21 February 2019

News Flash

रमण

कॉलेजात असतानाच याच्या प्रेमात पडले. डिग्री मिळाल्या मिळाल्या याच्याशी लग्न केलं.

रमण नौठियालचा जन्म नैनितालचा. आई-वडील आणि एक धाकटी बहीण.

‘कॉलेजात असतानाच याच्या प्रेमात पडले. डिग्री मिळाल्या मिळाल्या याच्याशी लग्न केलं. तेव्हापासून आमचा संसार एके संसार सुरू आहे. बाकी काही मला माहीतच नाही बाई!’ असं म्हणणाऱ्या बायकांना नेमकं काय वाटत असतं हे मी पूर्णपणे समजून घेऊ शकतो. माझंही तसंच काहीसं आहे. कॉलेजमध्ये असताना अभिनय करू लागलो. कॉलेज संपल्या संपल्या एन. एस. डी.ला गेलो आणि नंतर करिअरलाच सुरुवात झाली. बाकी काही फारसं केलंच नाही. नाही म्हणायला, कॉलेज आणि एन. एस. डी. यांच्या मधे मी अगदी अल्पकाळासाठी माझ्या काकांच्या दुकानात उमेदवार विक्रेता म्हणून काम करत असे. तिथेच माझी रमणशी ओळख झाली. आमच्या काकांचं अंधेरी वेस्टला कंप्युटर आणि स्पेअरपार्ट्स विक्रीचं दुकान होतं. नुसती नाटकं करून पोरगं कुचकामी झालंच आहे, अगदीच निरुपयोगी ठरायच्या आधी त्याला कुठल्यातरी धक्क्याला लावू, असा बापसुलभ विचार करून तीर्थरूपांनी माझी रवानगी काकांच्या दुकानात केली. त्यावेळी मला कंप्युटर्समधलं ओ का ठो कळत नव्हतं. मुळातच तो आय. टी. क्षेत्राच्या उदयाचा काळ होता. मोबाइलचं इनकमिंग सोळा रुपये पर मिनिट होतं तेव्हाची ही गोष्ट. मी दिवसभर काकांच्या दुकानी जाऊन बसत असे. वाचायला भरपूर पुस्तकं सोबत नेत असे. आणि मला नेमून दिलेल्या खुर्चीत माझं निवांत वाचन चाले. कंप्युटर विक्रीचं दुकान म्हणजे काही वाण्याचं दुकान किंवा दुधाची डेअरी नव्हे, की लोक आपले सारखे येऊन थडकतातच आहेत. त्यामुळे मला बऱ्यापैकी वेळ मिळे. आमचे काका मधल्या वेळेत रिपेअरिंगचीही कामं घेत. त्यासाठी त्यांना  बाहेर जावं लागे. मुख्य विकेटकीपर जायबंदी झाल्यावर टीममधल्या एखाद्या गडय़ानं काळजीवाहू कीपिंग करून स्टम्पस्मागची जागा चालती-बोलती-हलती ठेवावी, त्याप्रमाणे काकांच्या गैरहजेरीत मी दुकान सांभाळत असे. मग आजूबाजूला असलेल्या इतर दुकानांतून काम करणाऱ्यांबरोबर ओळखी झाल्या. त्यात एक रमण होता.

पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा मी त्याला ‘अंकल’ म्हणत असे. रमण होताच अंकलच्या वयाचा. पण मग त्यानंच ‘हे अंकलखंकल सोड रे.. जस्ट कॉल मी रमण. आय डोन्ट लाइक अंकल,’ असं बजावलं होतं. तेव्हापासून ‘अंकल’ गळून पडला. आमच्या शेजारी एक कपडय़ाचं दुकान होतं. तिथे रमण सेल्समन होता. गोरापान. अंघोळ घालून घासूनपुसून  फळीवर ठेवला तर फॉरेनर म्हणून सहज खपेल असा गोरा. हिरवट डोळे. यानं टोप घातलाय असं वाटायला लावणारे, वादळ-वाऱ्यातसुद्धा गुंजभरही न हलणारे दाट केस. त्याच्या एकूण रूपडय़ावरून हा या दुकानाचा मालक असावा असं मला प्रथम वाटलं होतं. पण त्या दुकानाचा मालक शरीरापुढे फूटभर पोटाचा विस्तार असलेला एक पंजाबी होता. रमण साधा सेल्समन! आम्ही जेवायच्या वेळेत नेहमी एकमेकांना भेटत असू. रमणला जेवणानंतर बाहेर उभं राहून सिग्रेट प्यायची सवय होती. अन् मला जेवणानंतर दुकानासमोरच्या जागेत शतपावली घालायची. तिथेच गाठ पडली. पहिल्या भेटीतच रमणनं माझं नाव-गाव-फळ-फूल सगळी माहिती जाणून घेतली. मी नाटकबिटक करणाऱ्यांतला आहे हे कळल्यावर रमण फारच खूश झाला. ‘पृथ्वी थिएटरला जातो का तू?’ त्यानं मला एकदा विचारलं. ‘जातो अधूनमधून. का रे?’ लोकं आठवणीत खूप मागे गेली की त्यांची नजर खूप पुढे जात दिगंताला मिळते, तसाच लुक रमणच्या डोळ्यांत आला. तो स्वत:शीच हसला. ‘शुरुवात उधर से ही हुई थी,’ असं म्हणत सिगरेट विझवत तो लहान मुलांच्या चड्डय़ा-बॉडय़ा विकायला निघून गेला. दातात भाताचं शीत अडकावं तसं त्याचं ते ‘शुरुवात उधर से ही हुई थी’ हे वाक्य माझ्या मेंदूत अडकून बसलं. एकदा पृथ्वीलाच तो भेटला तेव्हा मी संदर्भासहित स्पष्टीकरण विचारलं. सिग्रेटचा धूर उडवत रमण हसला. ‘प्रत्येक गोऱ्या नॉर्थ इंडियन माणसाला आयुष्यात एकदा तरी वाटतं त्यानं सिनेमात हीरो बनावं. मलाही वाटलं.’ नॉर्थ इंडियन? मला काहीच कळेना. ‘अरे, मी ओरिजनली गढवाली आहे. नैनितालला बालपण गेलंय माझं.’ मला अचानक रमणच्या गोऱ्या कांतीचा खुलासा झाला. पण त्याच्या अस्खलित मराठीचा खुलासा होईना. ‘चार र्वष झाली बॉम्बेमध्ये. एवढं तर यायलाच पाहिजे ना!’ रमणच्या आयुष्याची कथा मला पुढल्या अनेक महिन्यांत अनेक भेटींत कळत गेली. तो आणि मी मित्र झालो असं म्हणणं थोडं खोटेपणाचं ठरेल. कारण मैत्री या नात्याला एक शाश्वतता लागते. तिलाच रमणचा विरोध होता.

रमण नौठियालचा जन्म नैनितालचा. आई-वडील आणि एक धाकटी बहीण. वडिलांचं एक छोटं जनरल स्टोअर होतं- जिथे दुधापासून केसाच्या शॅम्पूपर्यंत अनेक गोष्टी मिळत. रमण दहा-बारा वर्षांचा असताना रमणची आई गेली. ‘कॅन्सर!’ रमण अंधेरीच्या ‘नाविक’ बारमध्ये  पेग रिचवत सांगत होता. त्या संध्याकाळी मला तो पृथ्वीला भेटला होता. हीरो बनायचं भूत डोक्यावरून कधीच उतरलं होतं. पण तरीही कुणाच्यातरी डिश अँटेनावर किंवा पाण्याच्या टाकीवर बसलेला भारद्वाज पक्षी अवचित दिसावा तसा रमण अचानक ‘पृथ्वी’ला दिसत असे. ‘इथलं अ‍ॅटमॉस्फीयर मॅजिकल आहे.’ – इति रमण. तर असे त्या रात्री आम्ही ‘नाविक’मध्ये बसलो होतो. त्याची रम, माझा थम्स अप्. ‘साला तेव्हा कॅन्सर शब्द ऐकूनच आई अर्धी खल्लास झाली. पिक्चरमध्ये श्रीमंत लोक कॅन्सरनं मरताना पाहिले होते तिनं. अपने पास अमिरी कभी नहीं आई.. साला कॅन्सर आ गया.’ आई गेली आणि ऐन विशीच्या उंबरठय़ावर असताना वडीलही गेले. ‘वडिलांचं फ्युनरल झालं त्या रात्री लक्षात आलं- जगात आता आपण एकटेच उरलो. अपने आगे ना पिछे, ना कोई उपर-नीचे.’ ‘अरे, पण बहीण होती ना तुला?’ मी विचारलं. ‘अच्छा! ते मी सांगितलं नाही काय? मां आणि डॅडीच्या गॅपमध्ये तीपण गेली.’ ‘गेली?’ ‘स्कूल के छत से गिर गई. वहां क्या करने गई थी उसकोही पता.’ मला काहीच सुधरेना. मृत्यूनं इतकं इरेला पेटून एखाद्याचा पाठपुरावा करावा! ‘डॅडी गेले. पण जायच्या आधी दुकानावर कर्ज करून गेले. ये एक और बात मेरे को समझ में नहीं आयी. आई गेल्यानंतर एकदम बैरागी झाले होते. अचानक कर्जा लेने की क्या सुझी! दुकान विकून टाकलं मी. घर विकलं. फिर मैं निकल गया.’ ‘निकल गया! किधर?’ ‘मुंबई! म्हटलं, हीरो बनू या. फर्स्ट स्टॉप- पृथ्वी थिएटर. पण इकडे ते मंडेला दुबेजींचा क्लास चालायचा तो पाहिला. म्हटलं, ये अपने से नहीं होगा भैया.’

त्यानंतर रमण वाट नेईल तिथं जात राहिला. ‘बम्बई से गोवा. पहिले दोन आठवडे ज्याम मस्ती केली. मग पैसे संपायला आले. वेटर बन गया. टिप में अच्छा पैसा मिलता था. हॉटेलच्या मागे राहायला जागा. ना कोई उपर-नीचे.’ शिक्षण, नोकरी, करिअर, लग्न, संसार ही ठरलेली स्टेशनंच ठाऊक असलेल्या पिढय़ान् पिढय़ांच्या साच्यातून निघालेल्या माझ्या मिड्ल क्लास मेंदूला हे झेपेचना. ‘गोव्याचा कंटाळा आला, मग पॉन्डिचेरी.. मग समुद्राचा कंटाळा आला म्हणून सिलीगुरी. मग गँगटोक. तिथून डायरेक्ट अहमदाबाद. मग एक महिना बँगलोर. आणि मग मुंबई. इथे टिकलो साला.’ ‘पण या सगळ्या ठिकाणी तू केलंस काय?’ ‘काम! गुजारे का खर्चा निकल जाए ऐसा काम. मोस्टली वेटरगिरी. पटकन् काम मिळतं. फार सवाल विचारत  नाहीत. शिवाय खायची व्यवस्था मुफ्त होते.’ किशोरकुमारचं ‘मैं तो चला जिधर चले रस्ता’ हे गाणं लिहिताना गीतकार प्रेम धवनला रमण भेटला होता की काय देव जाणे! रमणला आपण लग्न करावं, आपला संसार असावा असं कधीच वाटलं नाही. महिन्याच्या महिन्याला बिल मागायला येणाऱ्या देणेकऱ्यासारखा मृत्यू सतत ज्याच्या घरावर फेऱ्या मारतो, त्याचं आणखी वेगळं काय होणार? ‘नो शादी, नो रिलेशनशिप. आणि जगात अशी कुठलीच जरुरत नाही- जी पैसे दिल्यावर पूर्ण होत नाही.’ सर्कशीत झोपाळ्यावर उलटं लटकणाऱ्या ट्रॅपिझ आर्टिस्टचं आपल्याला कुतूहल वाटतं, हेवा वाटतो.. हे आपण कधीच करू शकणार नाही अशी भारावून टाकणारी भावना येते, तसंच काहीसं मला रमणकडे पाहून होई. ‘माझं सगळं लाइफ एका सुटकेसमध्ये मावतं. आय हॅव नो अदर प्रॉपर्टी!’ एकदा अंधेरी नाक्यावर उभं राहून कुल्फी खाताना रमण मला सांगत होता. रमणकडे मोबाइलही नव्हता. त्यामुळे त्याला कधी फोन करून कॉन्टॅक्ट करता येत नसे. एव्हाना माझं काकांच्या दुकानात जाणंही सुटलं होतं. आणि रमणनंही कपडय़ांच्या दुकानातली ती नोकरी सोडली होती. पृथ्वी थिएटर हा एकच दुवा होता. तिथं कधी भेटला तर भेटला. सगळा भूतकाळ एका सुटकेसमध्ये बंद करून तो रोज येईल तसा वर्तमानाला सामोरं जात होता. आणि सगळ्यात हेवा वाटणारी गोष्ट म्हणजे भविष्याची कसलीही चिंता त्याला नव्हती. ‘उद्या आजारीबिजारी पडलास तर कोण येणार बघायला?’ मी उद्वेगानं विचारलं. ‘गँगटोकला असताना जॉन्डिस झाला. बरोबरच्या वेटरनं सरकारी हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकला. ठीक हो गया मैं.’ ‘अरे, पण नेहमीच असं होईल असं नाही. साधं घरात पाय घसरून पडलास आणि गुडघा फुटला तर..?’ माझी मध्यमवर्गीय कल्पनाशक्ती! ‘देख भाई.. जेव्हा जायचं तेव्हा जाईन. फरक कोणाला पडणार आहे? नो फुटप्रिंट्स.’ त्यानंतरही एक-दोनदा रमण भेटला.

मग मी दिल्लीला गेलो. परत आलो तेव्हा रमण भेटेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. आजतागायत तो भेटलेला नाही. जगाच्या कुठल्या कोपऱ्यात आहे देव जाणे! एकदा मी त्याला गंमत म्हणून विचारलं होतं, ‘भारतभर एवढय़ा ठिकाणी फिरलास. कधी भारताबाहेर नाही गेलास तो?’ ‘फॉरमॅलिटीज् खूप आहेत. पासपोर्ट, व्हिसा. अपना कैसा है- आता वाटलं, सुटकेस उचलली. निघालो.’

भारताच्या कुठल्यातरी कोपऱ्यात रमण असेल अशी मला अजूनही आशा आहे. पन्नाशीला आला असेल आता. अजूनही बाहेरगावी एखाद्या रिसॉर्टवर गेलो की अनवधानानं वेटरच्या चेहऱ्यांत रमण शोधण्याचा प्रयत्न मन करतं. देव कधी माझ्यावर प्रसन्न झालाच आणि त्यानं तीन वर दिलेच, तर चिरतारुण्य आणि जगावर राज्य हे माफक वर मागून झाल्यावर ‘मला रमणच्या सुटकेसमध्ये नेमकं काय आहे ते बघायचंय..’ असा एक महत्त्वाकांक्षी वर नक्कीच मागेन मी त्याच्याकडे.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

First Published on April 30, 2017 2:02 am

Web Title: raman nautiyal friendship with author chinmay mandlekar marathi article