पश्चिम बंगालमध्ये हिंसक घटना, अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी नऊ राज्यांमधील ७२ मतदारसंघांमध्ये सुमारे ६४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्या, तर काही भागात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्याच्या तक्रारी मिळाल्या.

२०१४ च्या निवडणुकांत ज्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपने ३२ पैकी ३० जागा मिळवल्या होत्या, त्या राजस्थानमध्ये (१३ जागा) ६२ टक्के, उत्तर प्रदेशात (१३ जागा) ५३.१२ टक्के, तर मध्य प्रदेशात (६ जागा) ६५.८६ टक्के मतदान झाले.

पश्चिम बंगालमधील आठ मतदारसंघांत ७६.४७ टक्के मतदान झाले. बिरभूम मतदारसंघातील नानूर, रामपूरहाट, नलहाटी व सुरी येथे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये चकमकी उडाल्या व त्यात अनेक लोक जखमी झाले.

आसनसोल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची बाराबानीतील एका मतदान केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. दुब्राजपूर भागात मोबाइल फोन घेऊन मतदान केंद्रात शिरू पाहणाऱ्या लोकांना अटकाव करणाऱ्या केंद्रीय सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांवर या लोकांनी हल्ला केल्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी जवानांनी हवेत गोळीबार केला.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने आज मतदान झालेल्या ७२ पैकी ५६ जागा जिंकल्या होत्या. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी सुमारे १२.७९ कोटी मतदार पात्र होते. याबरोबरच महाराष्ट्र आणि ओडिशातील निवडणुका आटोपल्या असून, राजस्थान व मध्य प्रदेशातील मतदानाला सुरुवात झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) तांत्रिक बिघाड आढळल्याने चाचणी मतदानादरम्यान २०७ ईव्हीएम बदलण्यात आल्याचे मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांथा राव यांनी सांगितले.

जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग मतदारसंघातील कुलगाम मतदारसंघात दगडफेकीच्या तुरळक घटनांच्या सोबतीने १०.३ टक्के मतदान झाले. या संवेदनशील मतदारसंघातील तीन टप्प्यांच्या मतदानापैकी हा दुसरा टप्पा होता. उत्तर प्रदेशात अनेक ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा आणि सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव लढत असलेल्या कन्नौज मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदानासाठी घराबाहेर पडू न देण्यात आल्याचा आरोप विरोधी समाजवादी पक्षाने केला. कानपूरमध्ये एका मतदान केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी चकमक उडाली. याप्रकरणी भाजप नेते सुरेश अवस्थी यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारमध्ये ईव्हीएममधील बिघाडामुळे मुंगेरमधील ३, दरभंग्यातील २ आणि बेगुसरायमधील ३ मतदान केंद्रांवर मतदानाला विलंब झाला.

लोकसभेच्या ५४३ जागांसाठी देशभरात सात टप्प्यांत मतदान होत असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

यापूर्वी २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात ११६ मतदारसंघांमध्ये सुमारे ६६ टक्के मतदान झाले होते. ११ व १८ एप्रिलला पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ९१ व ९५ मतदारसंघांमध्ये मतदान झाले होते. तमिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात पैशांचा अमर्याद वापर करण्यात आल्यामुळे तेथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये मतदान शांततेत झाले. आदिवासीबहुल बांसवाडा मतदारसंघात सर्वाधिक ७२.३४ टक्के, तर बाडमेर मतदारसंघात ७२.२१ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ६ वाजेपर्यंत  ओडिशातील ६ मतदारसंघांत ६४.०५ टक्के, बिहारच्या ५ मतदारसंघांत ५३.६७ टक्के आणि झारखंडमधील ३ मतदारसंघांत ६३.४२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

ओडिशात ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे ६० मतदान केंद्रांवरील मतदान लांबले, मात्र बिघाड दूर करण्यात आल्यानंतर ते पुन्हा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.