20 October 2019

News Flash

मोदींचा फोटो असलेले तिकीट दिल्याने दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचे निलंबन

यापूर्वीही आचारसंहिता लागू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेली रेल्वेची आणि विमानाची तिकीटे प्रवाशांना दिल्यावरुन निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या.

बारांबाकी : मोदींचा फोटो छापलेले तिकीट प्रवाशांना दिल्याने दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिल्याप्रकरणी दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील बारांबाकी रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी बारांबाकी रेल्वे स्थानकामधील दोन कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले तिकीट दिले होते. मात्र, सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने सरकारी व्यासपीठावरून अशा प्रकारे जाहीरताबाजी करणे आचारसंहितेचे उल्लंघन ठरते.

दरम्यान, या रेल्वे स्थानकात सुरुवातीला मोदींचा फोटो नसलेल्या कागदाच्या रोलवर छापलेली तिकीटे प्रवाशांना दिली गेली होती. मात्र, या कर्मचाऱ्यांची शिफ्ट संपल्यानंतर त्याजागी दुसरे कर्मचारी आले आणि त्याचवेळी तिकीटाच्या कागदाचा रोल संपल्याने या कर्मचाऱ्यांनी चुकून मोदींचा फोटो असलेला रोल मशीनला लावला आणि त्यावर तिकीटं छापली आणि ती अनावधानाने प्रवाशांना देण्यात आली, असे या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही आचारसंहिता लागू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेली रेल्वेची आणि विमानाची तिकीटे प्रवाशांना दिल्यावरुन निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत आयोगाने संबंधीतांना कारणे दाखवा नोटीशी पाठवल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा तशीच चूक झाल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली.

First Published on April 16, 2019 10:51 am

Web Title: 2 railway employees have been suspended after tickets with photo of pm modi printed on them were issued to passengers