प्रदीप नणंदकर

राज्यातील ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केली. या यादीत पक्षाचे राष्ट्रीय सचिव, गोव्याचे प्रभारी व लातूर शहर विधानसभा मतदार संघातून दोन वेळा निवडून आलेले आमदार अमित विलासराव देशमुख यांचे नाव गायब आहे. दुसरीकडे ज्यांच्या घरात बंडखोरी झाली, त्या राधाकृष्ण विखेंचे नाव मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. केवळ एवढेच नाही तर नांदेडमधील दोन नेत्यांची नावे भुवया उंचावायला लावणारी आहे. आमदार अमिता चव्हाण आणि अमर राजूरकर या दोन्ही नेत्यांचा अन्य मतदार संघात भाषणाच्या अंगाने किती प्रभाव पडेल, असा सवाल करत हे स्टार प्रचार कसे, असे लातूरमधील काँग्रेस कार्यकर्ते करत आहे.

लातूर काँग्रेसमधील एक कार्यकर्ता नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाला, ‘नांदेडच्या बाहेर अमिता चव्हाण यांनी स्वतंत्रपणे एखादी सभा घेतल्याचे ऐकिवात नाही. तरीही त्यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत येते. विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर अशोक चव्हाणांनी लातूरच्या देशमुखांबद्दल दुजाभावाची वागणूक सुरू ठेवली. आयुक्तालयाच्या मुद्दय़ावरून नांदेड व लातूरची दरी वाढत राहिली. मुख्यमंत्रिपद नांदेडला गेल्यानंतर मोठय़ा मनाने विलासरावांनी ‘ताटात पडले काय अन् वाटीत पडले काय’ अशी भूमिका घेतली होती. मात्र, दुर्दैवाने त्यानंतर ‘ताट आणि वाटी’ दोन्हीही नांदेडलाच पळवून नेण्याचा घाट दिसत आहे.’

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असणाऱ्या शिवाजी पाटील कव्हेकरांचा मुलगा भाजपाचा नगरसेवक आहे. मात्र, कव्हेकरांचे पद अबाधित आहे. अशोक चव्हाण जाणीवपूर्वक देशमुख कुटुंबीयांची कोंडी करण्यातच मग्न आहेत. कदाचित प्रताप पाटील चिखलीकर हे विलासरावभक्त होते, ते आता अशोक चव्हाणांच्या विरोधात थेट उभे असल्याने चव्हाणांचा देशमुखांबद्दलचा राग आणखीन वाढलेला असावा अन् त्यामुळेच देशमुखांच्या विरोधात त्यांचे वागणे असेल असा युक्तिवाद काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. अमित देशमुख तर विलासरावांचे सुपुत्र आहेत शिवाय दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. उत्तम वक्ते आहेत.