मोदी-शिवसेनेने भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान

औरंगाबाद : शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू आपल्या शापामुळे झाला, असे विधान करणा-या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बाबतची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेने स्पष्ट करावी, असे आव्हान एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवैसी यांनी येथे दिले. वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शहीद करकरे यांना उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपले बहुतांश भाषण टीका करून टाळ्याखाऊ करण्यापेक्षा मतदान केंद्रावर बूथ कार्यकर्त्यांनी काय करावे आणि मतदान कसे वाढवावे, याचाच कानमंत्र देण्यावर भर दिला. आपल्या वीस मिनिटांच्या भाषणात आंबेडकर यांनी एकदाच केवळ मोदी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका केली.

मोदी खोटे बोलतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आणि अशोकराव चव्हाण यांनी शंभर कोटी रुपये वाटले आहेत, अशा शब्दात आंबेडकर यांनी टीका केली.

ओवैसी यांनी मात्र साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून भाजपने उमेदवारी दिल्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. काँग्रेसवरही टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची भाषा करणा-या काँग्रेसला अजूनही ते का जमले नाही, असा प्रशद्ब्रा ओवैसी यांनी केला. प्रज्ञासिंह यांनी केलेले विधान हे भारताचे शहीदपुत्र हेमंत करकरे यांचा अपमान असून आता मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले.