20 February 2019

News Flash

मजुमदार

मीही माझे दोन्ही हात तोंडाजवळ नेऊन डोळ्यांत आश्चर्याचे भाव आणले असते.

वर्ष होतं २००८. एके दुपारी एका शॉपिंग सेंटरमध्ये खरेदी करताना फोन वाजला. ‘मायसेल्फ मजुमदार. वी आर मेकिंग अ फिल्म ऑन क्रांतिवीर राजगुरू. वुड यू बी इंटरेस्टेड इन् प्लेइंग द रोल?’ नट कधीच भूमिका निवडत नसतो; भूमिका नटाला निवडते. क्रांतिवीर राजगुरूंवर सिनेमा बनतोय आणि त्यात आपण राजगुरू! हाच तो क्षण- ज्याच्यासाठी आपला जन्म झाला.. वगैरे वगैरे सगळ्या भावना मनात येऊन गेल्या. हातात सामानाच्या जड पिशव्या नसत्या तर सुष्मीता सेनच्या जगप्रसिद्ध पोजसारखे

मीही माझे दोन्ही हात तोंडाजवळ नेऊन डोळ्यांत आश्चर्याचे भाव आणले असते. असो. थोडक्यात महत्त्वाचं असं, की मी काही तासांतच अंधेरी वेस्टला दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. एका महान क्रांतिकारकावरचा ऐतिहासिक सिनेमा व आपली मुख्य भूमिका- हा कैफ घेऊन डी. एन. नगर भागातल्या एका चाळवजा इमारतीसमोर जाऊन उभा ठाकलो. त्या अंधाऱ्या इमारतीत शिरतानाच खरं तर पुढच्या धोक्यांची चाहूल लागायला हवी होती. पण गरजवंताला अक्कल नसते! त्या ऑफिसमध्ये मजुमदार पहिल्यांदा भेटला. साधारण पाच फूट उंची. कुरळे केस. ड्रॉवर ओढावा तशी पुढे आलेली हनुवटी. धीरुभाई अंबानी स्टाईल पोजमध्ये एक बोट गालावर आणि एक हनुवटीखाली असं बसायची त्याला भयंकर खोड. नाकाखाली पातळ मिश्या. मजुमदार बंगाली होता. ‘आय हॅव वर्कड् अ‍ॅज अ‍ॅन असोशिएट डिरेक्टर विथ अपर्णा सेन.’ घ्या! आताच त्यांचा ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यर’ पाहून आपण भारावलो होतो. त्यांचा हा असोशिएट! अजून काय मागू तुझ्याकडे देवा? पुढे मजुमदार आयुष्यात जी असंख्य खोटी बोलला त्याचं हे सूतोवाच होतं. त्यावेळी मजुमदाराच्या काखेत एक भलंथोरलं बाड होतं. त्याला तो ‘रेफरन्स मटेरियल’ असं म्हणायचा. मजुमदार त्या चित्रपटाचा रिसर्च हेड आणि असोशिएट डिरेक्टर होता. ‘आपको बाल एकदम छोटे करने पडेंगे. वी वॉन्ट अ‍ॅन अ‍ॅक्टर विथ डेडिकेशन ऑफ आमिर खान!’ मजुमदार माझ्यासमोर मूठ नाचवत सांगत होता.

तर मंडळी, क्रांतिवीर राजगुरू यांच्या जीवनावर याच नावाचा एक चित्रपट बनलेला आहे. तो तुम्ही पाहिला असण्याची सुतराम शक्यता नाही. पाहिला असेलच तर तुम्ही बंगाली वाघांपेक्षाही रेअर अशा स्पेसिज्चा भाग आहात असं समजा. सरकारी अनुदानं उपटण्यासाठी काही नालायक निर्माते ज्याप्रकारे प्रोजेक्टस् तयार करून पैसे ओढतात, तसाच हा एक प्रोजेक्ट होता. बनवणाऱ्यांना ना सिनेमा या कलेशी देणंघेणं होतं; देशभक्तीशी तर त्याहून नव्हतं. चित्रीकरणादरम्यानच माझ्या स्वप्नांचे फुगे फुटू लागले होते. पहिला घाव पडला तो स्क्रिप्ट वाचल्यावर. अत्यंत नीरस, रटाळ आणि ना धड हिंदी, ना धड मराठी अशा भाषेत लिहिलेले संवाद! मजुमदारचा दुपारी फोन आला- ‘आपने पढा स्क्रिप्ट?’ ‘किस.. (तोंडावर आलेली शिवी मागे ढकलत) किसने लिखा है सर ये?’ ‘मैने.’ त्याच्या ‘मैंने’मध्ये अभिमान होता. खरं तर पुढे येणाऱ्या धोक्यांचे संकेत देव आपल्याला देत असतो; पण आपले डोळे फुटलेले असतात. मी ते ‘मैंने’ ऐकून गप्प बसलो. म्हटलं, अपर्णा सेनचा असिस्टंट आहे.. आपल्यालाच अक्कल नाही. नशीब! फाडकन् काही बोललो नाही!

पहिलं शेडय़ुल वाईला लागलं. केस भादरलेला, बारीक मिश्या ठेवलेला मी राजगुरूंची झूल पांघरून इतिहास घडवायला तयार झालो. पण चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी कळलं की आपण फसलोय. जो मजुमदार आपल्याला बृहस्पतीइतका ज्ञानी वाटतो त्याला कशातलं काहीच येत नाहीए. अभिनेता शरद पोंक्षे त्या सिनेमात बाबाराव सावरकर नावाचं पात्र करत होता. त्यानं सहज ‘अरे मजुमदारजी, ये बाबाराव का और राजगुरू का एक्झ्ॉक्ट क्या संबंध है?’ असा प्रश्न विचारल्यावर मजुमदारची अवस्था मांजरीच्या कचाटय़ात सापडलेल्या उंदरासारखी झाली. ‘सर, मैंने अपने रिसर्च मटेरियल में डिटेल में लिखा है सर..’ असं म्हणून तो अचानक बिळाचा पत्ता सापडलेल्या उंदरासारखा जो गायब झाला, तो दिवसभरात पुन्हा समोर आलाच नाही.

सगळ्यात कहर झाला जेलमधली दृश्यं शूट करताना. जनरल डायरच्या वधानंतर शहीद भगतसिंग यांनी वेषांतरासाठी आपली परंपरागत दाढी आणि केसांचं मुंडन केलं होतं. आज जो हॅट घातलेला, मिशीला पीळ दिलेल्या भगतसिंगांचा फोटो दिसतो, तो त्यानंतरचा आहे. आणि शेवटपर्यंत त्यांचं तेच रूप राहिलं. मध्यंतरी भगतसिंग यांच्यावर जे होलसेलमध्ये सिनेमे बनले त्या सगळ्यांनी निदान हा इतिहास तरी तंतोतंत दाखवला आहे. आमच्या सिनेमात पंकज विष्णूनं भगतसिंगची भूमिका केली होती. पंकजला बिचाऱ्याला सेटवर गेल्या गेल्या दाढी आणि केसांचा बुचडा चिकटवायला बसावं लागे. दीड-दोन तास त्याचं ते रणकंदन चाले. त्या दिवशी जेलच्या दृश्यांचं चित्रीकरण होतं. एव्हाना आपण खड्डय़ात जाणाऱ्या गाडीत प्रवासाला बसलो आहोत हे आम्हा सगळ्यांना कळून चुकलं होतं. तर अकराच्या सुमारास पंकज त्याचा सगळा सरंजाम करून आला. चित्रीकरणाला सुरुवात झाली. जेलमध्ये क्रांतिकारींना राजकीय कैद्याचा दर्जा मिळावा यासाठी भगतसिंग आणि त्यांचे साथी आंदोलन करतात तो सीन. अध्र्याहून अधिक दृश्य चित्रित झालं. लंच ब्रेकची घोषणा झाली. आम्ही जेवणावर तुटून पडत असतानाच माझ्या डोक्यात लख्खकन् वीज चमकली. हात गार पडले. मी कापऱ्या आवाजात पंकजला विचारलं, ‘पंकज, अरे तू दाढी लावलीयस, पगडी घातलीयस!’ पंकज थंडच होता. ‘मग?’ ‘अरे! हा नंतरचा सीन आहे. तोवर भगतसिंगांनी आपलं मुंडन केलं होतं. या सीनमध्ये तुझा हा लुक असताच कामा नये.’ पंकजचा जेवता हात तोंडाकडे जाता जाता राहिला. आम्ही तशीच ताटं टाकून दिग्दर्शक उन्मेश कब्रेंकडे पळालो. आता हे दिग्दर्शक कब्रे हे छायाचित्रकार कब्रे आहेत. त्यांनी सिनेमा शूट करून द्यायची जबाबदारी उचलली होती. ऐतिहासिक सत्यता, रिसर्च वगैरे भानगडींमध्ये त्यांनी फारसं लक्ष घातलं नाही. तो त्यांचा प्रांतही नव्हता. ती जबाबदारी होती मजुमदारवर. उन्मेशजी कडाडले, ‘मजुमदार!!!’ खवळलेल्या बायकांचे नवरे त्यांचा ‘अहो’ ऐकून ज्या लगबगीनं गॅलरीतून बेडरूममध्ये धावतात, तसा मजुमदार समोर हजर झाला. ‘ये क्या झोल किया है तुमने? जेल के सीन में भगतसिंग को पगडी और दाढी कैसे दी? वो दुसरावाला लुक होना चाहिये ना भे०’ पुढे काही सेकंद उन्मेशजी फक्त शिव्यांच्या भाषेत बोलत राहिले. जंगलात अचानक डोळ्यांत हेडलाइट पडल्यावर ससा जसा गांगरून एका जागी थिजून जातो, तसा मजुमदार काही क्षण उभा राहिला. त्यानं तीनशे आवंढे गिळले. मग तो हळूच म्हणाला, ‘नो सर. धिस इज अ‍ॅब्सोल्युटली राइट सर.’ मी आणि पंकज अवाक ् होऊन त्याच्याकडे पाहू लागलो. ‘सर, मेरा रिसर्च करेक्ट है सर. भगतसिंग वॉज अ ट्र सिख सर. यस. उन्होंने भेस बदलने के लिए सर और दाढी मुंढवाया था. पर जेल में वापस बढाई थी उन्होंने दाढी.’ ‘क्या बात कर रहे हो आप? भगतसिंग के उपर तीन फिल्में बनीं. एक में भी ऐसा नहीं दिखाया.’ मी चिडून म्हणालो. ‘उनका रिसर्च गलत है सर.’ मजुमदार शांतपणे म्हणाला! त्यामुळे आमच्या या  ऐतिहासिक चित्रपटात शहीद भगतसिंग ‘रंग दे बसंती चोला’ म्हणत फासावर जातानाही पूर्ण शीख गेटअपमध्येच होते.

कोर्टाच्या सीन्सचं शूटिंग. स्थळ : बसरा स्टुडियो, कांदिवली, मुंबई. चित्रपटात जयगोपालची भूमिका करणारा नट होता जयंत गाडेकर. एन. एस. डी. मधला माझा सीनियर. गद्दार जयगोपालला क्रांतिकारींनी भर कोर्टात चप्पल फेकून मारली होती त्या सीनचं शूटिंग. जयंताला नेमकं त्याचवेळी विशाल भारद्वाज यांच्या ‘कमीनें’ सिनेमात काम मिळालं होतं. त्या दिवशी त्याचं संध्याकाळी पुण्याला ‘कमीनें’चं शूटिंग होतं. ‘मला दुपारी बारापर्यंत सोडा आणि पुण्यापर्यंत जायला टॅक्सी द्या..’ या बोलीवरच जयंता त्या दिवशी शूटिंगला आला होता. मजुमदारानं आल्या आल्या त्याला त्याच्यासाठी मागवलेली टॅक्सी थाटात दाखवली. चमत्कार म्हणजे त्या दिवशी खरंच जयंताचं शूटिंग बारापर्यंत आटोपलं आणि तो पुण्याला जायला मोकळा झाला. साधारण एक वाजता आम्ही हवा खायला म्हणून सेटवरून बाहेर पडलो. जयंता परेशान अवस्थेत स्टुडिओत चकरा मारताना दिसला. मला आश्चर्य वाटलं. जो माणूस एव्हाना एक्स्प्रेस हायवेवर असायला हवा होता, तो अजून इथेच? ‘काय झालं रे? तू गेला नाहीस अजून? टॅक्सी आलीय ना?’ जयंता कातावलेल्या आवाजात म्हणाला, ‘टॅक्सी आलीय रे; पण टॅक्सीवाला सापडत नाहीये.’ तो असाच सैरभैर होऊन इथे-तिथे बघत राहिला. आणि मग अचानक ओरडला. काय पाहून ओरडला म्हणून आम्हीही पाहिलं. स्टुडिओच्या गेटजवळ एक मिशीवाला माणूस कोर्टातल्या चोपदाराचे लाल कपडे घालून शांतपणे सिग्रेट पीत होता. ‘अरे, हाच टॅक्सीवाला आहे.’ जयंता कळवळला. टॅक्सीवाला चोपदार होऊन कोर्टातल्या जज्च्या मागे उभा होता! ‘मजुमदार!!!’ जयंत कडाडला. मजुमदार मख्ख चेहऱ्यानं अवतरला. ‘वो मेरा टॅक्सीवाला है. उसको शूटिंग में कैसे लिया आपने? छोडो उसको.’ मजुमदार धोनीच्या थंडपणानं म्हणाला, ‘वो जज् के पीछे खडा रहनेवाला एक्स्ट्रा आया नहीं. मैंने इसको खडा किया. शो मस्ट गो ऑन नो सर!’ ‘पर मुझे पूना जाना है.’- जयंता. ‘आपको एक घंटा पहलेही फ्री किया. सुबह से टॅक्सी भी मंगवाया. आप गये नहीं?’ तितक्याच थंडपणे मजुमदार. ‘अरे, कैसे जाऊं? टॅक्सीवाले  को तुमने भाला पकड के खडा किया है.’ ‘दॅटस् नॉट माई प्रॉब्लेम सर. यू आस्कड्  फॉर अ टॅक्सी.. टॅक्सी इज हियर. टॅक्सीवाला इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. हमने उसको रोल के लिये पूछा, वो हां बोला. अभी वो कंटीन्यूटी में फंस गया है. शो मस्ट गो ऑन सर.’

चित्रपटाचं शूटिंग संपलं. डबिंगही झालं. एक दु:स्वप्न म्हणून मी तो सगळा अनुभव विसरायचा प्रयत्न करीत होतो. एका संध्याकाळी फोन आला- ‘मजुमदार.’ बॉण्ड, जेम्स बॉण्डसारखं मजुमदार एवढंच बोलायचा.. ‘मजुमदार.’

‘नमस्कार, हॅलो’ काही नाही. ‘बोलिये.’ मी म्हटलं. ‘एक प्रॉब्लेम हो गया है चिन्मय सर. हेल्प चाहिये. माय मदर इज सीरियस. आय नीड टू सेन्ड सम मनी टू कोलकाता.’ मला कळेना- यानं मला फोन का केलाय? ‘राजगुरू के प्रोजेक्ट में आय पुट माय हार्ट अ‍ॅण्ड सोल (?), लेकिन अभी तक पैसा नहीं मिला. र्अजट नीड है. नेक्स्ट वीक में वापस करता हूं.’ ‘कितना चाहिये?’ ‘फाईव्ह थाऊजंड विल बी वेरी हेल्पफुल.’ मी त्या रात्री अंधेरी वेस्टच्या मॅक्डोनल्डजवळ भेटून त्याला पैसे दिले. ‘एक हिंदी प्रोजेक्ट के लिये मैंने आपका नाम सजेस्ट किया है. उसका भी रिसर्च वर्क मेरे पासही है,’’ अशी धमकीही जाता जाता देऊन गेला. ते जे मी मजुमदाराला पाहिलं, ते शेवटचं. त्यानंतर महिन्याभरानं मी निर्मात्यांच्या ऑफिसला उरलेल्या पैशांची विचारणा करायला गेलो. निर्मात्यांनी अगत्यानं बसवलं आणि अचानक आईच्या प्रकृतीची चौकशी करू लागले. मला काहीच कळेना. ‘तुम्ही असं का विचारताय?’ मी न राहवून विचारलं. ‘आई हॉस्पिटलाइज्ड होती ना तुमची?’ मी उडालोच. निर्माते म्हणाले, ‘अहो, त्या दिवशी मजुमदारचा सकाळी सकाळी फोन आला : तुमची आई हॉस्पिटलाइज्ड आहे, र्अजट पैसे हवेत तुम्हाला. तुम्ही त्यालाच पैसे घेऊन यायला सांगितले होते ना हॉस्पिटलला? मी ताबडतोब तुमचे सगळे डय़ूज् कॅशमध्ये क्लीयर केले. आता काहीच बाकी नाही.’ क्रांतिकारींनी जयगोपालला फेकून मारलेली चप्पल आपल्याच मुस्कटात बसलीय असा चेहरा करून मी घरी परत आलो तेव्हा माझ्या ठणठणीत असलेल्या आईनंच दार उघडलं होतं.

चिन्मय मांडलेकर  aquarian2279@gmail.com

First Published on February 12, 2017 3:17 am

Web Title: majumdar movie on krantiveer rajguru