18 November 2019

News Flash

मतमोजणीची तयारी पूर्णत्वास

मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय टेबल मांडले जाणार असून एका केंद्रावर सात टेबल असतील.

व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठय़ा मोजणीमुळे निकालास उशीर होण्याची चिन्हे

नाशिक : निवडून आलेल्या उमेदवाराचे प्रमाणपत्र लिहिण्यासाठी सहायक ग्रंथपालाच्या नियुक्तीपासून ते व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ांची मोजणी, मतमोजणीसाठी टेबलची रचना, सुरक्षा आणि वाहनतळ व्यवस्थेपर्यंतच्या अनेक बाबींचा विचार करत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्णत्वास नेली आहे. नाशिकसाठी २७, तर दिंडोरीसाठी २५ फेऱ्या होणार आहेत.

गुरुवारी नाशिक, दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी अंबडच्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात स्वतंत्रपणे होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली असून निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी मंगळवारी मतमोजणी केंद्राची पाहणी करून आढावा घेतला.  मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय टेबल मांडले जाणार असून एका केंद्रावर सात टेबल असतील. सकाळी साडेसात वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर मतदान यंत्राचे सील तोडले जाईल. दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी ८४ टेबलची रचना करण्यात आली आहे. एक फेरी पूर्ण झाल्यावर सहाही विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी घेऊन फेरीनिहाय मते जाहीर होतील. मतमोजणीच्या सर्व फेऱ्या झाल्यानंतर प्रत्येक विधानसभानिहाय पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठय़ा मोजल्या जातील. त्यासाठी किमान पाच तासांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. टपालाद्वारे आलेल्या मतदानाची स्वतंत्र मोजणी होईल.

मतमोजणी केंद्र औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असून मतमोजणीवेळी केंद्र आणि परिसरात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. केंद्राच्या आतमध्ये २५०, तर केंद्राबाहेर ३०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असून या संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. निकालाच्या दिवशी मतमोजणी केंद्राकडे येणारे रस्ते ठरावीक अंतरावर बंद ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था स्वतंत्र ठिकाणी करण्यात आली आहे.

मतमोजणी केंद्रात उमेदवार, कर्मचारी किंवा अन्य कोणालाही इलेक्ट्रॉनिक गॅझेट, भ्रमणध्वनीचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. या ठिकाणी प्रवेश देतानाच प्रत्येकाची झडती घेतली जाणार आहे. केंद्राच्या सभोवताली १०० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र राहील. त्यासाठी सीमांकन केले जाणार असून या भागात कोणत्याही वाहनास प्रवेश देण्यात येणार नाही.

First Published on May 22, 2019 4:10 am

Web Title: administration preparation for vote counting