लोकसभा निवडणूक पार पडली आहे. निकाल अवघ्या एका दिवसावर आला आहे. काय होणार याची उत्सुकता शिगेला असतानाच स्वराज इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. देशात एनडीएला बहुमत मिळेल आणि भाजप सत्तेतही येईल मात्र त्यानंतर देशात लोकशाहीचा अस्त होईल असं यादव यांनी म्हटलं आहे. देशात भाजपाचे सरकार येईल आणि एनडीएला बहुमत मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.

निवडणूक निकालानंतर देशात लोकशाही नाही तर हुकुमशाही नांदेल असेही योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. देशातली घटनात्मक व्यवस्था कोसळून जाईल असेही यादव यांनी म्हटले आहे. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणं गरजेचं आहे असंही ते म्हटले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगेंद्र यादव यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस हा भाजपाला सक्षम पर्याय नाही. भविष्यात ज्या समस्या या देशात उभ्या रहाणार आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही काँग्रेस सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरली आहे असंही योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी काँग्रेसने म्हणावे तसे प्रयत्न केले नाही असाही आरोप यादव यांनी केला आहे. एवढंच नाही तर भाजपावरही त्यांनी निशाणा साधला आहे. देशात आधी बुथ कॅप्चर केले जायचे. मात्र भाजपाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॅप्चर केली आहे असेही यादव यांनी म्हटले आहे. तसेच यासाठी काठ्या आणि बंदुकांचा नाही तर कॅमेरा आणि टीव्ही माध्यमांचा वापर करत भाजपाने निवडणूक कॅप्चर केली असाही आरोप यादव यांनी केला. सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही इतका अमाप पैसा भाजपाने निवडणुकीत खर्च केला आहे असाही आरोप योगेंद्र यादव यांनी केला.

निवडणूक निकालानंतर देशात भाजपाचे सरकार येईल. मात्र त्यानंतर देशात दोन गंभीर समस्या उभ्या असणार आहेत. निवडणूक जिंकल्यावर कुणाचाही अधिकार रहाणार नाही एकछत्री अंमल येईल अशी भीती आहे. तर देशातली जी घटनात्मक अवस्था आहे ती कोसळून जाईल असंही योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. देशाला या व्यवस्थेच्या विरोधात एक सक्षम पर्याय उभा करावा लागणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.