अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन हे येत्या ६ एप्रिलला होणाऱ्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी गुरुवारी सांगितले.

‘केरळ भाजप मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ई. श्रीधरनजी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढेल. केरळच्या जनतेला भ्रष्टाचारमुक्त, विकासोन्मुख प्रशासन देण्यासाठी आम्ही माकप आणि काँग्रेस या दोघांनाही पराभूत करू,’ असे मुरलीधरन यांनी ट्विटरवर लिहिले.

‘मेट्रोमॅन’ श्रीधरन यांना केरळच्या आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करण्याची विनंती आपण राष्ट्रीय नेतृत्वाला केली असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी सांगितल्यानंतर काही तासांतच मुरलीधरन यांनी यांच्या नेतृत्वाबाबतची पोस्ट समाजमाध्यमांवर टाकली.

८८ वर्षांचे श्रीधरन यांनीही दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (डीएमआरसी) आपली २४ वर्षांची सेवा संपवत असल्याचा निर्णयही गुरुवारी जाहीर केला.

‘मेट्रोमॅन’च्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राज्यात सत्तेवर येण्याची संधी मिळाली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळमध्ये विकासकामांची दहापटीने अंमलबजावणी करू शकू, असा आम्हाला विश्वास आहे, असे के. सुरेंद्रन यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना सांगितले.

कोची येथील पलारिवोट्टम उड्डाणपुलाचे पुनर्बाधणी काम निर्धारित मुदतीच्या बऱ्याच आत, म्हणजे केवळ ५ महिन्यांत पूर्ण करण्यासह श्रीधरन यांनी केलेल्या कामगिरीचा सुरेंद्रन यांनी उल्लेख केला. ‘त्यांनी हा प्रकल्प कुठल्याही भ्रष्टाचाराशिवाय ५ महिन्यांत पूर्ण केला. त्यामुळेच त्यांना एनडीएचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करावे, अशी विनंती आम्ही श्रीधरन यांना व आमच्या पक्षनेतृत्वाला केली,’ असे सुरेंद्रन यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘विजय यात्रेचा’ भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सांगितले.