पुत्र सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. नगरमध्ये होणाऱ्या जाहीरसभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काही आमदारही भाजपामध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे.

राधाकृष्ण विखे पाटील राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात निश्चित भाजपाला बळ मिळेल तर काँग्रेसला याचा फटका बसेल. अहमदनगर लोकसभेच्या जागेचा तिढा न सुटल्यामुळे त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली आहे.

अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सुजय विखे पाटील भाजपामध्ये गेल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटीलही लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली होती.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी २३ मे नंतर भाजपामध्ये प्रवेश करावा अशी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिका आहे. पण २३ मे नंतर पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता असल्यामुळे ते आधीच प्रवेश करु शकतात. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर, अब्दुल सत्तार हे भाजपामध्ये प्रवेश करतील. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात शैक्षणिक आणि वाहतूक मंत्री होते तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात शेती मंत्री होते.