अकोलामधील बाळापूर येथे एका तरुणाने मतदान केंद्रावर ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. श्रीकृष्ण घैरे असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापूरमधील कवठा येथे श्रीकृष्ण घैरे हा तरुण मतदानाच्या निमित्ताने मतदान केंद्रावर पोहोचला. मतदान कक्षाजवळ जाताच श्रीकृष्णाने ईव्हीम फोडण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर तिथे नवीन मतदान यंत्र पाठवण्यात आले. या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सुरु झाल्याचे सांगण्यात आले. श्रीकृष्ण घैरे याचा ईव्हीएमला विरोध होता. यातूनच त्याने हे कृत्य केले असावे, असा अंदाज आहे.

दरम्यान, अकोला येथे एकूण मतदार १८ लाख ६१ हजार असून २०८५ मतदान केंद्र आहेत. अकोला मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायत पटेल रिंगणात आहेत.