*   अपक्ष माणिक कोकाटेंची उमेदवारी कायम

*   नाशिकमध्ये पाच, तर दिंडोरीत एकाची माघार

बंडखोर, अडचणीचे ठरू शकणारे अपक्ष यांच्या मनधरणीसाठी राजकीय पक्षांनी चालविलेले प्रयत्न शुक्रवारी थांबले. नाशिक मतदारसंघातून पाच, तर दिंडोरीत एकाने माघार घेतल्याने अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिक लोकसभेसाठी आता १८ उमेदवार रिंगणात आहेत.

नाशिक लोकसभेसाठी ३०, तर दिंडोरीसाठी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत नाशिकमधून सात, तर दिंडोरीत सहा अशा एकूण १३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. यामुळे नाशिकमध्ये २३ आणि दिंडोरीत नऊ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता शुक्रवापर्यंत मुदत होती. बंडखोर, अपक्षांच्या मनधरणीसाठी राजकीय पातळीवर जोरात प्रयत्न करण्यात आले. त्यात थोडेफार यश आले.  नाशिकमधून अपक्ष अर्ज भरणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे, छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, राजू कटाळे, रमेश भाग्यवंत आणि महेश आव्हाड यांनी माघार घेतली. नाशिक मतदारसंघात आता १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महायुतीचे हेमंत गोडसे, महाआघाडीचे समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, अ‍ॅड. वैभव अहिरे (बसपा), सोनिया जावळे (भारतीय ट्रायबल पार्टी), विनोद शिरसाठ (हिंदुस्तान जनता पार्टी), शिवनाथ कासार (बहुजन मुक्ती पार्टी), संजय घोडके (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), शरद आहेर, प्रकाश कनोजे, सिंधुबाई केदार, अ‍ॅड. माणिक कोकाटे, देवीदास सरकटे, धनंजय भावसार, प्रियंका शिरोळे, शरद धनराव, सुधीर देशमुख, विलास देसले यांचा समावेश आहे.

दिंडोरीत हेमराज वाघ यांनी माघार घेतल्याने रिंगणात आठ उमेदवार आहेत. त्यामध्ये डॉ. भारती पवार (सेना-भाजप महायुती), धनराज महाले (काँग्रेस-राष्टवादी महाआघाडी), जिवा पांडू गावित (माकप), बापू बर्डे (वंचित बहुजन आघाडी), अशोक जाधव (बसपा), दत्तू बर्डे, अ‍ॅड. टिकाराम बागूल, दादासाहेब पवार (राष्ट्रीय मराठा पक्ष) यांचा समावेश आहे. अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया लगेच पार पडली. त्यामध्ये ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, कारंजा, बलून, लॅपटॉप, गॅस सिलिंडर, टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा, ऑटो रिक्षा आदींचा अंतर्भाव आहे.

बंडखोरी रोखण्यात अपयश

माघारीच्या मुदतीत बंडखोरांचे ताबूत शांत करण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते. परंतु नाशिकमध्ये मात्र माजी आमदार माणिक कोकाटे यांची बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आले. याच काळात कोकाटे यांना अपसंपदेच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली होती. अशा दबावतंत्राला घाबरत नसल्याचे सांगून कोकाटेंनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे सांगितले होते. समर्थकांचा मेळावा घेत शक्तिप्रदर्शनही केले. मराठी क्रांती मोर्चासाठी पुढाकार घेणारे छावा संघटनेचे करण गायकर यांनी माघार घ्यावी म्हणून सेनेने प्रयत्न केले. यामुळे त्यांनी माघार घेतली. भाजपला बंडखोराला थांबविता आले नाही.

नाशिक, धुळ्यात जादा बॅलेट युनिट

माघारीनंतर नाशिक मतदारसंघात १८ उमेदवार आणि एक (नोटा) असे एकूण १९ नावे, तर धुळे मतदारसंघात २८ आणि एक असे २९ नावे बॅलेट युनिटमध्ये समाविष्ट करावी लागणार असल्याने जादा यंत्र लागणार आहेत. उमेदवारांची संख्या १६ हून अधिक झाल्यास जादा बॅलेट युनिटची गरज भासते. एका बॅलेट युनिटवर साधारणपणे १६ उमेदवारांची नावे समाविष्ट होतात. त्यात ‘नोटा’ पर्याय समाविष्ट असल्याने केवळ १५ उमेदवारांची नावे समाविष्ट करता येतात. उमेदवारांची संख्या त्यापेक्षा एकने अधिक झाल्यास अतिरिक्त बॅलेट युनिटची गरज पडते. नाशिकमध्ये उमेदवारांची संख्या १८ असल्याने यंत्रणेने त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.