* नक्षलवाद्यांच्या धमक्या धुडकावून अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात मतदान

मंगेश राऊत, गट्टा (गडचिरोली)

मतदानाच्या पूर्वसंध्येला नक्षलवाद्यांनी गट्टा बाजारपेठेत बॉम्ब स्फोट घडवल्याने जवळच्या वटेली केंद्रावरील मतदान गुरुवारी रद्द करण्यात आले. अन्यत्र, नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

मतदानाच्या पूर्वसंध्येला एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील पोलीस मदत केंद्रातून सायंकाळी वटेली मतदान केंद्राकडे जाणाऱ्या निवडणूक पथकावर हल्ला करण्यात आला. बाजार परिसरात एका सायकलवर आयईडी स्फोटक ठेवून रिमोटद्वारे स्फोट घडवण्यात आला. त्यात एक सीआरपीएफ जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलवले.

यामुळे  जांबिया, गट्टा परिसरातील मतदानावर परिणाम होईल अशी शक्यता होती. पण दोन्ही मतदान केंद्रांवर लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला . या परिसरातील परसलगोंदी मतदान केंद्रावर एकूण ६३४ मतदारांपैकी सकाळी ९.३० वाजेपर्यंत ८४ जणांनी मतदान केले होते. अतिसंवेदनशील जांबिया मतदान केंद्रावर परिसरातील चार गावांतील ९२४ मतदार आहेत. सकाळी १०.३० पर्यंत ४७ जणांचे मतदान झाले होते. या ठिकाणी मतदारांनी मोठय़ा रांगा लावल्या होत्या. गट्टा येथे बॉम्ब स्फोट झाल्यावरही सकाळी ११ वाजेपर्यंत ९६५ पैकी २१७ जणांचे मतदान झाले होते. ५ किमी जंगलात असलेल्या वटेली मतदान केंद्राकडे जाणाऱ्या पथकावर स्फोट घडवून हल्ला केल्यानंतर सुरक्षेसाठी कोणालाही केंद्रावर  पाठवले गेले नाही.  त्या केंद्रावरील मतदारांना गट्टा येथे बोलावण्यात आले होते. त्यामुळे शेकडो लोक गट्टा येथे जमले होते, पण तांत्रिक कारणांमुळे सकाळी ९.३०च्या पूर्वी मतदान सुरू होऊ  शकले नाही. मतदानासाठी लोक सकाळी ११.३० पर्यंत वाट पाहात होते. शेवटी निवडणूक केंद्रावरील अधिकाऱ्यांनी मतदान रद्द करून दोन दिवसांनी मतदान होईल असे सांगितले.

मतदान का नाही?

वटेली केंद्रावरील मतदारांना गट्टा येथे बोलावण्यात आले. गट्टा येथील मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. मग आमचेही मतदान का घेण्यात येत नाही, असा सवाल मोडस्के गावचे रहिवासी बालाजी तोंदे गोटा, सगणी गोटा, काजल बैरागी यांनी केला. परिसरातील जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा यांनी सरकारने नक्षलवाद्यांच्या धमकीला घाबरून मतदान रद्द केल्याचा आरोप केला.

राजकीय प्रतिनिधी बेपत्ता

नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान होणार होते. त्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सकाळी उपस्थित राहणे आवश्यक होते. पण गट्टात स्फोट झाल्याने परसलगोंदी, नेंडेर, मंगेर, जांबिया आणि गट्टा केंद्रावर राजकीय प्रतिनिधी बेपत्ता होते. त्यामुळे मतदान सुरू होण्यास विलंब झाला. शेवटी अधिकाऱ्यांनी ८.३० ते ९ च्या दरम्यान मतदान सुरू केले.

धमक्यांचे दहा फलक

जांबिया,गट्टा परिसर नक्षलवाद्यांचा गड आहे. या परिसरातील सूराजगड लोहपोलाद प्रकल्प निवडणुकीमुळे १६ एप्रिलपर्यंत बंद आहे. जांबिया, गट्टा दरम्यानच्या आठ किमीच्या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी जवळपास दहा बॅनर लावले असून बहिष्काराचे आवाहन केले आहे. मात्र, नागरिकांनी भरघोस मतदान केल्याने ७० ते ८० टक्के मतदान होईल, अशी शक्यता गट्टाचे कोतवाल एल. एन. मलिक यांनी व्यक्त केली.