05 March 2021

News Flash

मराठवाडय़ात दुष्काळाचा मुद्दा बाजूला, जातच प्रचाराच्या केंद्रस्थानी

 दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत करण्यात आलेल्या प्रचारात भाजपकडून राष्ट्रवादाचा ढोल उंचावण्यात आला होता

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

मराठवाडय़ातील सहा लोकसभा मतदारसंघांतील दुसऱ्या टप्प्यात शेवटच्या काळात जातीय अंगाने टोकदार होणारा प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थांबला.

दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत करण्यात आलेल्या प्रचारात भाजपकडून राष्ट्रवादाचा ढोल उंचावण्यात आला होता. तर काँग्रेस मात्र बहुतांश मतदारसंघांत विस्कळीत असल्याचे स्वरूप अगदी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम होते. वंचित बहुजन आघाडीमध्ये एमआयएमचा सहभाग आणि मतविभाजनाची रणनीती याभोवती केंद्रित झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शेवटच्या टप्प्यात ‘मोदी हवे की नको’ असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप आणि काँग्रेसकडून केला गेला. पण प्रचाराच्या एकूण चर्चेत जात केंद्रस्थानी राहिल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष ज्या मराठवाडय़ात आहेत, तेथे त्या दोन्ही नेत्यांना मराठवाडा प्रदेश म्हणून प्रभाव टाकता आल्याचे दिसून आले नाही. अशोकराव चव्हाण यांना नांदेडपुरते मर्यादित ठेवण्यात भाजपच्या नेत्यांना काही अंशी यश आले. या मतदारसंघात भाजपने शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे.

उमेदवारी देताना औरंगाबाद, जालना या दोन मतदारसंघांसह लातूरसारख्या काँग्रेसची ताकद असणाऱ्या जिल्ह्य़ातही उमेदवारीचे घोळ काँग्रेस नेत्यांना मिटवता आले नाही. त्याचा परिणाम प्रचारादरम्यानही दिसून आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आजारी पडल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात अन्य मतदारसंघांत फारसे फिरकू शकले नाहीत.

जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर यांना काँग्रेसमध्ये घेऊ आणि त्यांना उमेदवारी देऊ, असे मनाचे मांडे घातले गेले. ते पक्षात आले नाही तर दुसरा उमेदवार कोण, याचे कोणतेही नियोजन केले नव्हते. परिणामी औरंगाबादचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यावर काँग्रेस पक्ष अवलंबून राहिला आणि औरंगाबाद व जालना या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारीचे घोळ झाले.  जालना मतदारसंघात विलास औताडे यांना बळेबळे उमेदवारी दिली गेली.

लातूर मतदारसंघात तुलनेने श्रीमंत उमेदवार देण्यात भाजप आणि काँग्रेसला यश आले. सुधाकर शृंगारे आणि मच्छिंद्र कामंत हे दोघेही बांधकाम व्यावसायिक आहेत. साखरपट्टय़ातील काँग्रेसची यंत्रणा मोडून काढण्यात भाजपला यश मिळेल, असा दावा केला जात आहे. संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख यांनी प्रचाराची राळ उठविली असली तरी काँग्रेसला हा गड पुन्हा मिळवता येणार नाही, असा दावा भाजपचे नेते ठामपणे करत आहेत.

हिंगोलीमध्येही गेल्या वेळी पराभूत झालेले सेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना या वेळी काँग्रेसने उमेदवारी दिली. हिंगोलीतून शिवसेनेने आमदार हेमंत पाटील यांना रिंगणात उतरविले. या मतदारसंघात बाहेरून आलेला उमेदवार आणि पक्षाशी एकनिष्ठ नसलेला उमेदवार असे प्रचाराचे मुद्दे होते.

उस्मानाबादमध्ये सेनेला फटका?

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राणा जगजीतसिंह पाटील आणि ओम राजे निंबाळकर यांच्यात लढत होईल असे मानले जात होते. मात्र, प्रचारादरम्यान साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचललेल्या दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली आणि त्यात सेना उमेदवार ओम राजे निंबाळकर यांच्या नावाची चिठ्ठी लिहिली. त्याचा शिवसेनेच्या प्रचारावर परिणाम झाला. रवींद्र गायकवाड यांनीही अखेपर्यंत प्रचारात हात आखडते ठेवले. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आश्वासने देऊनदेखील सेनेच्या माजी खासदाराने उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या विरोधात ऐन निवडणुकीत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तुलनेने उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद अधिक आहे. डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव राणा जगजीतसिंह पाटील यांना मानणारा कार्यकर्त्यांचा संच आहे.

बीडमध्ये चुरस

बीडमधील लढत तशी लक्षवेधी ठरणार नाही, असे उमेदवार ठरल्यानंतर सांगितले जात होते. जि. प. सदस्य बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यानंतर बीड मतदारसंघातील प्रचाराला शेवटच्या टप्प्यात जातीवादी टोक आले. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. प्रीतम मुंडे या भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे ठरविले. मात्र, त्याचवेळी महायुतीत घटक पक्ष असणाऱ्या विनायक मेटे यांनी बीडमध्ये भाजप वगळून अन्य ठिकाणी पाठिंबा अशी भूमिका घेतली.

मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोपी वाटणारी ही निवडणूक तशी चुरशीचीच होईल, असा दावा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2019 2:01 am

Web Title: along with the issue of drought in marathwada more on the cast of the campaign
Next Stories
1 प्रचारफेऱ्यांवर प्रिया दत्त यांचा भर
2 किस्से आणि कुजबुज
3 लक्षवेधी लढत
Just Now!
X