मुंबईतल्या माहिम भागात ३ कोटींचे विदेशी चलन निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाला सापडल्याचे वृत्त आहे. या पथकाने एका टॅक्सीतून ३ कोटी रूपये मूल्य असलेले विदेशी चलन जप्त केले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. फिरत्या तपासणी पथकाने ही कारवाई केली. टॅक्सीतून जप्त करण्यात आलेले चलन विविध देशांचे आहे.

त्याचे भारतीय मूल्य तीन कोटी आहे अशी माहिती माहीम विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी स्वाती कारले यांनी दिली. तर एएनआय या वृत्तसंस्थेनेही ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या किंमतीचे परकिय चलन मुंबईत कसे सापडले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ज्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांचीही चौकशी सुरु आहे.