06 December 2019

News Flash

काँग्रेसला आताच गरिबीची आठवण कशी ?

सांगलीतील ३८ अंश सेल्सियस तापमानात सभा ऐकण्यासाठी हजारो लोक उन्हात बसले होते.

तासगावमध्ये शहा यांची जाहीर सभा

सिंचनातील ७२ हजार कोटींचा हिशोब पवारांनी द्यावा- अमित शहा

सांगली : पाच पिढय़ा केंद्रातील सत्ता असलेल्या काँग्रेसला आताच गरिबीची आठवण कशी झाली? असा सवाल करीत पवार आणि कंपनीने सिंचन योजनेत खर्च केलेल्या ७२ हजार कोटींचा हिशोब जनतेला द्यावा, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी तासगाव येथील जाहीर सभेत केले.

महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज तासगावमध्ये शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत गेल्या पाच वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने आणि राज्यातील फडणवीस सरकारने कौतुकास्पद कामगिरी केल्याचा उल्लेख करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या राजवटीमध्ये १२ लाख कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करीत शहा म्हणाले,की नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया आणि आता राहुल बाबा अशा पाच पिढ्यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. सत्ता भोगली. मात्र सत्तेवर असताना त्यांना गरिबीची आठवण आली नाही. आता मात्र गरिबांसाठी काही तरी योजना आणली आहे.

काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधानाची मागणी करणाऱ्यांना हे जवळ करीत आहेत. याबाबत  नेमकी  भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावे. भाजपला सत्ता मिळो अथवा न मिळो मात्र काश्मीर कोणत्याही स्थितीत विभक्त करू देणार नाही. पाकिस्तानच्या गोळीला गोळीने उत्तर देण्याची राजकीय धमक केवळ मोदी सरकारकडेच आहे. कोणत्याही स्थितीत देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची आमची भूमिका राहील.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये देण्याची योजना अमलात आणली असून यापुढे शेतीसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची आणि शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन देण्याची योजना आखण्यात आली आहे. मोदी यांच्या हाती देशाची सुरक्षितता अबाधित असून अमेरिका आणि इस्राईलनंतर घरात घुसून अतिरेक्यांवर कारवाई करणारा भारत  जगातील तिसरा क्रमांकाचा देश आहे, असेही त्यांनी सांगितले.

विद्यानिकेतनच्या मदानात शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सांगलीतील ३८ अंश सेल्सियस तापमानात सभा ऐकण्यासाठी हजारो लोक उन्हात बसले होते. यामुळे शहा यांनी १८ मिनिटात सभा आटोपती घेतली.

First Published on April 18, 2019 3:47 am

Web Title: amit shah attacked sharad pawar in public meeting in sangli
Just Now!
X