लोकशाहीचा उत्सव अद्याप सुरुच असून आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. देशभरात लोकांनी बऱ्याच ठिकाणी मोठ्या संख्येने मतदान केले तर काही ठिकाणी कमी मतदान झाले. दरम्यान, देशात एक अशीही घटना घडली ज्यामुळे आपल्या मनात निवडणुकीबाबत निश्चितच सन्मानाची भावना निर्माण होईल. ही घटना म्हणजे गुजरातमध्ये एक असे मतदान केंद्र होतं जे केवळ एकाच मतदारासाठी बनवण्यात आले होतं आणि तिथं मतदानही पार पडलं.


गुजरातमधील जुनागड येथील सिंहांसाठी राखीव असलेल्या गीर अभयारण्यात भारतदास बापू नामक व्यक्तीसाठी वेगळे मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. आपल्यासाठी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची आणि मतदानाबाबतच्या कर्तव्याची जाण ठेवत त्यांनी केंद्रावर येऊन मतदानही केलं. मतदानानंतर आपल्या भावना व्यक्त करताना बापू म्हणाले, सरकारने एका मतदानासाठी इथे मतदान केंद्र बनवले. त्यामुळे मी आवर्जून येत इथं मतदान केलं. त्यामुळे या केंद्रावर आता शंभर टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, त्यांनी देशवासीयांना आवाहन केले की त्यांनीही मतदानाचे कर्तव्य पार पाडायला हवे.

भारतदास बापू हे गीर अभयारण्यातील एका प्राचीन मंदिराचे पुजारी आहेत. गीर जंगलातील दाणेज नामक गावात कोणालाही येण्याची परवानगी नाही. त्यामुळे इथे मंदिरात राहणाऱ्या या पुजाऱ्यासाठी येथे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं.

आज (दि.२३) देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यामध्ये देशात एकूण ६३ टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रात सरासरी ५६.५७ टक्के मतदान झाले.