मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुरुंगात धाडण्याची भाषा केली होती. मात्र सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार सोडाच कोणालाही तुरुंगात पाठवण्यात आलं नाही, कारण शिवसेना-भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी सगळे एकाच खानदानातले पक्ष आहेत अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जी काही आश्वासने दिली होती त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार होते कुठे गेले रोजगार? 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार होते? कुठे आहेत पैसे? नोटाबंदीच्या निर्णयामुळे तर अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. ही आणि अशी खोटी आश्वासनं देणाऱ्या सरकारला खाली खेचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना साथ द्या असंही आवाहन ओवेसी यांनी केलं आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला प्रकाश आंबेडकरांचीही उपस्थिती होती. या सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्यांच्या निधनानंतरची शिवसेना वेगळी आहे. सध्या शिवसेना भाजपासमोर लाचार झाली आहे. मोदींसमोर मांजर झाली आहे अशी टीकाही ओवेसी यांनी केली आहे.