21 February 2019

News Flash

नरेश देसाई

कॅमेराबरोबरची ही दोस्ती करायला नरेशदादांनी मला खूप मदत केली.

नरेश देसाई

माणसाचं शिक्षण कधीच संपत नाही. हा केवळ सुवाच्य अक्षर असलेल्या मुलानं शाळेच्या फळ्यावर लिहिण्याचा सुविचार नव्हे. हे सत्य आहे. आणि कलेच्या क्षेत्रात तर ही काळ्या दगडावरची रेघ आहे. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून अभिनयाचं प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर ‘आता आपल्याला आलंच की हो!’ नावाचा जो एक फुगा तयार होतो, तो साधारण कॅमेऱ्यासमोरच्या पहिल्याच ऑडिशनमध्ये टचकन् फुटतो. माझा तरी फुटला. स्ट्रगलच्या काळातल्या पहिल्या तीन-चार धक्क्यातच माझ्या लक्षात आलं होतं, की आपल्याकडे ताम्रपत्रावर उत्तम कोरीवकाम केलेली अभिनयाची डिग्री असली तरी ‘कॅमेरा’ या विषयाचं आपलं ज्ञान जवळजवळ शून्य आहे. आणि ‘कॅमेरा’ हा आजच्या जगात ऑप्शनला टाकायचा विषय नाही. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात हा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. इथे कॅमेऱ्यासमोर अभिनय करण्याचं प्रशिक्षण दिलं जात नाही. किंबहुना त्याकडे किंचित क्षुद्रपणेच पाहिलं जातं. पण जेव्हा रा. ना. विद्यालयाच्या गुणगौरवाचे पोवाडे गायले जातात तेव्हा नसीरुद्दीन शाह, ओम पुरीपासून इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दिकीपर्यंत कॅमेरा माध्यमातून यशस्वी झालेल्या कलाकारांचाच उदोउदो होतो. असो. मुद्दा हा, की मी २००३ साली रा. ना. विद्यालयामधून बाहेर पडलो होतो आणि २८ एप्रिल २००४ ला मी ‘वादळवाट’ या माझ्या पहिल्या मालिकेतला पहिला शॉट दिला. स्वत:ला पहिल्यांदा ‘मॉनिटर’वर पाहिलं तेव्हा मी घाबरलोच. हा कोण? मी? मग माझे कान एवढे मोठे का वाटतायत? जेसीबीच्या फावडय़ासारखे माझे दात पुढे का आहेत? माझ्या नजरेचा हा भ्रम आहे, की माझा चेहरा किंचित वाकडा आहे? असे असंख्य प्रश्न मला पहिल्या तीन सेकंदांत पडले. मी दिग्दर्शक असतो तर मी मला कधीच कास्ट केलं नसतं, हे मला तत्क्षणी पटलं. हाताला घाम फुटलेल्या अवस्थेतच मी पुढचे काही शॉट्स दिले. एकतर शूटिंगचा सेट ही नवख्या माणसाला थोडी भांबावणारीच जागा असते. इतकी माणसं असतात! पण त्यातलं नेमकं कोण कुठल्या डिपार्टमेंटचं आहे, हे कळेपर्यंत आपलं आयुष्य नक्कीच संपेल असं वाटू लागतं. बरं, मला तोवर खोऱ्यानं केलेल्या प्रायोगिक नाटकांची सवय. प्रायोगिक संस्थेच्या बिऱ्हाडी प्रमुख नट, इतर नट, टेक्निशियन्स, बॅकस्टेजवाले अशी चातुर्वर्णीय पद्धत कधीच नसते. तिथे सगळेच सगळी कामं करतात. शूटिंगच्या सेटवर मात्र तसं नसतं. तुम्ही सेटवर मरत असाल आणि तेव्हा तुम्ही मेकअप आर्टिस्टकडे पाणी मागितलंत तर त्याही वेळी तो ‘स्पॉ२२२ट’ असंच ओरडणार.

लंच ब्रेकच्या थोडं आधी माझा ‘क्लोजअप’ लागला होता. दिग्दर्शक मंदार देवस्थळींनी ‘अ‍ॅक्शन’ म्हटल्यावर मी माझी वाक्यं बोलू लागलो. मी दोन वाक्यं बोललो असेन इतक्यात मला कॅमेऱ्याच्या मागे हालचाल जाणवली. स्वत: कॅमेरामन उठून उभे राहिले होते. मी थांबलो. सकाळपासून मी शूटिंग करत होतो, पण मी त्यांना डोळे भरून पाहिलंच नव्हतं. आता ते एकदम समोरच उभे ठाकले. राखाडी रंगाची थ्री-फोर्थ, गडद टी-शर्ट, गळ्यात जॅकी श्रॉफसारखा रुमाल बांधलेला, बेकायदा बांधकामांसारखी फोफावलेली काळी-पांढरी दाढी, डोक्यावर टोपी आणि हातात चिलमीसारखी धरलेली सिग्रेट. हे ‘सुंदर ते ध्यान’ म्हणजेच नरेशदादा. ‘वादळवाट’चे कॅमेरामन नरेश देसाई. त्यांनी सिग्रेटचा एक कडक झुरका घेतला आणि मला म्हणाले, ‘बाबा, तू देवानंदचा फॅन आहे काय?’ मला काहीच कळेना. मी बैलासारखी मान हलवली. एव्हाना दिग्दर्शकही उठला होता. ‘काय झालं दद्दू?’ पुन्हा एक झुरका. मग जोरात एक हाक. ‘सेटिंग! इस के मान को थोडासा टेकू लगाव.’ मी आणखीनच बुचकळ्यात. दद्दू सरळ चालत माझ्याजवळ आले. माझं डोकं हातात धरून माझी मान सरळ केली. ‘सकाळपासून बघतोय. डायलॉग बोलताना सारखी मान वाकडी करतो तू. सरळ उभा राहून बोल ना.’ मग माझ्या मानेला हात लावला. ‘इथला स्क्रू पडला असेल तर सेटिंगकडून बसवून घे.’ मला माझा भोटमपणा लक्षात आला. माझ्याही नकळत वाक्य बोलताना उगीच माझी मान वाकडी होत होती. लंच ब्रेकमध्ये मी नरेशदादांजवळ गेलो. ‘दद्दू सॉरी.’ ‘सॉरीचं काय बाबा? काम बरं करतो तू. कॅमेरा के साथ दोस्ती कर ले.’

कॅमेराबरोबरची ही दोस्ती करायला नरेशदादांनी मला खूप मदत केली. मुळात कुठल्या अँगलनं आपला मुखचंद्र कॅमेऱ्यासमोर कसा दिसतो याचं भान मला त्यांच्यामुळे फार पटकन् आलं. ‘वादळवाट’नंतर मला माझा पहिला सिनेमा मिळाला. राजीव पाटीलचा ‘सनई चौघडे’! त्याही सिनेमाला नरेशदादा ‘गॅफर’ होते. (गॅफर म्हणजे कॅमेरासाठी लागणारी प्रकाशयोजना जो माणूस करतो तो. तो कॅमेरामनचा उजवा हात असतो.) स्क्रीनवर दिसणारं आपलं ध्यान आपल्यालाच सुस व्हायला वेळ जावा लागतो. ते सुस होण्यात नरेशदादांनी मला खूप मदत केली.

तसे दद्दू वयानं मोठे होते. सिनेसृष्टीत त्यांनी अगदी खालच्या पायरीपासून सुरुवात केली होती. कॅमेरा अटेंडंट म्हणून. सत्तर-ऐंशीच्या दशकातल्या अनेक मोठय़ा सिनेमांशी नरेशदादा संबंधित होते. सामान्य कॅमेरा अटेंडेंटपासून ‘कॅमेरा : नरेश देसाई’ इथपर्यंतचा त्यांचा प्रवास गमतीदार होता. त्यात शिक्षणही बेताचं. ऐन तारुण्यात शिक्षण अर्धवट सोडून, एखाद्या उद्योगाची कास धरून त्यातल्या वरवरच्या पायऱ्या चढत जाणाऱ्यांपैकी नरेशदादा एक होते. आजचे प्रथितयश कॅमेरामन संजय जाधव यांच्या अनेक साहाय्यकांनी पुढे सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यापैकीच नरेशदादा एक. वयानं मोठे होते. आणि उत्साहानंही. त्यांच्या टीममधली लोकं त्यांचा उल्लेख ‘बुढ्ढा’ म्हणूनच करायची. पण ती चेष्टा नव्हती. ते प्रेम होतं. त्यांच्याबद्दल वाटणारा जिव्हाळा होता.

एरवी सेटवर वाघासारखा वावरणारा हा माणूस एका बाबतीत मात्र बावचळून जायचा. ती गोष्ट म्हणजे ‘नावं’! नरेशदादांना काही केल्या नावं लक्षात राहत नसत.  प्रत्येकाला ‘बाबा’ असं करून हाक मारण्याची सवय त्यातूनच आली होती. ‘वादळवाट’च्या सेटवर अशीच एक अभिनेत्री एकदा दिवसभराचं शूटिंग संपवून घरी निघाली. मेकअप वगैरे काढून झाल्यावर निरोप घ्यायला म्हणून ती सेटवर आली. ती नरेशदादांसमोर गेल्यावर त्यांनी नेहमीचा एक अनोळखी लूक तिला दिला आणि म्हणाले, ‘काय म्हणते बाबा? बरेच दिवसांनी आली तू? हल्ली बोलवत नाहीत काय हे तुला?’ दिवसभर जिचा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्यासाठी यांनी लायटिंग केलं होतं तिलाच ते ओळखेनासे झाले होते. पण दद्दूंची शॉर्ट टर्म मेमरी दगलबाज असली तरी लाँग टर्म मेमरी दांडगी होती. उमेदवारीच्या काळात हिंदी सिनेसृष्टीतल्या मातब्बरांना त्यांनी जवळून पाहिलेलं. फावल्या वेळात नरेशदादा ‘भुले बिसरे गीत’ टाईपचे किस्से सांगायचे. ते सांगण्याची पद्धतही तिरपागडीच. ‘हेमामालिनी जाम आवडायची. तिचं शूटिंग असलं की मी भांग पाडून जायचा माहीत्ये. पण साला एकदा लंच ब्रेकमध्ये तिला जेवताना पाहिलं. उस के बाद प्यार खतम.’ रासभर भाताचे रस्सम्नं माखलेल्या हातांनी लाडवासारखे गोळे करून तोंडात ढकलणारी ‘ड्रीमगर्ल’ पाहून हवालदिल झालेले दद्दू चटकन् माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले!

पण दद्दूंच्या बाबतीतला एक अत्यंत ब्लॉकबस्टर किस्सा मला स्वत: संजय जाधवनं एकदा सांगितला होता. ‘कुर्बानी’ चित्रपटाचं शूटिंग. मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये. नरेशदादा तेव्हा साधे कॅमेरा अटेंडंट होते. एका दृश्यासाठी दिग्दर्शक फिरोज खान यांनी खास ‘सोळाची लेन्स’ मागवली होती. कुठलीही फ्रेम भव्यदिव्य करून दाखवण्यासाठी या लेन्सचा वापर होत असे. आणि त्या काळात ती लेन्स वापरणं म्हणजे कौतुकाची बाब मानली जायची. नरेशदादांच्या मालकांनी सगळा जामानिमा घेऊन आपल्या या अटेंडंटला ओबेरॉयला पाठवलं. फिरोज खान हे असे दिग्दर्शक, की ते शॉट सांगताना लेन्स कुठली लावायची हेही कॅमेरामनला सांगत असत. बाकीचे शॉट्स झाले. मग खानसाहेबांनी घोषणा केली- ‘सिक्स्टीन लगाव.’ नरेशदादा लेन्स आणायला धावले आणि त्यांच्या लक्षात आलं, की नेमकी तीच लेन्स आणायला ते विसरले आहेत. त्यांची भीतीनं गाळण उडाली. चळाचळा कापतच दद्दू कॅमेरामनपाशी गेले. त्यांना आपली अडचण सांगितली. कॅमेरामनही बेजार. ‘लेके आने में कितना टाइम लगेगा?’ नरेशदादा म्हणाले, ‘लेन्स गोरेगाव के ऑफिस में है.’ कॅमेरामन म्हणाले, ‘तू भाग जल्दी. मैं कुछ तो संभालता हूं.’ नरेशदादा निघाले. पण त्याचवेळी बाहेर लंचसाठी टेबल लावलं जात होतं. फाइव्ह स्टार हॉटेलमधलं जेवण. सकाळपासून उपाशीपोटीच मजुरी घडलेली. दद्दूंची पावलं थबकली. पटकन् थोडं ‘फाइव्ह स्टार’ जेवण पोटात ढकलूनच जाऊ असा घातक विचार मनात आला. त्यांनी काचेची प्लेट भरून पहिला घास ढकललाच होता, की ‘नरेश, यू फूल!’ अशी गर्जना ऐकू आली. दद्दूंनी भीतीनं वळून पाहिलं. मागे साक्षात् फिरोज खान उभे आणि त्यांच्या हातात पिस्तूल! ‘आय विल शूट यू!’ अशी रणगर्जना करत फिरोज खान पुढे सरसावले. दद्दूंनी जड अंत:करणानं फाइव्ह स्टार जेवणानं भरलेलं ताट तिथेच टाकलं आणि तिथून पळ काढला. पण खानही चिवट निघाला. त्यानं पाठलाग सुरू केला. ओबेरॉय हॉटेलपासून पारशी जिमखान्यापर्यंत ते पुढे धावतायत आणि मागे हातात पिस्तूल घेऊन जांबाज फिरोज खान धावतायत! शेवटी पारशी जिमखान्यापाशी आल्यावर दद्दू दमून कट्टय़ावर बसले. म्हणाले असतील, ‘घाल आता गोळी. आणखी किती पळू?’ पण त्यांनी वळून पाहिलं तर काही अंतरावर फिरोज खानही जीभ बाहेर काढून धापा टाकत बसले होते. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. शेवटी फिरोज खान उठले. जवळ येऊन दद्दूंची मानगुट धरली. ‘साले! इतना तो मैं झीनत अम्मान के पीछे भी नहीं भागता,’ असं म्हणत दद्दूंना ओढत पुन्हा ओबेरॉयच्या दिशेनं निघाले.

‘तू तिथे मी’ या माझ्या मालिकेलाही सुरुवातीला नरेशदादाच कॅमेऱ्यावर होते. त्याच दरम्यान त्यांची तब्येत खालावत गेली. एकदा शूटिंग करत असतानाच बातमी कळली.. नरेशदादा गेले. उद्या जेव्हा सिनेसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात श्रेष्ठांच्या यादीत दद्दूंचं नाव नसेल कदाचित; पण ते आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारे एक तंत्रज्ञ कलावंत होते याची ग्वाही त्यांच्याबरोबर काम केलेला प्रत्येक माणूस नक्कीच देईल. ‘वादळवाट’साठी सवरेत्कृष्ट छायाचित्रकाराचं पारितोषिक मिळाल्यावर नरेशदादांनी स्टेजवरून उतरायच्या आधीच घरी फोन लावला होता. ‘भेटला भेटला!’ ते आपल्या मंडळींना आनंदानं सांगत होते. कुठलंही शिक्षण-प्रशिक्षण न घेता काम हेच शिक्षण समजून सगळे टक्केटोणपे खाल्लेल्या माणसाचा तो मनस्वी आनंद होता. आजही एखादा माणूस कुणाच्या तरी नावावर येऊन अडलेला दिसला की ‘याचा दद्दू झालाय’ असं मी स्वत:शीच म्हणतो. माझ्या करीअरच्या सुरुवातीला त्यांनी मला जे दिलं त्यासाठी त्यांचे आभार नाही मानता आले कधीच. आज या लेखाच्या निमित्तानं.. ‘थँक यू दद्दू!’

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

First Published on March 26, 2017 1:50 am

Web Title: writer and stage director chinmay mandlekar article on naresh desai