पुणे : पुणे, बारामती मतदारसंघांसाठी मंगळवारी (२३ एप्रिल) मतदान होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदारांनी अधिकाधिक मतदान करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले असून, मतदारांच्या मदतीची व्यवस्था केली आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दोन्ही मतदार केंद्रांसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन), व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल), कण्ट्रोल युनिट वाहन असे साहित्य सोमवारी मतदान केंद्रप्रमुखांच्या ताब्यात देण्यात आले. हे साहित्य पाठवण्यात आलेल्या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी सहा ते सात या कालावधीत राजकीय पक्ष आणि निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष मतदान चाचणी होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल.

दोन मतदान यंत्रे

ईव्हीएमला बॅलेट युनिट, कण्ट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट जोडलेले असेल. मतदान यंत्रावर उमेदवाराचे नाव, छायाचित्र आणि पक्षाचे चिन्ह असेल. त्यावरील एक बटण दाबून मतदान करता येणार. एका मतदान यंत्रावर १५ उमेदवारांची नावे आणि एक ‘नोटा’ अशी १६ बटणे असतात. पुण्यात ३१ आणि बारामतीत १८ उमेदवार असल्याने दोन मतदान यंत्रे लागणार आहेत. उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबल्यानंतर सात सेकंद कालावधीपर्यंत एक चिठ्ठी दिसेल, त्यामुळे संबंधित मतदाराला आपल्या पसंतीच्या उमेदवारला मत दिले किंवा कसे, हे समजेल.

सखी मतदान केंद्र

यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदार संघातील एका मतदान केंद्राचे व्यवस्थापन महिला पाहणार आहेत. त्यांना ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. पुणे शहरात खराडी येथील ईओन गन्कुर स्कूल, शिवाजीनगरमधील विद्याभवन हायस्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय, पौड रस्त्यावरील एमआयटी शाळेची खोली क्रमांक चार, महर्षीनगर येथील ह्य़ुम मॅक हेन्री स्कूलची खोली क्रमांक दोन, सेंट मीरा इंग्लिश मीडियम सेकेंडरी स्कूलची खोली क्रमांक तीन आणि भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशाला. बारामतीमध्ये सेंट सेबेस्टियन स्कूलमधील खोली क्रमांक पाच (दौंड), नारायणदास रामदास हायस्कूल (इंदापूर), मालेगाव पाहुणेवाडी (बारामती), संत नामदेव प्रशालेतील खोली क्रमांक सात (सासवड), जिजामाता इंग्लिश मीडिअम स्कूलमधील खोली क्रमांक तीन (भोर), समर्थ बालक मंदिर (धनकवडी).

मतदार ओळखपत्राशिवाय ११ प्रकारचे पुरावे ग्राह्य़

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर मतदारांना मतदार ओळखपत्राशिवाय ११ प्रकारचे पुरावे निश्चित केले आहेत. पारपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेली बँकेची खातेपुस्तिका, पॅनकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तऐवज, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी विभागांतर्गत (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर – एनपीआर) नागरिकत्व नोंदणी महासंचलनालयाद्वारे (रजिस्टर जनरल अ‍ॅण्ड सेन्सस कमिशनर इंडिया – आरजीआय) दिले गेलेले स्मार्ट कार्ड, आधार कार्ड यांपैकी एक पुरावा लागणार आहे. तर, निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या मतदार चिठ्ठय़ा (व्होटर स्लीप), शिधापत्रिका, खरेदीखत आणि शस्त्र परवाना हे पुरावे म्हणून ग्राह्य़ धरले जाणार नाही.

पुण्यात २० लाख ७४ हजार ८६१ मतदार

पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २० लाख ७४ हजार ८६१ असून एक हजार ९९७ मतदान केंद्रे आहेत. त्यातील संवेदनशील मतदान केंद्रे ९१ असून वेबकास्टिंग होणाऱ्या केंद्रांची संख्या २२६ आहे. बारामती मतदारसंघातील मतदारांची संख्या २१ लाख बारा हजार ४०८ असून दोन हजार ३७२ मतदान केंद्रं आहेत. संवेदनशील मतदान केंद्रे ६२ आहेत आणि वेबकास्टिंग होणाऱ्या केंद्रांची संख्या २८५ आहे.

 

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सोमवारी पूर्ण करण्यात आली.