साल २००४. मनोरीच्या कुठल्यातरी रिसॉर्टच्या खोलीत बसून मी आणि अभय परांजपे ‘वादळवाट’ मालिकेच्या पटकथेचं काम करत होतो. चर्चा करता करता मधेच अभयसर म्हणाले, ‘अरे, त्या आबा आणि रमाच्या सीनमध्ये त्या तानाजीला पण ठेव.’ ‘कोण तानाजी?’ मी विचारलं. ‘अरे, तो रमाचा ड्रायवर दाखवलाय ना आपण. गमतीदार आहे तो मुच्छड! वाढव त्याचे सीन. बरा आहे तो.’ या क्वालिफिकेशनवर ‘वादळवाट’मध्ये अनेक लहान पात्रं मोठी आणि नंतर संस्मरणीय झाली. अभयसरांनी कौतुक केल्यानंतर ‘कोण बरं हा रमा चौधरीचा गमतीदार ड्रायवर?’ हे पाहायची मला फार उत्सुकता लागली होती. कांदिवलीच्या पारवानी स्टुडियोमध्ये तो योग आला. मी सहज म्हणून सेटवर गेलो होतो. साधारण पन्नाशीच्या घरातला, पाच फुटांपेक्षा काही इंच जास्त उंची असलेला, अक्कडबाज मिश्यांचा इसम माझ्याशी येऊन शेकहॅन्ड करता झाला. चेहऱ्यावर मिश्यांपेक्षाही मोठं स्माइल होतं. पण ते माझ्याशी काही बोलायला जाणार तेवढय़ात अचानक एक असिस्टंट उगवला. ‘आलेगावकर, शॉट रेडी.’ ‘आलं का?’  म्हणत आलेगावकर शॉट द्यायला निघून गेले. ती माझी-त्यांची पहिली भेट. त्यानंतर आलेगावकरांना मी अनेक लहान-मोठय़ा भूमिकांमध्ये मालिका- चित्रपटांमध्ये पाहत होतो. कुठे शाळेचा शिपाई, कुठे गावचा सरपंच. मधे अनेक र्वष गेली. आजूबाजूचं जग झपाटय़ानं बदललं. बदलल्या नाहीत फक्त आलेगावकरांच्या मिश्या!

वर्ष २०१३. २२ जून. ‘तू माझा सांगाती’ या मालिकेच्या चित्रीकरणाचा माझा पहिला दिवस. मी कलावंत स्टुडियोला पोहोचलो. पोचल्या पोचल्या मला कळलं, की ९ वाजताच्या शिफ्टला मी ७ ची शिफ्ट समजून लवकर पोहोचलो आहे. स्टुडियोच्या वॉचमनशिवाय तिथे कुणीच नव्हतं. ‘आप सो जाईये दो घंटे..’ वॉचमननं मला सल्ला दिला. फार कमी सल्ल्यांना मी इतक्या वेगानं अमलात आणलंय. दुसऱ्याच क्षणी मी मेकअप रूमचं दार उघडून आडवं व्हायची जागा शोधत होतो. आत अत्यंत अंधुक प्रकाश होता. आणि.. आणि तिथल्या सीटवर काहीतरी होतं. प्रेत! दोन सेकंद मी स्तब्ध उभा राहिलो. सीटवर एक डोक्यापासून पायापर्यंत कापडानं झाकलेली मनुष्याकृती दिसत होती.

माझ्या या गडबडीत माझ्याकडून दाराचा आवाज झाला असावा. ‘गुमनाम’ सिनेमातल्या मेहमूदसारखी ती आकृती उठून बसली. चेहऱ्यावरची चादर खाली आली आणि डोळ्यासमोर भरघोस मिश्यांचं जंगल आलं. त्या अंधुक उजेडात मी पाहिलं. ते आलेगावकर होते. ‘गुड मॉर्निग सर.’ त्यांनी मला दिलेल्या धक्क्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. मी आपलं कसनुसं हसत ‘काय म्हणता?’ म्हणत आपली बॅग कुठेतरी टेकवली. ‘तुम्हाला पण सातचीच शिफ्ट कळवली होती का?’ कुणी समदु:खी मिळाला तर आपल्या दु:खाचा भार किंचित हलका होईल या आशेनं मी विचारलं. ‘शिफ्ट? मला? नाही बॉ! माझं आज शूटिंगच नाही.’ आलेगावकर आता अंगावरच्या चादरीची घडी करत होते. ‘पण मग तुम्ही इथे?’ ‘मी इथंच राहतो. रोज कोण पुण्याहून अप-डाऊन करेल हो! इथं मेकअप रूममध्येच टाकून दिलाय मी तंबू!’ आलेगावकर कडकडीत आळस देत नव्या दिवसाची सुरुवात करते झाले. ‘तू माझा सांगाती’मध्ये आलेगावकर आवलीच्या माहेरी म्हादबा नावाच्या गाडीवानाची भूमिका करत होते. आवलीचं तुकोबांशी लग्न होईपर्यंत त्यांना काम होतं. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी दुपापर्यंत  माझ्या लक्षात आलं होतं, की आलेगावकर आमच्या स्टुडियोत आधीच भरपूर लोकप्रिय झालेले होते. गावच्या पारावर बसलेल्या बेरकी सरपंचासारखे आलेगावकर मिश्या पिळत बाहेर बसलेले दिसायचे. येणाऱ्या-जाणाऱ्याला हाकारे घाल, याची खेच, त्याला चिडव असा मनसोक्त व्यापार दुपापर्यंत चालला होता. ‘तुम्हाला इथे मुक्काम करायला परमिशन बरी दिली निर्मात्यानं?’ मी लंच ब्रेकमध्ये न राहवून बोललोच. ‘आम्हाला परमिशन नाकारण्याचं कारण काय? सांगा तुम्हीच. एकदम  निरुपद्रवी माणूस. आता एक दिवस आड काम लागतंय. कुठं एशियाड पकडा, पुण्याला जा. परवा शूटिंग लागलं की पुन्हा या. त्यात पावसाचे दिवस. अडकून-बिडकून पडलो की मग झालं का? आणि इथे आपला कुणालाच त्रास नाही. मी कुठं निर्मात्याकडे हॉटेलची रूम मागितलीय? मेकअप रूममधल्या बाकडय़ावरच झोपतो. इथंच बाथरूममध्ये आंघोळ आटपतो. त्यात ज्या आर्टिस्टचं काम आहे त्यांच्याआड आपण काही येत नाही. हा आज्ञाराम सेटिंगवाला इथंच घर करून राहतो. त्याला सांगितलंय, स्वत:साठी चार चपात्या करतोस- माझ्यासाठी पाचवी कर. वाटलंच तर स्वत:च्या पैश्यानं काहीतरी मागवायचं. दोन वेळची क्वार्टर माझी मी आणतो. माझी मी पितो. माझा मी राहतो. कुणाला त्रास नाही.’ दोन वेळच्या क्वार्टरवर आलेगावकरांची अपरंपार श्रद्धा. मी माझ्या आयुष्यात अनेक बेवडे पाहिले, पण आलेगावकरांइतका शुचिर्भूत भक्तीच्या भावनेनं पिणारा मी नाही पाहिला. आलेगावकरांच्या हातात मद्याचा ग्लास हा पुजाऱ्याच्या हातातल्या घंटीसारखा वाटतो. स्टुडियोतले सगळेच कामगार, वॉचमेन आणि नंतर आम्हीही आलेगावकरांना ‘बापू’ म्हणू लागलो होतो. ते ज्या मेकअप रूममध्ये मुक्काम ठोकून राहिले होते त्याला मठाचं स्वरूप आलं होतं. त्यांचं शूटिंग नसलं की आलेगावकर महाराज प्रवचन सांगावं तसे हाताची घडी घालून, मिश्कील डोळ्यांनी अनेक किस्से रंगवून रंगवून सांगायचे. या माणसाचं आयुष्य होतंच खूप रंगीत. मुळात आलेगावकर एम. पी.चे. इंदौर, जबलपूर भागात त्यांचं बाल्य, तारुण्य गेलं असावं. ‘आमच्याकडं बरं का सर, लोक उठले की सकाळी सकाळी पहिले पेपर घ्यायला धावायचे बघा. पेपरवाल्याच्या स्टॉलवर ही गर्दी!’ कीर्तनकारानं कीर्तन करावं तसे आलेगावकर किस्सा सांगू लागायचे. ‘होय महाराजा’ म्हणणारे होयबा त्यांना लागायचेच. ‘अरे वा! फारच सुशिक्षित लोकं होती म्हणजे तुमच्या इथली.’ मी ‘होय महाराजा’ करण्याची भूमिका उचलली. आलेगावकरांचे मिश्कील डोळे चमकले. ‘तसलं काही नाही सर. पेपरात दारूचा रंग छापून यायचा.’ एव्हाना श्रोत्यांवर किश्श्याचं गारुड पडलेलं असे. ‘दारूचा रंग?’ ‘देशी दारूच्या भट्टय़ा लागायच्या गावात. ती दारू पिऊन माणसं गचकायची. मग सरकारनं म्हनलं, आम्हीच बनवतो दारू. मग सरकारमान्य ठेके सुरू झाले. पण लोकं लई चवनाट. ते सरकारी दारूची डुप्लिकेट मारायचे. मग डुप्लिकेट दारू पिऊन पण लोक गचकायची. सरकार म्हनलं, ‘तेच्यायला! आता काय करायचं?’ इथे माझ्या डोळ्यासमोर लोकांना सकस दारू कशी पाजायची, या चिंतेनं ग्रस्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उभे राहिले! ‘पण मग शेवटी सरकारच ते. त्यांनी आयडिया काढली.’ आलेगावकर महाराजांचं रसाळ प्रवचन सुरूच होत- ‘त्ये काय करायचे- सरकारी देशी दारूचा रंग रोज बदलायचे. एक दिवस निळा. एक दिवस हिरवा. एक दिवस पिवळा. म्हणजे मग डुप्लिकेट बनवून श्टॉक करताच येणार नाही ना! पण मग आज सरकारी दारूचा रंग कोणता, हे पब्लिकला समजणार कसं? मग रोजच्या पेपरात छापून यायचं- ‘आज सरकारी दारू का रंग नीला है.’ की तिथंच पेपर फेकायचा आन् ठेक्यावर जाऊन आपापली सरकारमान्य बाटली घ्यायची.’’ अशा अनेक अतरंगी किस्स्यांनी आलेगावकरांची पोतडी गच्च भरलेली असे.

पूर्वी ते बँकेत नोकरीबिकरी करत असावेत. ‘बँक सुटली की ग. दि. माडगूळकरांच्या घरी जायचो. तिथं ते ओसरीवर खुर्ची टाकून बसायचे. पान लावत. आपण त्यांच्या पायाशी बसायचं. मोठा माणूस. जे पदरात पडेल ते पाडून घ्यायचं.’ थोरामोठय़ांबद्दल कुठलीही गोष्ट सांगताना ‘मी कसा ग्रेट!’ असा कुठलाही अभिनिवेश आलेगावकरांच्या किस्से सांगण्यात नसे.

‘राजदत्तसाहेबांचं पिक्चर होतं राव! ऐतिहासिक. मोठा माणूस. आम्ही थडकलो जाऊन. दत्तसाहेबांनी पाहिलं. म्हनले, सैनिकाचे कपडे चढवा. चढवले. हातात भाला दिला कुणीतरी. असिस्टंट म्हनला, तो मागचा डोंगर आहे तिथे चढून उभे रहा. तुम्ही टॉपचे पहारेकरी आहे. मी म्हनलं, च्यायला पहिल्याच फटक्यात टॉपचा पहारेकरी झालो. तो भाला, जिरेटोप सांभाळत चढलो डोंगरावर. एकदम अटेंशनमध्ये उभा. खालून कोणतरी ओरडलं, पलीकडे तोंड करून उभे रहा. तुमची बॅक दिसली पाहिजे. म्हनलं, झालं का! आता आपल्या मिश्या कशा दिसायच्या? ऱ्हायलो पाठ करून उभा. बरं, वर गेल्यावर कानात फक्त वाऱ्याचा आवाज. खाली काय चाललंय त्याचा थांगपत्ता लागंना. वळून बघायची भीती वाटत होती. म्हनलं, नेमका महत्त्वाचा शॉट चाललेला असायचा आणि आपण वळलो म्हणून आपल्यामुळे कट् नको. ऱ्हायलो तसाच उभा. बराच वेळ झाला. पायाला रग लागली तेच्यायला! थोडय़ा वेळानं प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत एक बेनं आलं. मी त्याला डोळ्यानंच इशारा करतोय. बाजू म्हनलं- भसकन् कॅमेऱ्यात यायचास. तेच्यायला सर्कस बघावी तसं माझ्याकडं बघतंय. शेवटी मी म्हनलं, ‘शूटिंग हाय शूटिंग. बाजूला व्हा.’ तो पावना म्हनला, ‘शूटिंग! शूटिंगवालं गेलं कवाच.’ मी मागं वळून बघतोय. खाली मैदान साफ.’

आलेगावकर रंगात येऊन असे किस्से सांगू लागले की द. मा. मिरासदारांच्या कथा वाचल्याचा आनंद मिळतो. बरं, त्या किश्श्यांमध्ये कुणाचीच नालस्ती नाही, कुणाबद्दल वाईट बोलणं नाही. सई परांजपेंपासून विक्रम गोखल्यांपर्यंत कुणाचेही किस्से सांगताना आलेगावकर त्या, त्या व्यक्तीची नक्कलही करतात. पण त्यात बोचरं काहीच नसतं.

आलेगावकरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार माहिती नाही मला. पण ते स्वत: कधी संसारात पडले नसावेत. पुण्यात भावाकडे राहतात. मजेत जगतात. इतक्या ठिकाणी टप्पा पडून आलेल्या या खुशालचेंडूनं नशिबाचे फटकेही खाल्ले असतील. काहीतरी असेल- जे आत सलत, जळतही असेल. पण मिश्कील डोळ्यांमध्ये त्याचा दाह किंवा दु:ख अजिबात दिसत नाही. ‘तू माझा सांगाती’मध्ये पहिल्या दोन महिन्यांतच आलेगावकरांचं काम संपलं. बापूंचा मठातून मुक्काम हलला. आम्ही सगळेच हळहळलो. शेवटच्या दिवशी काम संपवून आलेगावकर पुण्याची एशियाड पकडायला रवाना झाले तेव्हा जवळजवळ लग्नानंतर वधूला निरोप देताना लग्नमंडपाबाहेर दिसतं तसं दृश्य स्टुडियोत होतं. आम्ही सगळेच त्यांना मिस करणार होतो. नंतर आलेगावकर व्हॉटस् अ‍ॅपवर संपर्कात राहिले.  ‘तुमच्या ‘सख्या रे’मध्ये तुम्ही मला घेत नाही राव,’ एकदा मला म्हणाले. ‘तुम्ही तिकडे पण किस्से सांगून टाइमपास करत बसाल. तिथे निर्माता आहे मी. लोकं तुमचे किस्से ऐकत बसले तर माझं काम राहील,’ मी म्हणालो. पण ते तितकंसं मनापासून नव्हतं. शूटिंगच्या झकाझकीच्या आणि धावपळीच्या वातावरणात आलेगावकरांचे किस्से हवेतच. सतत कपाळावर आठय़ा घेऊन वावरणाऱ्यांच्या जगात एखादा हसवणारा मिशीवाला हवाच! दिग्पाल लांजेकरच्या ‘र्फजद’ सिनेमाच्या सेटवर आलेगावकर अचानक भेटले. छोटीशी भूमिका मिळाली होती. ‘तुम्हाला सांगतो, मागं एक पिक्चर केला आम्ही. त्या निर्मात्याची भारी मजा बरं का..’ आलेगावकरांचा किस्सा सुरू झाला. डोक्यावरचं रणरणतं ऊन विसरून आम्ही सगळे भान हरपून ऐकत राहिलो.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com