निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीं चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश (पुदुचेरी) मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या पार्श्वभूमीवर पुदुचेरीतील भाजपाच्या एका प्रचारसभेला संबोधित करताना शहा यांनी असा दावा केला की बहुमत गमावल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला कोसळलेल्या पुडुचेरीतील कॉंग्रेस सरकारने केंद्र सरकारच्या योजनांवर ‘क्षुल्लक राजकारण’ केले.

माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील गांधी कुटुंबाची सेवा करण्यावर आणि त्यांना पैश्यातील हिस्सा देण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचा आरोप केला.
पुदुचेरीतील तत्कालीन कॉंग्रेस सरकारवर टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्ही नारायणसामी यांनी केंद्राच्या १५,००० कोटी रुपयांच्या निधीतून ‘गांधी कुटुंबाला’ पैसे दिल्याचा आरोप केला.

आपले सरकार पडले यासाठी भाजपाला जबाबदार धरल्याबद्दल नारायणसामी यांच्यावर निशाणा साधत शहा म्हणाले की बरेच वरिष्ठ नेते काँग्रेस सोडत आहेत कारण घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशभरात काँग्रेस संपत आहे. समर्पित मत्स्यव्यवसाय मंत्रालय नाही असे सांगणाऱ्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची शहा यांनी खिल्ली उडविली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वीच हे मंत्रालय स्थापन केल्याचे निदर्शनास आणून दिले.