देशातले अनेक समाज आज भीतीच्या सावटाखाली आहे. मतदारांनो तुम्ही गाफील राहू नका निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरली जाईल असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता अशी चटक सत्ताधाऱ्यांना लागली आहे. सत्ता मिळवण्यासाठी हे लोक काहीही करतील कोणत्याही थराला जातील असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दलित पँथरचा मेळावा पार पडला त्यावेळी अजित पवारांनी मतदारांना सावध रहाण्याचे आवाहन केले.

आपल्याला आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून वाटचाल करत काम करायचं आहे असं पवार म्हणाले. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं परंतु अपेक्षेप्रमाणे मतदान झालं नाही. देशात हुकूमशाही आणि म्हणेल ती पूर्व दिशा अशा प्रकारचा कारभार सुरू आहे. याचा अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे. कोरेगाव येथे झालेली घटना का आणि कोणी घडवली याच्या मागील मास्टरमाइंड कोण आहे? कुठं पाणी मुरतंय? हे सगळं काही जनतेच्या समोर का येत नाही? असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले. देशातील अनेक समाज भयभीत होऊन आयुष्य जगत आहेत. कोणी कस जगावं आणि कस राहावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे अस देखील पवार म्हणाले.