01 December 2020

News Flash

ऊर्मिला

अशा प्रकारे दादरच्या सी. सी. डी.मध्ये माझी आणि ऊर्मिलाची पहिली भेट झाली.

अशा प्रकारे दादरच्या सी. सी. डी.मध्ये माझी आणि ऊर्मिलाची पहिली भेट झाली.

ऊर्मिला आणि माझी पहिली भेट हा आमच्या एका कॉमन फ्रेंडनं ‘मॅच मेकिंग’चा केलेला एक बावळट प्रयत्न होता,  हे कळायला मला काही दिवस लागले. मुदतीच्या तापातनं एखादा माणूस बाहेर यावा, तसा मी नुकताच एका ‘ब्रेकअप्’मधून बाहेर येत होतो. प्रेमभंगातून बाहेर पडण्यासाठी माणसं अनेक आचरट प्रयत्न करतात. काहीजण केस वाढवतात. काहीजण केस कापतात. काहीजण व्यायाम करायला लागतात. काहीजण दारूप्यायला लागतात. तर काहीजण दारू सोडून अध्यात्माला लागतात. मी खूप खायला लागलो. मला सतत भूकच लागत असे. सकाळी नवाला आमलेट-पाव उडवला की साडेनऊला मी उडप्याकडे बसून दोन- दोन मसाले डोसे फस्त करत असे. त्याचे आंबट ढेकर विरेपर्यंत अकरा वाजता पुन्हा पोटात आग लागल्याचा भास होई. मग ती शमवण्यासाठी घरातले डबे उचकटून ठेवणीतले लाडू, चकल्या, चिवडे, केळा वेफर यांची शिकार चाले. मग एक-दीडला जेवण. ते झालं की परत संध्याकाळच्या चहाबरोबर बारबन बिस्किटाचे पुडेच्या पुडे उडत. संध्याकाळ आली की मन जास्त उदास होतं, अशी कविकल्पना मनावर ठसलेली असल्यानं संध्याकाळी माझा हा भस्म्या रोग जास्तच बळावे. मग भेळपुरीपासून मटण बिर्याणीपर्यंत कुठलाही विधिनिषेध न बाळगता मी समोर पडेल ते पोटात ढकलत सुटत असे. एवढं सगळं झाल्यावर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही म्हणून रात्री एक-दोन वाजताचा एक वेगळा ‘स्नॅक’ होताच. हिंदी सिनेमाच्या हीरोंचे प्रेमभंगात ‘दिल’ जळत असतात. माझ्याबाबतीत नेम थोडा खाली लागला होता. कुवैतमधली तेलाची विहीर जळावी तशी पोटात सतत आग लागलेली असे. मग एकटं बसून खायला बोअर होतं म्हणून मी पार्टनर शोधत असे. असंच एकदा इराण्याकडे बसून खिमा-पाव हादडत असताना माझी ही मैत्रीण मला म्हणाली, ‘तू ऊर्मिलाला ओळखतोस ना?’ ‘कोण ऊर्मिला?’ मी दाढांमध्ये सापडलेला पाव  घशात ढकलत विचारलं. ‘मैत्रीण आहे माझी. तिनं एक एकांकिका लिहिलीय. तिला जरा गायडन्स हवाय.’ ‘भेटतो. तू कॅरमेल कस्टर्ड खाणार?’

अशा प्रकारे दादरच्या सी. सी. डी.मध्ये माझी आणि ऊर्मिलाची पहिली भेट झाली. त्या भेटीत मी एकटय़ानंच एक अख्खं चिकन ओपन सँडविच चेपल्याचं मला आठवतं. बाकी त्या भेटीमध्ये संस्मरणीय असं काहीच नव्हतं. मैत्रिणीची मैत्रीण या नात्यानं मी ऊर्मिलाला भेटलो. तिनं जी काही एकांकिका लिहिली होती तिचं बाड तिनं मला दिलं. मी ते घेतलं. माझा बकाणा भरून होईपर्यंत उगीच इकडतिकडच्या गप्पा मारल्या आणि मी घरी परतलो. ऊर्मिलाच्या एकांकिकेची स्क्रिप्ट माझ्या बाईकच्या डिकीत मी ठेवली, ती पुढचे सात दिवस तिथेच राहिली. आहे-नाही ते सगळं अन्न संपवून या जुल्मी जगावर सूड घेण्याच्या माझ्या मिशनमध्ये मी ऊर्मिला आणि तिची एकांकिका पार विसरून गेलो. सात दिवसांनी फोन वाजला. ‘कशी वाटली?’ समोरून सवाल झाला. मी बावळटासारखा ‘कोण?’ असं विचारणार होतो, पण वेळीच मी स्वत:ला सावरलं. त्यावेळीही मी पाल्र्याच्या ‘फडके बंधू’ची गुलकंद बर्फी तोंडात कोंबत होतो. ‘आपण भेटून बोलू या ना..’असं म्हणून मी उगीच खाण्याचे मोठमोठय़ानं आवाज करत फोन ठेवला. खाली धावलो. बाईकच्या डिकीतून ते स्क्रिप्ट काढलं. घराचे चार मजले चढून वर येईपर्यंत अधर्ं वाचून झालं होतं. ऊर्मिलानं एकांकिका म्हणून जे काही लिहिलं होतं ते अतिशय बाळबोध होतं. ‘अरेंज्ड मॅरेज’च्या घोडेबाजारात उतरलेल्या तरुणीची ती गोष्ट होती. तिला ‘दाखवण्याच्या’ कार्यक्रमात येणारे विविध अनुभव एकामागोमाग एक लिहिलेले होते. बाकी एकांकिका म्हणून त्याला काही विशेष अर्थ नव्हता. त्यातले काही प्रसंग तर अशक्य वाटतील असे होते. एका ‘दाखवायच्या’ कार्यक्रमात त्या लग्नाळू मुलीला तिची प्रॉस्पेक्टिव्ह सासू विचारते, ‘कर्जत फास्ट लोकल सी. एस. टी. ते कर्जतमध्ये कुठल्या कुठल्या स्टेशनांवर थांबते, सांग बघू!’

‘हे जरा अति आहे असं नाही वाटत?’ मी संध्याकाळी पुन्हा त्याच सी. सी. डी.मध्ये तिच्यासमोर ते स्क्रिप्ट ठेवत म्हटलं. ‘अति म्हणजे?’ तिने शांतपणे विचारलं. ‘कम ऑन यार! असे प्रश्न कोण कोणाला विचारतं?’ ‘मला विचारला होता हा प्रश्न.’ ती तितक्याच निर्विकारपणे म्हणाली. मला पुढे काही सुचेचना. ‘म्हणजे.. हे जे तू लिहिलंयस..’ ‘यातला शब्द न् शब्द माझ्या बाबतीत घडलेला आहे. जसाच्या तसा. तो मुलगा सेंट्रल साइडला राहणारा होता. कळव्याला. माझा अख्खा जन्म वेस्टर्ननं प्रवास करण्यात गेला. त्याच्या आईनं मला हे विचारलं होतं.’ ‘मग तू सांगितलीस स्टेशनांची नावं?’ मी जगातला सगळ्यात माठ प्रश्न विचारला. ‘मी मोटरमन असते तरी मला लक्षात राहिली नसती सगळी स्टेशनं.’ ‘मग?’ ‘मग काय? रिजेक्ट!’ ‘ पण यात तू जवळजवळ बारा-तेरा असे प्रसंग लिहिलेयस. म्हणजे तुझे आतापर्यंत..’ ‘सत्तेचाळीस! सत्तेचाळीस वेळा कांदे-पोहे झालेत. रेशो बावीस इज टू पंचवीस आहे.’ ‘बावीस इज टू पंचवीस?’ अनेक महिन्यांत पहिल्यांदा मी समोर ताटात अन्न असूनही त्याला हात लावत नव्हतो. ‘हा.. म्हणजे बावीस वेळा तिकडून नकार आलाय. पंचवीस वेळा मी नकार दिलाय.’

ऊर्मिलानं लिहिलेल्या त्या एकांकिकेचं पुढे काय झालं, देव जाणे. मुळात स्वत: लेखिका वगैरे होण्याचा तिचा अजिबात मानस नव्हता. एका मोठय़ा कंपनीत दणदणीत पगाराची नोकरी होती तिला. घरचं सगळं छान होतं. आई-वडिलांची लाडाची मुलगी. मोठा भाऊ होता. त्याचं नुकतंच लग्न झालं होतं. खरं तर पु. लं.च्या ‘चौकोनी कुटुंबा’प्रमाणे हे कुटुंबही सुखी असायला हवं होतं. पण लग्नाच्या बाजारात येऊन घोडं तटलं होतं. ‘तुझं कधी अफेअर वगैरे नाही झालं?’ आमची ओळख वाढल्यानंतर मी तिला विचारलं होतं. ‘ कॉलेजच्या लास्ट इयरला झालं होतं. पण ते मोडलं.’ स्वत:बद्दल ही माहिती देताना ऊर्मिलाच्या आवाजात रेडिओवर बातम्या वाचणाऱ्याची अलिप्तता होती. ‘पण मी काय म्हणतो- लग्नाची एवढी घाई काय आहे? तू किती असशील? सव्वीस-सत्तावीस?’ ‘पंचवीस.’ ‘मग? अ‍ॅट ट्वेंटी फाइव्ह यू हॅव अ गुड जॉब! गुड करीअर. व्हॉट्स द रश?’ ‘ मला नाहीच आहे. पण आई-बाबांना वाटतं.’ ‘मग तू सांग त्यांना- थांबा म्हणून.’ ‘आई म्हणते, वीस ते पंचवीस वय कासवाच्या पावलांनी जातं, पण पंचविशीची तिशी होताना सशाच्या वेगानं पळतं.’ मी कुठल्यातरी सीरियलच्या स्क्रिप्टमध्ये दडपायला म्हणून आईचं हे वाक्य लक्षात ठेवत गप्प बसलो. त्यानंतर ऊर्मिलाकडून तिच्या ‘बघण्याच्या’ कार्यक्रमांबद्दल वरचेवर कळायचं. आता मात्र ऊर्मिलाचा ‘रेशो’ भलताच विस्कळीत झाला होता. तिला समोरून नकार यायच्या आधी तीच धडाधड ‘रिजेक्ट’चा स्टॅम्प मारून मोकळी होई. ‘तो फक्त ग्रॅज्युएट आहे.’ ‘अरे, महिना अडीच लाखांचं इन्कम असून उपयोग काय? स्वत: काहीच करत नाही. वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं भाडं खातोय बसून.’ ‘तो माझ्यापेक्षा बुटका आहे.’ ‘तो नारंगी रंगाची पॅन्ट घालून आला होता.’ ‘त्याच्या आठ बोटांमध्ये अंगठय़ा होत्या.’ ‘आवडला होता, पण निघताना त्याला पाठमोरा पाहिला. मागून टक्कल पडलंय त्याला.’ ‘फोनवरच रिजेक्ट केलं त्याला. ‘हाय बेब्ज्!’ असं म्हणाला तो मला.’ ‘त्यानं वेटरसाठी टिपच ठेवली नाही.’ ‘त्यानं शंभर रुपये टिप म्हणून ठेवले. ब्लडी शो ऑफ!’ ‘‘अंदाज अपना अपना’ आवडत नाही म्हणाला! ही इज नॉट अ राइट पर्सन.’ ‘तसा हा बरा होता.. पण बराच होता.’ अमेरिकन एम्बसीतली माणसं इच्छुकांच्या पासपोर्टवर ज्या धडाडीनं ‘रिजेक्ट’चा स्टॅम्प मारतात, त्याच धडाडीनं ऊर्मिला मुलं नाकारत सुटली होती.

‘तिचा मेजर प्रॉब्लेम झालाय.’ आमची ती कॉमन फ्रेंड एकदा मला म्हणाली. ‘आता तिला कुणी आवडतच नाही.’ ‘सॅड यार!’ मी म्हणालो, ‘एरवी मस्त मुलगी आहे ती.’ ‘मस्त आहे तर तू का नाही पटवलीस?’ माझी मैत्रीण माझ्या दंडावर चापट मारत म्हणाली. ‘म्हणूनच तर तुमची भेट घडवून आणली होती. तूही तेव्हा देवदास होतास. म्हटलं, यांचं जुळलं तर बरंच आहे.’ मला हसावं की रडावं, तेच कळेना. ‘मैंने तुम्हे उस नजर से कभी नहीं देखा’ हे तोवर मला हिंदी सिनेमातलं एक भंपक वाक्य वाटत होतं फक्त. पण ऊर्मिलाच्या बाबतीत ते खरंच होतं. एव्हाना ऊर्मिलाचा स्कोअर साठचा आकडा ओलांडून गेला होता. सुरुवातीच्या काळात मुलांकडून अत्यंत फालतू आणि अपमानास्पद कारणांसाठी मिळालेल्या नकारांचा ती मनसोक्त सूड उगवत होती. ‘साले, समजतात काय स्वत:ला? त्याची ती जाडी आई ओपनली माझ्या बाबांना सांगते- तुम्हाला आमच्या राहुलसाठी फ्लॅट घेऊन द्यावा लागेल. मी तोंडावर बोलले त्या जाडीला- लायकी नाही तुमची, तर मुलगा काढलाय कशाला? लग्न करायला? ब्लडी व्हल्चर्स!’ ती हे असं बोलू लागल्यावर मात्र त्याच रेडिओ स्टेशनवर अचानक ममता बॅनर्जीना आणून बसवल्याचा भास होई. तोवर मीही प्रेमभंगाच्या माझ्या तापातून पुरता बरा झालो होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘असंभव’ मालिका सुरू झाली होती. त्यामुळे मरायलाही वेळ मिळेनासा झाला होता. त्यानंतर जवळजवळ सात-आठ महिने ऊर्मिलाची काहीच खबरबात नव्हती. एके दिवशी अचानक मेसेज आला- ‘लिव्हिंग फॉर कॅनडा शॉर्ट्ली. मीट इफ पॉसिबल.’ आम्ही पुन्हा त्याच सी. सी. डी.मध्ये भेटलो. ऊर्मिला खूश दिसत होती. ‘जॉब घेतलाय मी तिथे. आता परत येईन असं वाटत नाही.’ ‘आई-बाबा?’ मी विचारलं. ‘आईनं इमोशनल ड्रामा केला. पण म्हटलं, लग्न करून सासरी पाठवणारच होतात मला- तसंच हे समजा.’ ‘त्या फ्रंटवर काय प्रगती?’ मी विचारलं. ‘ती फ्रंट बंद केली मी. कायमची. नो मोअर कांदेपोहे.’ ‘पण मग लग्न?’ ‘देवाक काळजी.’ ती माझी-ऊर्मिलाची शेवटची भेट. त्यानंतर अद्याप आम्ही प्रत्यक्ष भेटलेलो नाही. ती कॅनडाला निघून गेली. आजही ती तिथेच आहे. नंतर काही वर्षांनी तिच्या फेसबुक प्रोफाइलवर तिचा आणि मार्कचा फोटो दिसला. कांदे-बटाटे केल्यासारखी ती जवळजवळ त्याच्या पाठीवर बसली होती. फोटोत मार्क धिप्पाड वाटतो. त्याच्यासमोर ऊर्मिला म्हणजे ग्रेट खलीसमोर राजपाल यादव उभा राहिल्यासारखं वाटतं. मार्क आफ्रिकन अमेरिकन (म्हणजे ज्याला आपण ‘निग्रो’ म्हणतो) आहे. दोन वर्षांपूर्वी ऊर्मिला आणि मार्कनं कॅनडातच एका हिंदू मंदिरात हिंदू पद्धतीनं विवाह केला. फॅमिली फोटोमध्ये ऊर्मिलाचे आई- बाबा आणि ऊर्मिला यांच्यात उभा असलेला मार्क हा लिलीपुटीयन्सच्या शहरात उभ्या असलेल्या गलिव्हरसारखा वाटतो. माहीममध्ये राहणाऱ्या या मराठी मुलीची गाठ अमेरिकेहून कॅनडात गेलेल्या या निग्रो मार्कशी पडायची होती तर! त्याच्या मधे साठपेक्षा जास्त कांदेपोह्यचे कार्यक्रम घडवून देवानं नेमकं काय साधलं, हे त्याचं त्यालाच ठाऊक. पण त्या फोटोतही ऊर्मिलाच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद इथे सातासमुद्रापार माझ्यापर्यंत पोहोचत होता.

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 1:28 am

Web Title: when author chinmay mandlekar meet urmila
Next Stories
1 निघोजकर
2 नरेश देसाई
3 वाळिंबे
Just Now!
X