केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल आणि आसाम दौऱ्यावर आहेत. बंगालमधील खडगपूरमध्ये त्यांच्या हॅलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांनी आज झारग्राममधील सभेला व्हर्चूअल माध्यमातून संबोधित केलं. या सभेमध्ये शाह यांनी, “एक काळ असा होता जेव्हा बंगाल अध्यात्म आणि स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करत होता. वंदे मातरम गाण्याने भारताला एकत्रित आणण्याचं काम केलं. आता मात्र बंगालमध्ये गुंडाराज आहे. मोदी सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहचत नाहीय. यामध्ये सर्वात मोठा अडथळा हा तृणमूल काँग्रेस सरकारचा आहे,” असा घणाघाती आरोप राज्यातील सत्ताधारी ममता बॅनर्जी सरकारवर केला आहे.

बंगालमध्ये मागील दहा वर्षांपासून तृणमूल काँग्रेसचे सरकार असून त्यांनी राज्याला पाताळापेक्षाही भयंकर अवस्थेत नेण्याचं काम केलं आहे, असा टोलाही शाह यांनी लगावला. “प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार, टोलेबाजी, राजकीय हिंसाचार, घुसखोरी असल्याने बंगालचा विकास झालाच नाही. हिंदूंना, आदिवासींना त्यांचे सण साजरे करण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागतेय, अशी स्थिती निर्माण झालीय. मोदी सरकारने मागील १० वर्षांमध्ये दीदींची सत्ता असताना ११५ हून अधिक केंद्रीय योजना आदिवासी आणि इतर गरजूंसाठी राज्य सरकारपर्यंत पोहचवल्या. मात्र या योजना तुमच्या पर्यंत पोहचल्या नाहीत. असं सरकार तुमच्या (सर्व सामान्यांच्या) काय कामाचं आहे?,” असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला.

शाह या झारग्राममधील सभेनंतर रानीबंद येथील सभेलाही व्हर्चूअल माध्यमातून संबोधित करणार आहेत. यापूर्वी त्यांनी रविवारी खडगपूरमधील रोड शोमध्ये हजेरी लावत भाजपाला मतदान करण्याचं आवाहन बंगालमधील जनतेला केलं. रविवारी शाह यांनी आसाममधील मार्गरीटा येथे प्रचारसभेला संबोधितही केलं.

आणखी वाचा- “तुम्हाला पायचं दुखणं जाणवतं पण हत्या झालेल्या १३० भाजपा कार्यकर्त्यांच्या…”; शाह यांची ममतांच्या दुखापतीवरुन टीका

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज आसाममध्ये तीन प्रचारसभा घेणार आहेत. भाजपाचे उमेदवार असणाऱ्या नबा कुमार डौली, पद्मा हजारिका आणि गणेश कुमार लिम्बु यांच्या प्रचारासाठी धाकुखाना, सौतिया आणि बारचाला विभानसभा मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत.