दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे; गतवेळच्या तुलनेत राज्यात मतदानाचा टक्का सारखाच

मुंबई : राज्यातील ३१ मतदारसंघांमध्ये आतापर्यंत झालेल्या मतदानात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांमध्ये तर सर्वात कमी मतदान हे पुण्यात झाले आहे. गतवेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का अर्धा ते एक टक्क्याने घटला आहे. हे मतदान आम्हालाच फायदेशीर असल्याचा दावा सत्ताधारी युती आणि विरोधक आघाडीने केला आहे.

राज्यात गतवेळच्या उत्साहानेच मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी सारखीच असली तरी प्रत्यक्ष मतदान गतवेळच्या तुलनेत वाढलेले आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने सुप्त लाट असल्याचा दावा भाजप नेते विनोद तावडे यांनी केला. मतदानाची टक्केवारी लक्षात घेता यंदाचे मतदान हे सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचे म्हणणे आहे. मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात राज्यात मतदान होत असल्याचा दावा सावंत यांनी केला. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीनंतर आता यशाचे अंदाज बांधले जात आहेत.

आतापर्यंत ३१ ठिकाणी मतदान

राज्यात आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये ३१ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघांमध्ये ६१.८१ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघांमध्ये ६२.९१ टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात १४ मतदारसंघांमध्ये ६२.३७ टक्के मतदान झाले. आतापर्यंत सरासरी ६२ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात सरासरी ६०.३६ टक्के मतदान झाले होते.  कोल्हापूरमध्ये ७०.७० टक्के मतदान झाले असून, हातकणंगलेमध्ये ७०.२८ टक्के मतदान झाले. पुणे मतदारसंघात सर्वात कमी ४९.८४ टक्के मतदान झाले आहे. नागपूरमध्ये ५४.७४ टक्के तर सोलापूरमध्ये ५८ टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागात कमी मतदान झाले आहे.