अमिताव रंजन

सर्व सरकारी विभागांना १०० दिवसांचा आराखडा देण्याचे आदेश

सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आणि केंद्रात सत्तांतर घडविण्याचा विडा उचलत विरोधकांच्या महाआघाडीने सत्तेसाठी रस्सीखेच सुरू केली असतानाच पंतप्रधान कार्यालयाने मात्र २३ मेनंतरच्या शंभर दिवसांची कृतीयोजना आखायला सुरुवात केली आहे!

सत्तेवर आम्हीच येणार, असा विश्वास भाजप वर्तुळात ठामपणे व्यक्त होत असला तरी तो निव्वळ राजकीय अभिनिवेश नसून पक्ष निवडणुकांनंतरच्या कारभारासाठी तयारीला लागल्याचेच पंतप्रधान कार्यालयाच्या या आदेशातून दर्शविले जात आहे. प्रत्येक मंत्रालयाच्या सचिवाला पंतप्रधान कार्यालयाने भाजपच्या जाहीरनाम्यानुसार ही कृतीयोजना तयार करण्यास सांगितल्याचे समजते.  दोन सचिवांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. १९ मेपर्यंत सार्वत्रिक निवडणूक संपत असून २३ मे रोजी निकाल जाहीर होतील. त्यानंतर जे सरकार सत्तेवर येईल त्यांच्यासाठी हा कृतीकार्यक्रम उपयोगी पडेल, अशी मुत्सद्दी प्रतिक्रिया एका सचिवाने दिली.

होणार काय?

या ३० एप्रिलपासून प्रत्येक सचिवाला योजनांच्या अंमलबजावणीचा व्यवहार्य कृतीकार्यक्रम पंतप्रधानांसमोर मांडावा लागणार आहे. प्रत्येक मंत्रालयाशी संबंधित पंतप्रधान कार्यालयातील दोन अधिकारीही त्यावेळी सहभागी होतील.