लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज होत आहे. विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात आज मतदान सुरु आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात विदर्भामध्ये निवडणुकीच्या चांगलाच उत्साह दिसून आला. अनेक बड्या नेत्यांबरोबरच सामान्य नागरिकही रांगा लावून मतदान करतानाचे चित्र मतदान केंद्रांबाहेर दिसले. याच मतदारांमध्ये एक खास जोडपेही होते. लोकशाही दिलेला मतदानाचा सर्वोच्च अधिकार बजावण्यासाठी हे मराठमोळे एनआरआय जोडपे खास अमेरिकेहून नागपूरला आहे होते.

केवळ मतदान करण्यासाठी अमेरिकेहून नागपूरात आलेल्या कापरे दांपत्याची नागपूरभर चर्चा दिसून आली. अमृत कापरे आणि अमृता कापरे हे आपल्या तीन वर्षाच्या मुलीला घेऊन मतदान करण्यासाठी आले होते. एकीकडे मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस असं समजून मतदानाला न जाणारे नागरिक आजूबाजूला दिसत असतानाच केवळ मतदान करण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन नागपूरात आलेल्या कापरे दांपत्याचे अनेकजण कौतुक करत होते. तीन वर्षाच्या मुलीला अमृतने पोटाजवळच्या बेबी बास्केटमध्ये ठेवले होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आम्ही दोघेही मुळचे नागपूरचे असून केवळ मतदानासाठी भारतात आल्याचे सांगितले. ‘आम्ही आमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी मतदान केले आहे,’ असं या दोघांनी सांगितलं.

दरम्यान आज सात मतदारसंघांमधून एकूण ११६ उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर-वणी), काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस (वर्धा) यांचा समावेश आहे. विदर्भात राज्यातील निवडणुकांप्रमाणेच सर्वसाधारणपणे भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत रंगली आहे. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत. मतदान होत असलेल्या सातपैकी सध्या चार मतदारसंघांत भाजप, दोन ठिकाणी सेना व भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा खासदार आहे. एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सात मतदारसंघांमध्ये एकूण ११ हजारांवर सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.