राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात दरवर्षी भारतभरातून २० मुलामुलींची निवड होत असे. हल्ली हा आकडा वाढला आहे. पण आमच्या बॅचमध्ये आम्ही २० जण होतो. १४ मुलं आणि ६ मुली. जुलै महिन्यात सेशन सुरू झालं आणि साधारण जुलै संपेपर्यंत आम्ही सगळे एक कुटुंब झालो होतो. आपल्या बॅच-मेट्सबरोबर तीन र्वष तुम्ही जवळजवळ २४ ७ ७ असता. त्यामुळे त्यांचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळंच तुम्हाला पाठ होतं. पहिल्या दिवशी जेव्हा आपापसात आमच्या ओळखी झाल्या तेव्हा एका मुलीनं ‘संयोगिता शर्मा, उत्तरांचल से’ अशी ओळख करून दिली. आणि ती झाल्याच्या दीडाव्या सेकंदाला मी तिचं नाव विसरून गेलो. तेलानं चप्प बसवलेले केस. आत गेलेले खोलगट डोळे. उंची पाच फुटांपेक्षा थोडी कमीच. एक पायघोळ रंगीत स्कर्ट घातलेला आणि त्याला अजिबात मॅच न होणारा  राखाडी रंगाचा वर टी-शर्ट.. असं त्या मुलीचं ध्यान होतं. वर्ष सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच मला माझ्या बॅचमधल्या इतर अठराजणांची नावं, गावं तोंडपाठ झाली होती. अगदी वडिलांच्या नावासकट. पण संयोगिता शर्मा हे नाव जिभेवर चढायला आणि मेंदूत फिट बसायला आठवडा गेला. ‘वो यार वो तेलवाली लडकी’ असाच आम्ही तिचा उल्लेख करत असू. नंतर एका वर्गात हेही कळलं, की आमच्या संपूर्ण बॅचमध्ये संयोगिता ही वयाने सगळ्यात मोठी आहे. ती ३२ वर्षांची होती. पण या बयेनं वयाची तिशी ओलांडली आहे, हे तिच्याकडे पाहून कधीच वाटलं नाही. मला तर ती गल्ली चुकून ड्रामा स्कूलमध्ये आल्यासारखी वाटे. कारण होतकरू रंगकर्मीच्या अंगी मुबलक आढळणारा उत्साह वा चुणचुणीतपणा तिच्या अंगी नव्हता. साधारण आपण वर्गात बसून देशावर उपकार करतोय अशा आविर्भावात ती संथपणे वर्गात येत असे. वर्गात तिला काही कळलंय, नाही कळलंय, पटलंय, आवडलंय, तिला घरची आठवण येतेय की दुपारी मेसमध्ये जेवायला काय असेल याचा विचार ती करतेय- कुठल्याच गोष्टीचा थांगपत्ता तिच्या चेहऱ्याकडे पाहून लागत नसे. चुकून एखाद्या शिक्षकानं तिला प्रश्न विचारलाच, तर त्याच्या उत्तरादाखल ती जे बोले ते ऐकून मला मांजा तुटून आकाशात भरकटणाऱ्या पतंगाची आठवण होई. तिला तिच्या शाळेत बहुधा पूर्णविराम ही संकल्पना शिकवायला विसरले असावेत. तिची वाक्यं संपतानाही स्वल्पविरामानं संपत. या मुलीला आपल्याशी आणखी काहीतरी बोलायचं आहे असं ऐकणाऱ्याला नेहमी वाटे. त्यामुळे आमच्या बॅचमध्ये नेहमीच आम्ही १९ मुलंमुली अधिक एक संयोगिता असंच गणित पहिल्यापासून तयार झालं. त्याच दरम्यान तिला आम्ही ‘संयोग माता’ म्हणून हाक मारू लागलो.

दिल्लीत वा जवळपास राहणारी मुलं शनिवार-रविवारी आपापल्या घरी जात. संयोग माता ही शनिवारी जी अंतर्धान पावत असे ती थेट सोमवारी सकाळी पहिल्या वर्गाला उगवत असे. अनेकदा तिचा तोही चुकायचा. नंतर आमच्या असंही लक्षात आलं, की दर सोमवारी जेव्हा ही परत येते तेव्हा कुठेतरी पडूनधडून जखमी होऊन येते. आधी याचीही आम्ही थट्टाच केली. ‘लगता है बुढ्ढी औरत के चष्मे का नंबर बढम् गया है..’ आमच्यातल्या एकानं एकदा शेरा मारला. पण एका सोमवारी ती भलामोठा सुजलेला, काळानिळा पडलेला डोळा घेऊन आली आणि आम्हाला सगळ्यांना वेगळाच संशय आला. मुलींनी तिला गर्ल्स हॉस्टेलमध्ये नेऊन तिची पोलीस चौकशी केली. तेव्हा कळलं, की मातेचा एक प्रियकर होता. ती उत्तरांचलमध्ये थिएटर करत असताना त्यांची मैत्री झाली होती. त्यानंही आमच्याबरोबर एन. एस. डी.ची परीक्षा दिली होती, पण त्याचं सिलेक्शन झालं नव्हतं. आता तोही दिल्लीतच भाडय़ानं खोली घेऊन राहत होता. संयोगिता दर शनिवारी त्याच्याकडे जायची. तिच्या अंगावरच्या जखमा पाहता त्या दोघांची लव्हस्टोरी ही अत्यंत व्हायोलंट लव्हस्टोरी आहे हे उघड होतं. हे कळल्याबरोबर आमच्या तलवारी बाहेर पडल्या. ‘साले को पकड के पीटते हैं’ असा फतवा निघाला. तिला भेटायला तो एन. एस. डी.च्या गेटवरच येत असणार! आला की खिंडीत गाठून बदडून काढू या! आमच्या मैत्रिणीवर हात उचलतो म्हणजे काय? इतके दिवस १९ अधिक एक असलेली ही संयोग माता आता अचानक आमची झाली होती. एन. एस. डी.च्या विद्यार्थ्यांमध्ये ही एक गमतीदार भावना असते. एरवी आपापसात कचाकचा भांडू, पण परकीय आक्रमणाला तोंड द्यायला सगळे बंद मुठीसारखे घट्ट होतात. वयं पंचाधिकम् शतं!

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

त्या दुपारी लंच ब्रेकमध्ये फर्स्ट इयर बॅचची मीटिंग भरली. ‘ओय, यू चिंता ना करियो. पैन के टके को उलटा लटका के मारेंगे.’ आमचा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह राजेश शर्मानं ऐलान करून टाकलं. मातानं शांतपणे ऐकून घेतलं. मग उभी राहिली. ‘इफ एनी वन ऑफ यू टचेस हिम, आय विल स्क्रू युवर हॅपिनेस!’ असं बोलून ती तडातडा निघून गेली. होळीच्या मोसमात आपण कामावर निघालेलो असताना कुठल्यातरी इमारतीतून पाण्यानं भरलेला फुगा येऊन बचकन् आपल्या छाताडात बसावा तशी आम्हा सगळ्यांची अवस्था झाली.

आम्ही मातेचा नाद सोडला. हिलाच मार खायची हौस; तर आपण कशाला डोक्याला ताप करून घ्या? असा विचार करून आम्ही आपापल्या मार्गाना लागलो. बरं, दरवेळी ती त्याच्याकडे गेली की जायबंदी होऊनच येत असे असं नाही. कधीतरी परत यायची तेव्हा अत्यंत आनंदी असायची. एकदा मी हॉस्टेलकडून स्कूलकडे निघालो होतो. सोमवारच होता. टंगळमंगळ करत चाललो होतो. धप्प! पाठीत कुणीतरी धपाटा घातला. वळून बघतो तर माता! ‘चाय माठरी खायेगा?’ ती चक्क हसत होती. फुकटचा चहा आणि मठरी कोण सोडतो, म्हणून मी हो म्हटलं. मंडी हाऊसच्या तोंडावर असलेल्या चहावाल्याकडे आम्ही उभे राहिलो. माता नळ गळावा तशी बडबडत होती. एकूणच तिचा आणि प्रियकराचा वीकेंड मजेत गेला होता. मलाही बरं वाटलं. हवामानाचा आढावा घेऊन मीही खडा टाकला- ‘यार, लेकिन वो तुझे मार कैसे सकता है?’ त्यावर ती मॉन्टेसरीतल्या मुलीसारखे डोळे करत म्हणाली, ‘तो क्या हुआ? प्यार भी तो करता है!’ मला पुढे काय बोलावं तेच कळेना. हीच मुलगी वर्ल्ड ड्रामाच्या वर्गात इब्सेनचा स्त्रीवाद, त्याच्या नायिकेनं- नोरानं नवऱ्याच्या गुलामगिरीतून मुक्त होताना दाराबाहेर उचललेलं पाऊल- यावर जेव्हा तावातावानं चर्चा करायची तेव्हा आपण गांजा पिऊन बसलेल्या माणसाच्या तोंडून अथर्वशीर्ष ऐकतोय असं वाटायचं.

सेकंड इयरला गेल्यावर संयोगिता डिरेक्शन अ‍ॅण्ड डिझाइनला गेली आणि आमचे वर्ग वेगळे झाले. एकूणात ती काही चमत्कार करेल अशी आमची कुणाचीच अपेक्षा नसे. त्यामुळे तिच्या कुठल्याही एक्सरसाइजमध्ये काम करायला आम्ही सगळेच निरुत्साही असायचो. एकदा तर तिच्या ‘लायटिंग’च्या एक्सरसाइजला तिला वर्गातल्या सर्वानी नकार दिल्यावर तिनं मेसमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांना घेऊन तिची एक्सरसाइज पूर्ण केली होती. फॅकल्टीनं आम्हाला त्यावरून भयंकर तडी दिली होती. पण तरी आम्हाला त्याचं काही वाटलं नाही. मातेला कोण झेलणार? या बाबतीत आमचं सगळ्यांचं एकमत होतं. पण तिसऱ्या वर्षी आमची सुटका नव्हती. तिसऱ्या वर्षांच्या अखेरीस सर्व दिग्दर्शकांना एक डिप्लोमा प्रॉडक्शन करावं लागतं. त्यात त्यांच्याच बॅचमधल्या अभिनेत्यांना काम करावं लागतं. मातेच्या डिप्लोमा प्रॉडक्शनमध्ये काम करण्याची बिलामत कुणावर येणार, यावर आमच्या वरचेवर चर्चा होत असत. कुणालाच तो प्रसंग आयुष्यात नको होता.

या सगळ्यामध्ये एक रोमहर्षक प्रसंग घडला. एके रात्री आम्ही दोन-चारजण स्कूलच्या आवारात थांबलो होतो. फार दिवसांनी मोकळा वेळ मिळाला होता. त्यामुळे गाणी, गप्पा, जुन्या आठवणींची मैफल रंगली होती. कडाक्याच्या थंडीचे दिवस असल्यानं साथीला ‘ओल्ड मंक’ही होतीच. त्याच वेळी माता कॉरिडोरच्या टोकाला दिसली. तिला कुणीतरी मुलगा सोडायला आला होता. हाच तिचा तो मारकुटा प्रियकर असणार याबद्दल आमची मनोमन खात्री पटली. हेमंतसिंग खेर हा आमचा गुजराती बॅचमेट काडी लावलेल्या सुतळी बॉम्बसारखा पेटला. ‘इसको आज नहीं छोडेंगे.’ माता तिची तिची कॉरिडोरमधून निघून गेली आणि शिवरायांच्या मावळ्याला लाजवेल अशा चपळाईनं हेमंतनं त्या मुलावर हल्ला चढवला. काय घडतंय हे कळायच्या आत त्याची कॉलर धरून त्याला दोन-तीन बमके लगावले. इतका वेळ हेमंतकडे पाहून मला वाटलं होतं- हा नाही, याच्यातला ओल्ड मंक बोलतोय. हा कुठला जातोय मारामारी करायला? पण प्रसंग असा हातघाईवर आल्यावर आम्ही धावलो. हेमंतला बाजूला घेतलं. त्या मुलाकडे पाहिलं. बागेत फिरताना अचानक डोक्यावर नारळ पडल्यावर जशी एखाद्याची अवस्था होईल तशी त्याची अवस्था झाली होती. मी ओल्ड मंकचा भक्त आणि भोक्ता नसल्याने सुरळीत संभाषण करण्याच्या स्थितीत मी एकटाच होतो. चौकशीअंती कळलं की, हा गरीब बिचारा मुलगा म्हणजे तो आदमखोर प्रियकर नव्हे. हा त्याचा मित्र होता- जो आपल्या वहिनीला सुखरूप सोडायला आला होता. हेमंतचा राँग नंबर लागला होता. मी हातापाया पडून त्या मुलाला रवाना केलं. आणि नंतर आम्ही सगळे बाटली फुटावी तसे हसत सुटलो. दुसऱ्या दिवशी कॅन्टीनजवळ मातेनं मला गाठलं आणि ‘न भूतो न भविष्यती’ अशा शिव्या घातल्या. तिच्या कन्फ्यूज्ड डोक्यात कुठूनतरी हे शिरलं होतं, की काल तिच्या मित्रावर जो सर्जिकल स्ट्राइक झाला त्याचा म्होरक्या मीच होतो. मग मीही तोंडावरचं कुलूप काढलं आणि इतिहासात नोंद होईल असं जंगी भांडण आमच्यात झालं. अख्खा दिवस भयंकर मन:स्तापात गेला. पण त्या रात्री माझा रूममेट मला हळूच म्हणाला, ‘बच गया तू, अब उसके डिप्लोमा प्रॉडक्शन में वो तुझे नहीं लेगी. हंड्रेड परसेंट.’ या सुखद परिणामाची मला कल्पनाच नव्हती. मला हर्षवायू झाला. पण सुखाच्या पडद्याआडच दु:खाचा बागुलबुवा लपलेला असतो. एका सकाळी संयोगितानं आपल्या डिप्लोमा प्रॉडक्शनची कास्ट लिस्ट वर्गात वाचली आणि त्यात प्रमुख भूमिकेसाठी तिनं वाचलं- ‘डायनेशियस : चिन्मय दीपक मांडलेकर.’      क्रमश:

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com