06 December 2019

News Flash

मराठवाडय़ातील सहा मतदारसंघांत ११९ उमेदवार

मराठवाडय़ात ११ हजार ७३५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद : मराठवाडय़ातील सहा लोकसभा मतदारसंघांत ११९ उमेदवारांपैकी कोणाला खासदार करायचे याचा निर्णय गुरुवारी होणार आहे. या सहा मतदारसंघांमध्ये एक कोटी पाच लाख चार हजार १९१ मतदार आहेत. ‘मोदी हवे की मोदी नको’ असा प्रचाराचा केंद्रबिंदू करत करण्यात आलेल्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभा घेण्यात आल्या आहेत. बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हिंगोली जिल्ह्य़ातील चार मतदान केंद्रांवरचे पत्रे उडून गेल्याचे वृत्त आहे. मराठवाडय़ात ११ हजार ७३५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या मतदान केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून काही ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत.

या सहा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय पक्षाचे १७ उमेदवार रिंगणात आहेत. नोंदणीकृत पक्षाच्या ३८ उमेदवारांसह ११९ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. या वेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रथमच मतविभाजनाच्या गणितावर अधिक भर दिला असल्याचे दिसून येत आहे.

११ हजार ७३५ मतदान केंद्रे

सहा मतदारसंघांतील प्रमुख लढत असणारे उमदेवार

* नांदेड : अशोक चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध

प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)

* बीड : डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) विरुद्ध

बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

* उस्मानाबाद : राणा जगजीतसिंह पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध ओमराजे निंबाळकर (शिवसेना)

* परभणी : संजय जाधव (शिवसेना) विरुद्ध

राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

* हिंगोली : हेमंत पाटील (शिवसेना) विरुद्ध

सुभाष साबणे (काँग्रेस)

* लातूर : सुधाकर शृंगारे (भाजप) विरुद्ध मच्छिंद्र कामत (काँग्रेस)

बहुजन वंचितच्या कामगिरीवर लक्ष

दलित-मुस्लीम ऐक्याची हाक देत औरंगाबाद येथे बहुजन वंचित आघाडीमध्ये एमआयएमला घेण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला अधिक मते मिळवून देईल का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. नांदेडमधील उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांना किती मते मिळतात, याची उत्सुकताही नांदेडसह अन्य मतदारसंघात पाहावयास मिळते.

First Published on April 18, 2019 4:11 am

Web Title: 119 candidates in six constituencies in marathwada
Just Now!
X