आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागतो हे खरे नाही. आम्ही त्यांनी केलेले काम, त्यांनी उभारलेले प्रकल्प यातून निर्माण झालेल्या विश्वासाला साद घालतो आहोत. त्यामुळे देशातील जनता आम्हाला प्रतिसाद देईल, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. त्यातील संपादित अंश..

* २०१४ च्या निवडणुकीतील अमित शहा व २०१९ मधील अमित शहा यांची तुलना कशी कराल?

२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे नुसते नाव होते, आता मोदींचे नाव व काम असे दोन्ही घेऊन आम्ही आलो आहोत. २०१४ मध्ये मोदींबाबत आशा होती, आता लोकांच्या मोदींबाबत आशा व अपेक्षा दोन्ही आहेत, हा तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीतला फरक आहे.

* टीकाकारांच्या मते कामगिरीच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवाद व पाकिस्तानच्या मुद्दय़ाकडे निवडणूक केंद्रित झाली आहे का?

माझ्या मते मूळ मुद्दा पाकिस्तान हा नसून राष्ट्रीय सुरक्षा हा आहे. जे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पाकिस्तानशी जोडत आहेत, त्यांची त्यातून बौद्धिक दिवाळखोरी दिसते. मतदारांमध्ये राष्ट्रवादाची भावना असेल तर त्यात चुकीचे काय आहे?

* जर सगळे छान चालले आहे, जी उद्दिष्टे साध्य करायची ती केली आहेत, तर मग गतवर्षी ११ डिसेंबरच्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपमध्ये एवढी घबराट का होती? सवर्णाना आर्थिक आरक्षण, पंतप्रधान किसान योजना, प्राप्तिकरात ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट, असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन हे निर्णय तीन राज्यांतील पराभवानंतर घेण्यात आले, कारण भाजपला अपयशाची भीती वाटत असावी..

तुम्ही पत्रकारांच्या नजरेतून याकडे पाहत आहात. प्रशासनाच्या बाजूने जरा बघा. आम्ही वित्तीय तूट ६ टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांपर्यंत खाली आणली. वित्तीय तूट नियंत्रणात ठेवूनच आम्ही प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा वाढवली आहे. सवर्णातील आर्थिक मागासांना आरक्षण देण्याचा निर्णय राजकीय नव्हता, समाजाच्या एका गटात नैराश्याची भावना होती. एनडीएच्या सदस्यांशी सल्लामसलत करण्यात आली होती. त्याचा निवडणुकीशी संबंध नाही.

* डाव्यांनी धर्मनिरपेक्षतेची प्रमाणपत्रे वाटत सुटू नये असे तुम्ही म्हणाला होतात, तसे भाजपनेही राष्ट्रवादी कोण आहे कोण नाही हे ठरवण्याचे कारण नाही.

जरा भी नही (कदापि नाही). भारत तेरे टुकडे होंगे असे म्हणणारे राष्ट्रवादी नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे. जे त्यांना पाठिंबा देतात तेही राष्ट्रवादी नाहीत. राष्ट्रवादाची ही माझी व्याख्या आहे. राष्ट्रवादाची कुठली व्याख्या स्वीकारायची ते मतदार ठरवतील. आम्ही म्हणू तेच राष्ट्रवादी असे आम्ही कधी म्हटले नाही.

* गेल्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गोळवलकर गुरुजींच्या, मुस्लीम हेच आपले शत्रू या भूमिकेपासून संघाला दूर नेले, पण २०१९ मध्ये परत भाजप उजवीकडे वळला आहे. तुम्ही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आहे..

यात आक्षेप काय असू शकतो हेच कळत नाही. प्रज्ञा ठाकूर या देशाच्या नागरिक नाहीत का, त्या निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत का.. काँग्रेसने हिंदू दहशतवादाच्या नावाखाली सगळ्या देशाला बदनाम केले आहे. काँग्रेसने चुकीचे चित्र निर्माण केले, साधू साध्वी यांना खोटय़ा प्रकरणात अडकवले. समझौता एक्स्प्रेस प्रकरणात न्यायालयाने सगळ्यांना निर्दोष मुक्त केले, त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही असे न्यायालयानेच म्हटले आहे, मग अडचण कुठे आहे? या प्रकरणातील जे खरे आरोपी आहेत ते कसे सुटले याची विचारणा केली जायला हवी. सीबीआयसारख्या संस्थांनी ज्यांना अटक केली होती ते कुठे आहेत.. हा देशासाठी महत्त्वाचा पश्न नाही का? त्या हल्ल्यात लष्कर ए तोयबाचा हात होता असे अमेरिकी संस्थांनीही सांगितले आहे. भारतीय तपास संस्थांचे तेच म्हणणे आहे, मग हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद या खोटय़ा संकल्पना रुजवण्यासाठी खोटे खटले दाखल करण्यात आले. यातील खटल्यांमागून खटले न्यायालयात फेटाळले गेले. आरोपी सुटले, पण माध्यमे शांत राहिली. धर्मनिरपेक्षवादी शांत राहिले. त्यामुळे हा सार्वजनिक चर्चेसाठी महत्त्वाचा विषय आहे असे मला वाटते.

* २०१७ मध्ये अजमेर स्फोटाच्या प्रकरणात आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस सरकारने सनातन संस्थेविरोधात भूमिका घेतली होती. मग साध्वींना निर्दोषत्व का बहाल करायचे?

साध्वी प्रज्ञा व स्वामी असीमानंद यांचा सनातन संस्थेशी काही संबंध नाही. त्यामुळे त्या दोन वेगळ्या बाबी आहेत. हे लोक कटकारस्थाने करण्यासाठी एकत्र जमत होते हे खोटे आहे. दोन न्यायालयांनी तसा निष्कर्ष काढला आहे.

* पंतप्रधानांनी दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत, पण २ एप्रिल २०१८ रोजीची निदर्शने व भीमा कोरेगाव प्रकरण यातून भाजपला अजून त्या समाजाने पूर्णपणे स्वीकारलेले नाही असेच दिसून येते.

असे भाजपबाबत म्हणता येणार नाही. संपूर्ण व्यवस्थेतच असंतोष माजवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. देश म्हणून आपल्याला त्याला तोंड द्यावे लागणार आहे.

* अगदी अमित शहा यांच्यापासून सर्वच जण केवळ मोदींच्या नावाने प्रचार करीत आहेत. स्वत: मोदीही त्यांच्याच नावाने प्रचार करीत आहेत. यातून लाळघोटेपणाची संस्कृती तयार होणार नाही हे कशावरून?

जर आम्ही रवीश, रवीश असे म्हणायला लागलो तर त्यातून मते मिळतील का?  काँग्रेसवाले राहुल, राहुल करीत आहेत, पण मते कुठे आहेत? मोदींचे काम मोठे आहे. त्यामुळेच लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही मोदींच्या नावावर मते मागतो हे खरे नाही. आम्ही त्यांनी केलेले काम, त्यांनी उभारलेले प्रकल्प यातून निर्माण झालेल्या विश्वासाला साद घालत आहोत.

उत्तर प्रदेशातील परिस्थितीचे मूल्यमापन माध्यमे दहा वर्षांपूर्वी तेथे अस्तित्वात असलेल्या राजकारणाच्या आधारे करीत आहेत. त्या वेळी मतदार हे मतपेढीच्या व नेत्यांच्या दावणीला बांधलेले होते. आता उत्तर प्रदेशच नव्हे तर देशात परिस्थिती बदलली आहे. आता मतदार हे नेत्यांचे बटीक राहिलेले नाहीत. मतदार त्यांचे निर्णय स्वत: घेतात. उत्तर प्रदेशात ७३ जागा मिळतील, कदाचित ७४ चा आकडाही ओलांडला जाईल, असा मला विश्वास आहे. मी पुन्हा सांगतो ७३ चे ७२ होणार नाही, उलट ७४ होतील.