काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांच्या ५६ इंच छातीच्या वक्तव्यावरुन टोला लगावला. तुम्ही ५६ इंचाची छाती असल्याचं ठणकावून सांगता, पण मग तुमचं ह्रदय कुठे आहे ? असा सवाल प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदी उद्धटपणे वागत असल्याचं म्हणत टीका केली. तसंच त्यांना शेतकऱ्यांची अजिबात चिंता नसल्याचंही सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीदरम्यान ५६ इंच छातीचा उल्लेख केला होता. गोरखपूरमधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांना गुजरातमधील विकासावरुन टोला लगावताना म्हटलं होतं की, ‘तुम्ही गुजरात तयार करु शकत नाही, त्यासाठी ५६ इंचाच्या छातीची गरज आहे’.

भाजपाने या निवडणुकीत राष्ट्रवाद आणि देशाची सुरक्षा मुख्य मुद्दा ठेवला असून यावरुनही प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. ‘पंतप्रधान राष्ट्रवादावर बोलताना फक्त पाकिस्तानचा उल्लेख करतात. त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईवर सतत बोलत राहणं. रोजगार आणि शेतकऱ्यांचे मुद्दे त्यांच्यासाठी राष्ट्रवाद नाही’, असं प्रियंका गांधींनी म्हटलं.

‘गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी देशभरातील प्रत्येक ठिकाणी जाताना दिसले, पण देशातील शेतकऱ्यांची भेट घेण्याची तसदी त्यांनी घेतली नाही’, अशी टीकाही यावेळी प्रियंका गांधी यांनी केली. ‘पाच वर्षात पाच कोटी रोजगारांचं नुकसान झालं असून अद्याप २४ लाख सरकारी पदं रिक्त आहेत, आणि सरकार म्हणतं सत्तेत आल्यावर आम्ही सगळं ठीक करु’, असंही त्यांनी म्हटलं.