देशभरात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान ड्युटीवर असताना चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील चार कर्मचाऱ्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. गोरखपूर जिल्ह्यातील माधोपूर प्राथमिक विद्यालयावरील बूथ क्रमांक ३८१वर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला आहे. गोरखपूरमधीलच कुपवा बूथ नंबर २१३वरही एका कर्मचाऱ्याचा ड्युटीवर असाताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

सहायक निवडणूक आधिकारी जेएन मॉर्य यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय राजाराम यांची निवडणूक ड्युटीवर असताना मृत्यू झाला. ते रेल्वे कर्मचारी होते. रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला. बूथ नंबर २१३वर ड्युटीवर असणारे निवडणूक आधिकारी श्रीवास्तव यांचाही ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

मध्यप्रदेशमध्येही दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. धार लोकसभा मतदार संघातील बूथवर असलेल्या गुरू सिंह चोगड यांचा रविवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या वृत्ताला मुख्य निवडणूक आधिकारी व्ही.एल कांताराव यांनी पृष्टी दिली आहे. देवास लोकसभा मतदार संघातील पीठासीन अधिकारी अनिल नेमा यांचा शनिवारी रात्री कार्डिएक अरेस्टनं मृत्यू झाला.
दरम्यान, आज रविवारी लोकसभा निवडणूकीच्या अखेरच्या टप्याचे मतदान सुरू आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १३ आणि मध्य प्रदेशमधील ८ लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.