रमेश पाटील

मतदारांमध्ये निरुत्साह; दर पाच वर्षांनंतर लोकप्रतिनिधींचा आश्वासनांवरच भर

वाडा तालुक्याला दोन खासदार मिळाल्याचा आनंद नागरिकांना साजरा करता आलेला नाही. दोन खासदारांचा वाडा विविध सुविधांपासून आजही वंचितच राहिला आहे. वाडा तालुक्यातील बहुतांश भागांत मतदारांमध्ये निरुत्साहच असल्याचे चित्र आहे.

वाडा तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. २४ हजार हेक्टरचे जंगल तसेच वैतरणा, तानसा, पिंजाळी, देहेजा आणि गारगाई या पाच नद्यांची देणगी दिली आहे. मात्र या भागाचे नेतृत्व करणारे कार्यक्षम लोकप्रतिनिधी आजवर न मिळाल्याने या तालुक्यातील  बराचसा भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे.

वाडा तालुक्यातील बऱ्याचशा गाव खेडय़ांत आजही वीज पोहोचलेली नाही. आजही अनेक पाडय़ांवर चारचाकी वाहने जात नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांतील महिलांना दोन ते तीन  किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. वाडा शहरातही अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. रोजगारासाठी दरवर्षी हजारो मजुरांना स्थलांतर करावे लागत आहे. नागरिकांना आजही उपेक्षित जीवन जगावे लागत आहे.

दोन लाख लोकसंख्या असलेल्या वाडा तालुक्यात निम्म्याहून अधिक आदिवासी आणि ग्रामीण दुर्गम भागात राहणारी लोकवस्ती आहे. विशेषत: आदिवासी, ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या शेकडो योजना आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी बाबू कमी पडत आहेत, ते या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवीतच नाहीत आणि जे लोकप्रतिनिधी या भागाचे नेतृत्व करतात त्यांना या समस्यांचे काही गांभीर्य दिसून येत नसल्याने आजही येथील नागरिक विविध समस्यांना सामोरे जात आहेत.

वाडा तालुका हा शेती प्रधान तालुका असून या ठिकाणी पिकवला जाणारा ‘वाडा कोलम’ आज देशभर ओळखला जातो. या तांदळाला स्वतंत्र भौगोलिक मानांकन (जी.आय.) मिळावा यासाठी येथील शेतकरी गेले अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. मात्र या शेतकऱ्यांच्या पाठीशी लोकप्रतिनिधी उभे न राहिल्याने आज वाडा कोलमच्या नावाने इतर जिल्हा, राज्यामधील बोगस वाडा कोलम विकला जात आहे.

वाडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात होत असलेली पर्जन्यवृष्टी  लक्षात घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी मोठी धरणे होणे आवश्यक होती. येथील सिंचन क्षमता वाढविण्याची गरज आहे. आज फक्त तालुक्यात २ टक्के सिंचनाचे क्षेत्र आहे. पण त्याकडेही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेले आहे.