संतोष प्रधान

बारामती मतदारसंघात मात्र प्रयत्न फसला

भाजपला विजय प्राप्त करता आला नव्हता अशा देशातील १२० मतदारसंघांवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लक्ष केंद्रित केले होते व त्यात महाराष्ट्रातील नांदेड आणि बारामती या दोन मतदारसंघांचा समावेश होता. यापैकी नांदेड जिंकण्यात भाजपला यश आले असून, बारामतीमध्ये जोर लावूनही यश मिळू शकले नाही.

लोकसभा निवडणुकीची तयारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा भाजपला विजय संपादन करता आलेला नाही पण यश शक्य आहे, अशा १२० मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या मतदारसंघांमध्ये व्यक्तिश: लक्ष घालणार असल्याचे शहा यांनी जाहीर केले होते. तसेच यातील काही मतदारसंघांमध्ये दौरेही केले होते. त्यात महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे यांचा बारामती, तर अशोक चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नांदेड या दोन मतदारसंघांचा समावेश होता.

नांदेड आणि बारामती जिंकू शकतो, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला होता. तसे राज्यातील नेत्यांना हे मतदारसंघ जिंकले पाहिजेत, असे बजाविले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात झालेल्या मेळाव्यात बारामती यंदा जिंकायचीच, असा निर्धार शहा यांनी व्यक्त केला होता. शहा यांच्या जाहीर भूमिकेनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती जिंकण्यासाठी पक्षाची सारी यंत्रणा कामाला लावली आणि पाटील यांनी बारामतीमध्ये तळ ठोकला होता. बारामतीमध्ये प्रयत्न करूनही भाजपचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. याउलट गतवेळच्या तुलनेत सुप्रियाताईंच्या मताधिक्यात वाढ झाली.

वंचित आघाडीचाही हातभार

नांदेड जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना तयार केली होती. शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर यांचे अशोकरावांशी राजकीय वैर होते. त्यांना भाजपमध्ये आणून उमेदवारी देण्यात आली. नांदेड मतदारसंघाचा सारा अभ्यास करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या दीड लाखांपेक्षा जास्त मतांमुळे अशोकरावांचा पराभव झाला. मुस्लीम समाजाच्या मतांमुळे चव्हाणांना विजय संपादन करणे शक्य व्हायचे.

पण यंदा एमआयएमने वंचित बहुजन आघाडीबरोबर हातमिळवणी केल्याने मुस्लीम मतांचे गणित बिघडले. याबरोबरच दलित व अन्य मतेही गेली. वंचितच्या उमेदवाराला भाजपने पडद्याआडून सारी मदत केल्याचे अशोकरावांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

नांदेडमध्ये मोदी यांच्या सभेचा भाजपला फायदा झाला. बारामतीमध्येही मोदी यांच्या सभेचे प्रयोजन होते, पण ही सभा होऊ शकली नाही. याऐवजी अमित शहा यांनी बारामतीत सभा घेतली होती.

भाजपला यश मिळू शकतात, असे काही मतदारसंघ पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निश्चित केले होते. यातील अनेक मतदारसंघांमध्ये पक्षाला यश मिळाले आहे.

– अनिल बलुनी, भाजपचे माध्यम विभागाचे समन्वयक