आमची पहिली भेट दादर स्टेशनवर झाली होती. तो जालन्याहून आला होता. तेव्हा आमचा थिएटर ग्रुप होता. स्पर्धामधून नाटकं, एकांकिका करायच्या. काही नसेल तरी तारेवर कावळे जमतात तसं रोज शिवाजी पार्कवर जमायचं. अशीच एक जमघट संपवून घरी निघालो होतो. त्या दिवशी पार्कात तोही आमच्या ग्रुपमध्ये चणे खात बसला होता. मी काही फार लक्ष दिलं नाही. म्हटलं, असेल कुणाचा तरी गावाहून आलेला नातेवाईक. दादर स्टेशनला  मात्र आमची ऑफिशियली ओळख झाली- ‘‘हा सोम्या. जालन्याहून आलाय. स्ट्रगल करायला.’’ माझा एकदम त्या इसमाकडे, विक्रम गोखले ब्रॅण्ड डबल लुक गेला. स्ट्रगल करायला? खाकी पॅन्ट, तेलानं चप्प बसवलेले केस (साइड पार्टिशन), गुलाबी रंगाचा  फुल शर्ट आणि ओठावर चुकून चिकटवल्यासारखी वाटावी अशी मिशी, हा सोम्याचा तत्कालीन अवतार! मुंबईत कुठली स्वप्नं घेऊन आला होता हा? तरी मी आवाजात नरमाई आणत विचारलं, ‘जालन्यात थिएटर करायचास का रे?’ उत्तरादाखल त्यानं चक् केलं. ‘मग?’ बाल शिवाजीनं आदिलशाहच्या दरबारात उत्तर दिल्याप्रमाणे सोम्या उद्गारला, ‘मुजे इंण्डश्ट्री में अपणा जंडा गाढणा है.’  तो क्षण आजही माझ्या डोक्यात फोटो फ्रेम भिंतीला ठोकून बसवावी तसा बसलेला आहे.

आज या घटनेला जवळजवळ बारा र्वष झाली. सोम्या काही दिवसांतच आमच्या ग्रुपमधून फुटला. आधी मला वाटायचं छोटय़ा शहरातून आलेला असला तरी हा कोणीतरी दबंग अ‍ॅक्टर असणार. जालन्यातली शालेय किंवा जिल्हास्तरीय रंगभूमी यानं दणाणून सोडली असणार, आणि आता हा इथे अवतरलाय. पण आमच्या पहिल्याच तालमीत मला कळलं की सोम्यानं असलं कुठलंच कर्तृत्व गाजवलेलं नव्हतं. कुठल्या तरी आडगावच्या स्पर्धेत शिरवाडकरांच्या नटसम्राटातलं ‘घर देता का घर’ हे स्वगत (सोम्याच्या भाषेत ‘प्याच’!)  त्यानं तोंडपाठ म्हणून दाखवला होता. याच्या वर सोम्याचं रंगकर्म जाऊ शकलं नव्हतं. एवढय़ा भांडवलावर तो मुंबईच्या सिने ‘‘इंडश्ट्रीत’ जंडा गाढायला’ आला होता. सोम्याला मुंबईत आल्या आल्याच कोणीतरी- ‘मुंबईत टिकायचं असेल तर हिंदी आली पाहिजे,’ ही गोळी दिल्यानं सोम्यानं त्या काळात हिंदीचा उच्छाद मांडला होता. ‘मुजे कल चर्णी रोड जाणा है. रस्ता बतावोंगे क्या?’ हे वाक्य कानी पडलं की, आपण बहिरे जन्माला का नाही आलो, याची खंत वाटायची. सोम्याला मी म्हणजे जवळजवळ मुंबईचा राजू गाइड वाटायचो. कुठली बस कुठे जाते? कुर्ला ते मढ आयलंड हा तिरपागडा प्रवास नेमका कसा करायचा? शिवाजी मंदिरपासून ते कस्तुरबा हॉस्पिटलपर्यंत काय कुठे आहे? या सगळ्या माहितीसाठी सोम्या माझ्याकडे धाव घ्यायचा. मी यथाशक्ती ती माहिती त्याला द्यायचो.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी

ग्रुपमधून बाहेर पडला तरी अधूनमधून सोम्या भेटायचा. एखाद्या एकांकिका स्पर्धेच्या ठिकाणी, एखाद्या फिल्म फेस्टिव्हलला. पोशाखात हळूहळू फरक पडू लागला होता. बोलण्या वावरण्यात सोम्या हळूहळू मुंबईकर होऊ लागला होता. सिनेमा, नाटक याबद्दल त्याची मतं पक्की होत चालली होती. पण त्यातली खरंच त्याची किती होती आणि इथून तिथून कानी पडलेल्या मतांच्या पिचकाऱ्या किती होत्या, हा संशोधनाचा विषय होता. ‘माजिदी का टेकिंग स्टाइल रिपीटेटिव हो गया है.’ हे वाक्य मी त्याच्या तोंडून ऐकल्यावर अबाउट टर्न करून तोंड लपवायला जागा शोधत निघून गेलो होतो.

कालांतरानं मी दिल्लीला निघून गेलो. तीन वर्षांनी परत आलो तेव्हा आमच्या थिएटर ग्रुपची बोटच मोडकळीत निघाली होती. त्यामुळे त्या बोटीच्या शिडावर काही काळापूर्वी तात्पुरता बसलेला सोम्या नावाचा बगळा नेमका कुठे उडून गेला, हा विचारही मनात आला नाही. आणि मग एके दिवशी अचानक एका सेटवर सोम्या भेटला. पोलीस स्टेशनचं दृश्य होतं. त्यात पोलीस स्टेशनावर पकडून आलेल्या चोरांच्या घोळक्यातला प्रमुख चोर सोम्या होता. माझ्या डोळ्यासमोर अचानक सोम्याची ती दहा वर्षांपूर्वीची आकृती उभी राहिली. आता तिच्यात आमूलाग्र म्हणतात तसा बदल झाला होता. केस उसासारखे उभे राहिले होते, त्या उभ्या राहिलेल्या केसांमध्ये शेतात श्वापद  लपावं तसा एक गॉगल दबा धरून बसला होता, पोट बऱ्यापैकी पुढे आलेलं. टीशर्ट- ज्याला हल्ली लोक ‘ट्रेन्डी’ म्हणतात त्यातलं, मिश्या मात्र अजूनही तशाच होत्या. ‘और कैसा है यार!’ हिंदी बोलायची खोड मात्र अजूनही जिरली नव्हती. एक्स्ट्रा म्हणून काम करायला आलेल्या माणसानं सिनेमाच्या नायकाबरोबर एवढी सलगी केली म्हणून एक असिस्टंट थोडा चिडला. पण सोम्यानं माझ्या पाठीत धपाटा मारत जाहीर केलं ‘अपणा पुराणा दोस्त है.’ मलाही सोम्याला पाहून बरंच वाटलं होतं. पण सिनेसृष्टीचे काही अलिखित नियम पाळणं गरजेचं असतं. लंचमध्ये मात्र मी सोम्याला गाठला. गप्पांमध्ये जी कहाणी कळली त्याप्रमाणे, सोम्याचं अ‍ॅक्टर बनून ‘जंडा गाढण्याचं’ स्वप्न केव्हाच धुळीला मिळालं. मग त्यानं मुंबईत तग धरण्यासाठी उसाचा रगाडा चालवण्यापासून ते अंडापाव विकण्यापर्यंत सगळे धंदे केले. पण कबड्डीपटूनं लाइन धरून ठेवावी तसा  त्यानं एक पाय मात्र सिनेसृष्टीत तसाच रोवून ठेवला होता. मग कुठे मॉबमध्ये उभा रहा, कोणाला प्रॉडक्शनमध्ये मदत कर असे पराक्रम जारी होते. ‘ये तेरे प्रोडय़ुसर का झोल है हां. पैसा निकालले पहले ही,’ अशी ताकीद सोम्यानं मला तिथल्या तिथे दिली. आणि आश्चर्य म्हणजे सोम्याची बत्तीशी खरी ठरली. तो सिनेमा पूर्ण झाला. पण निर्मात्यानं अनेक लोकांना पैश्याला गंडा घातला. त्यात आम्हीही होतो हे सांगणे नलगे. आज परिस्थिती अशी आहे, की मला इंडस्ट्रीत कोण कुठली फिल्म करतंय, त्याचं बजेट किती? कोणी कुठल्या फिल्मसाठी किती पैसे घेतले? कोणाचं लफडं कुठे आहे? या सगळ्याचा चालता बोलता विकिपीडिया म्हणजे आमचा सोम्या! तो ही माहिती कुठून मिळवतो, त्याचं त्याला माहीत. मी एकदा त्याला विचारलंही. म्हणाला, ‘आँखें और काण खुला होणेशे सबकुच्छ मुमकिण होता है.’

सोम्या ही एक व्यक्ती नाही, ही एक जमात आहे. छोटय़ा  शहरांमधून मुंबईकडे येणारी. येताना कदाचित मोठी स्वप्नं बाळगलेली असतीलही, पण मुंबई नामक रगाडय़ात ती पिचून जातात. पण ही लोकं हार मानत नाहीत. बसायला जागा नाही तर नाही, दांडय़ाला लटकून प्रवास करू, हा मुंबईचा बाणा या लोकांमध्ये सगळ्यात आधी भिनत असावा. ही लोकं दांडय़ाला धरून राहतात.

मला सोम्याचं कौतुक वाटतं. आजही मला कुठल्याही सिनेमाची विचारणा झाली, निर्माता ओळखीचा नसेल, तर त्याची क्रेडिबिलिटी जाणून घेण्यासाठी मी सोम्याला फोन लावतो. ‘वो? मत कर तू उसकी फ्लिम. पैसे का लोच्या है उसका,’ असं म्हणत सोम्या माझी येणाऱ्या संकटापासून आधीच सुटका करत असतो. कोणे एके काळी मी त्याला मुंबईतले रस्ते दाखवले. आता तो मला या मायानगरीच्या रस्त्यांवरच्या खाचखळग्यांची आगाऊ सूचना देत असतो! आमच्यातला बंध तोच आहे, फक्त आता नाती बदललीत!

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com