सुहास सरदेशमुख

सात जण दहावीपर्यंतचे, २५ पदवीपर्यंत, तिघांची पदविका, नऊ जण उच्चशिक्षित

सोळाव्या लोकसभेत राज्यातील ४८ खासदारांपैकी सात खासदारांचे शिक्षण दहावी आणि दहावीपेक्षा कमी झाले आहे. चार खासदार बारावीपर्यंत शिकलेले आहे. उरलेल्या २५ खासदारांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले होते. तिघांनी बांधकाम व्यावसायिकाची पदवी मिळविलेली होती आणि नऊ जण उच्चशिक्षित होते.

दहावीपर्यंत शिकलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे हंसराज अहिर हे एकमेव खासदार नंतर मंत्री झाले. अहमदनगरचे दिलीप गांधी यांचे शिक्षणही दहावीपर्यंतचेच होते. माढय़ातील विजयसिंह मोहिते पाटील यांचेही शिक्षण तसे दहावीपर्यंतचेच. पण राजकारणातला दबदबा मोठा. मावळ मतदारसंघातील श्रीरंग अप्पा बारणे यांचे शिक्षणही दहावीपर्यंत झाले होते. हा मतदारसंघ यावेळी लक्षवेधी ठरतो आहे. मावळमधून पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी, परभणीचे संजय जाधव आणि रायगडचे अनंत गीते यांचेही शिक्षण दहावीपर्यंतच झालेले. अर्थात शिक्षणाचा आणि लोकसंग्रह गोळा करण्याचा तसा संबंध येत नाही. लोक फक्त शिक्षणावर प्रेम करत नसतात. पण शिकलेला माणूस जरा अधिक काम करतो, असा मानणारा एकही वर्ग मतदारांमध्ये असतो. बारावीपर्यंत शिकलेल्या खासदारांमध्ये सांगलीचे संजयकाका पाटील, शिर्डीचे सदाशिव लोखंडे, शिरूरचे शिवाजीराव अढळराव पाटील आणि ठाण्याचे राजन विचारे यांचा समावेश आहे.

तुलनेने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या खासदारांमध्ये लातूरच्या सुनील गायकवाड यांचा क्रमांक वरचा होता. राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारितेचेही पदवी मिळविलेली होती. तशी पीएच.डी. मिळविणाऱ्या खासदारांमध्ये किरीट सोमय्या यांचेही नाव आहे.  स्थापत्य अभियांत्रिकीचे पदविका मिळविणारे दोन खासदार सोळाव्या लोकसभेत होते. त्यात नाशिकचे हेमंत गोडसे आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांचा समावेश आहे. तर हातकणंगले मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदविका मिळविलेली होती.

प्रीतम मुंडे, हिना गावित, श्रीकांत शिंदे, सुभाष भामरे ही डॉक्टर मंडळी सोळाव्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून कार्यरत होती. प्रा. रवींद्र गायकवाड, ए. टी. नाना पाटील, विनायक राऊत हेदेखील उच्चविद्याविभूषित. मात्र, राजकारणाचे निकष वेगळे असतात. इथे उच्चशिक्षित माणसाला एक अर्धशिक्षित माणूस चितपट करून जातो. आता पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल होऊ लागले आहेत. संपत्तीसह शिक्षणाचाही तपशील एखाद्या रकान्यात नोंदवला जातो. त्याचा उपयोग होत असेल, असे उगाच मतदारांना वाटते. त्यामुळे काही कार्यकर्ते असा तपशील गोळा करतात. निखिल चेन्नशेट्टी नावाच्या माहिती अधिकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांने वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवली आहे. त्यातील शिक्षणाचे संदर्भ तो उलगडून दाखवत असतो. तो म्हणाला, ‘अधिक शिकलेले उमेदवार असते तर चांगलेच आहे. कारण देशाचा कारभार हाकताना जगाचाही आवाका त्यांना माहीत व्हावा लागतो. ते कळणारे लोकप्रतिनिधी असावे म्हणून अशा प्रकारची माहिती काढली.’