात पहिला हल्ला करते ती माणसाच्या कानांवर. ‘‘सर, आपल्या फॅमिली न्यूमेरोलॉजिस्टचं प्रेडिक्शन आहे.. ६ मेला रिलीज करा. कमीत कमी धा-बारा कोटींचा धंदा! कमीत कमी हां! आपल्याला ६ मे गाठायचीय फक्त. म्हणून वन स्ट्रेट शेडय़ूलमध्ये उडवून टाकायचा पिक्चर!’’ कागदी विमान उडवावं तसं सिनेमा उडवण्याच्या बाता मारणाऱ्या या गणंगाला केमसेंसारखा प्रॉडक्शन मॅनेजर भेटला हे निसर्गनियमाला धरूनच होतं.

बरं, एरवी तक्रार करण्यासारखं काही नव्हतं. व्यवस्था उत्तम होती. ठरलेले पैसे ठरलेल्या वेळी मिळाले होते. पण मूळ ज्या गोष्टीसाठी हा सगळा घाट घातला होता तो चित्रपट..? लग्नाच्या वरातीत वधूला जुनेरी पांघरायला लावून करवलीलाच नटवण्याचा प्रकार चालला होता. बरं, त्यातही केमसे कधी कधी अनपेक्षित चुणूक दाखवायचे.. नाही असं नाही. एका दृश्यासाठी घोडा हवा होता. खराखुरा जिवंत घोडा. शूटिंगच्या आदल्या रात्री आमच्यात पैजा लागल्या, की उद्या केमसे घोडा म्हणून काय आणणार? लाइटवाल्यांचा शिडीवाला घोडा आणतील, रस्त्यावरचं कुत्रं पकडून दिग्दर्शकाला सांगतील, ‘ऐका ना सर, यालाच घोडा समजा ना. तो सहकार्य करायला तयार आहे; मग तुम्ही का नाही?’ किंवा ते काहीच आणणार नाहीत. आणि ज्योकमधला शाळकरी मुलगा जसं कोऱ्या पानाचं चित्र मास्तरांना दाखवून सांगतो की, ‘माझा घोडा गवत खाऊन निघून गेला’, तसं काहीतरी करतील. ज्याच्या कल्पनाशक्तीला जे सुचत होतं ते तो फेकत होता.

पण दुसऱ्या दिवशी सगळे तोंडात मारल्यासारखे गप्प झाले. आमची गाडी शूटिंग लोकेशनला पोहोचली तेव्हा एक उंचापुरा करकरीत घोडा शेपूट हलवत आमच्या स्वागताला उभा होता. दिग्दर्शकाची अवस्था तर दीपिका पदुकोण शेजारच्या ब्लॉकमध्ये राहायला आलीय अशी बातमी कळलेल्या इसमासारखी झाली होती. तरीही काही लोकांनी खुसपट काढलं- ‘‘तो घोडा बसू देतो का पण? बसू दिलं तर चालतो का? केमसेंनी आणलेला घोडा आहे; काहीतरी झोल असणारच.’’ केमसेंनी आपल्या कार्यबाहुल्यामुळं असा लौकिक संपादन केला होताच! पण त्या दिवशी घोडा अगदी सुतासारखा सरळ वागला. जिथं जायचं तिथं गेला. जिथं थांबायचं तिथं थांबला. बसणाऱ्यांना पाठीवरून खाली फेकलं नाही. शूटिंग संपताना दिग्दर्शक फक्त त्याचा मुका घ्यायचा बाकी राहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर कृतकृत्य भाव होते. आणि त्या संपूर्ण दिवशी केमसे कॉलर उभी करून सेटवर हिंडत होते. एरवी दिग्दर्शकाचा आवाज चढला की केमसे नेमके त्याचवेळी हिशोब करायला मेकअप रूममध्ये निघून जायचे किंवा पुढच्या लोकेशनची परवानगी मिळवायला गायब व्हायचे. त्या दिवशी मात्र ते दिवाळीला नवी चड्डी मिळालेल्या शाळकरी मुलासारखे सगळ्यांच्या पुढय़ात वावरत होते. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ‘मी स्वत: चॉइस करून आणलाय घोडा..’ असं सांगत होते. जणू काय त्यांनीच तो घोडा जन्माला घातला होता!

तो रम्य दिवस संपवून आम्ही दुसऱ्या दिवशी सेटवर पोहोचलो तेव्हा केमसे कुठेच दिसेनात. कालच्या यशाची धुंदी उतरली नसावी बहुधा, असं वाटून गेलं. पण लंच ब्रेकनंतरही केमसे दिसेनात तेव्हा मी त्या निर्मात्याच्या पुतण्याला विचारलं, ‘‘केमसे दिसले नाहीत आज.’’

‘‘केमसेला काढला.’’ पानाची पिंक टाकावी तसा पुतण्या बोलला.

‘‘काढला?’’ मला काहीच कळेना.

‘‘वर लाथ मारून हाकलला काकांनी. पैशाचे झोल!’’

त्यानंतर दिवसभर सेटवर चर्चा सुरू होती. ‘केमसेंचं हेच होणार होतं. आपल्याला आधीच माहिती होतं.’ असं जो-तो शपथेवर सांगू लागला. या घटनेनंतर दोन दिवसांत ‘‘सर, आपण हे शेडय़ूल पॅकअप करतोय. पुढच्या तारखांचं कळवतो,’’ असं पुतण्यानं सांगितलं आणि आम्ही स्वगृही परतलो. शेडय़ूल संपताना मिळायचे पैसे मिळाले नाही. ‘काका क्लीयर करतील,’ असं म्हणून पुतण्यानं बोळवण केली. ते पैसे मी आजतागायत पाहिलेले नाहीत. ते देण्याचं वचन देणारे काकाही नंतर मला भेटलेले नाहीत. यांचेच पैसे घेऊन केमसे पळून गेले म्हटल्यावर हे तरी काय करतील, असा सात्त्विक विचार करून मीही कधी पिच्छा नाही पुरवला. सिनेमा डब्यात अडकून पडला तो कायमचा.

मागच्या वर्षी मी नवी मुंबईत एके ठिकाणी एका समारंभाला गेलो होतो. तिथे ‘मान्यवर व्यासपीठ’ म्हणून माझ्या बाजूला केमसे! ‘‘कसं काय सर? आठवण आहे का?’’ केमसे माझा हात दाबत म्हणाले.

‘‘तुम्हाला कसं विसरेन केमसे?’’ मला सगळ्यांसमोर केमसेंचं वस्त्रहरण करायचं नव्हतं. पण चहा पिताना संधी साधून मी वार केलाच- ‘‘त्या आपल्या सिनेमाचं काय झालं? तुम्ही गायबच झालात!’’

केमसे खिन्न हसले. ‘‘तुम्हाला काय सांगितलं सर? मी पैसे खाल्ले- असंच ना?’’

आता केमसेच छाती पुढे काढून ‘घाल गोळी’ म्हणतायत तर मी कशाला मागे हटणार होतो?

‘‘सगळेच शिव्या घालत होते तुम्हाला. सगळ्यांचेच पैसे बुडाले.’’

केमसे काही काळ शून्यात बघत राहिले. ‘‘मी काहीही सांगितलं तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही सर. त्यामुळं सांगून काय उपयोग?’’ बऱ्याच वेळानं ते म्हणाले.

‘‘म्हणजे तुम्ही पैसे खाल्ले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे?’’ माझ्या आवाजात अजूनही तिखटपणा होताच.

‘‘सर, अजूनही कायनेटिक घेऊन फिरतो. अजूनही वन रूम किचनमध्येच राहतो. जाऊ द्या, काय सांगायचं? आपल्या हातून कलेची सेवा घडावी म्हणून या रगाडय़ात पडलो; पण खूप वाईट माणसं भेटली सर. त्यांचे हेतू वेगळे होते. आपण कलाकार आहोत सर.. दलाल नाही.’’ केमसे आता माझ्याशी बोलत नव्हतेच.. स्वत:शीच बोलल्यासारखे बोलत होते.

कार्यक्रम संपला. केमसेंनी माझ्याकडे कार्ड दिलं- ‘साईकृपा इस्टेट एजन्सी.’ ‘‘इथं नवी मुंबईतच आहे सर आता. कधी फ्लॅटबिट बघायचा असेल तर सांगा. तुम्ही हाक मारलीत तर अर्ध्या रात्रीसुद्धा धावून येईन.’’ केमसे पुन्हा हसतमुख झाले होते. केमसेंना अर्ध्या रात्री हाक मारण्याचा प्रसंग अजून तरी माझ्यावर आलेला नाही. पण त्यानंतर केमसेंचा दररोज न चुकता पहाटे पाचला मेसेज येतो. ज्यांची तुलना केवळ कागदाच्या निर्थक कचऱ्याशी होऊ शकते असे बंडल सुविचार त्या मेसेजमध्ये असतात. ते मी कधीच वाचत नाही. पण काही दिवसांपूर्वीच डिलीट करायच्या आधी त्यांच्या एका मेसेजमधले काही शब्द डोळ्यांवर झेपावलेच- ‘सत्य हे सापेक्ष असते..’ केमसेंच्या बाबतीत नेमकं सत्य काय, हा एक मनोरंजक संशोधनाचा विषय आहे.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com