देशभरामध्ये चर्चेत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे.  दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व जागांचे कल हाती आले आहेत. सध्या सत्तेत असणाऱ्या ममता बॅनर्जींच्या तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळतानाचे चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र पक्षाचा पराभव झाल्यास प्रदेशाध्यक्ष म्हणून ती आपली जबाबदारी असेल असं म्हटलं आहे. एकंदरितच पाचही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निकालांवरुन पराभवाची जबाबदारी स्वत:वर घेत विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना देण्यात येत असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे. काँग्रेसने राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक संघवी यांनी ट्विटरवरुन भाजपावर निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं भाजपाचं आव्हान परतवून लावतं दणदणीत मुसंडी मारली आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये सत्तांतराची लाट बघायला मिळाली आहे. तामिळनाडूतील मतदारांनी द्रमुकच्या हाती सत्ता सोपवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. द्रमुक १३९ जागी आघाडीवर आहे. तामिळनाडूत बहुमताचा आकडा ११८ इतका आहे. दुसरीकडे केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन नवा इतिहास नोंदवला आहे. विजयन यांना सलग दुसऱ्यांदा सत्तेची संधी मतदारांनी दिली आहे. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ ९२ जागांवर आघाडीवर आहे. तर तिकडे पुदुचेरीत अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही. पुदुचेरीत बहुमतासाठी १६ जागां आवश्यक असून, सध्या भाजपा ९, तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये मात्र, भाजपाने आपली सत्ता राखली आहे. सध्या भाजपाने ७७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४८ जागांवर आघाडीवर आहे. यावरुन सांघवी यांनी ट्विटरवरुन, “आसाम आणि पुदुचेरीमधील कामगिरीचं १०० टक्के श्रेय मोदी आणि शाह यांना दिलं जात आहे तर घोष (पश्चिम बंगाल), एआयएडीएमके (तामिळनाडू) आणि श्रीधरन (केरळ) यांना पराभवासाठी दोष दिला जातोय,” असं म्हटलं आहे.

अन्य एका ट्विटमध्ये सांघवी यांनी, “पश्चिम बंगालमधील निकाल अनेक कारणांनी खास आहेत. भाजपाला आलेला माज उतरवणारा हा निकाल आहे. केवळ पैसा फेकून निवडणूक जिंकता येत नाही हे दाखवून दिलं. स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा मुद्दा महत्वाचा ठरतो. ध्रुविकरणाला एक सीमा असते. चार भिंतींमध्ये बसून गोष्टींबद्दल शक्यता व्यक्त करणं धोकादायक ठरु शकतं,” असं म्हटलं आहे.

पाचही राज्यांत सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये चुरस बघायला मिळाली. मात्र, नंतर चित्र एकतर्फी होत गेलं. बंगालप्रमाणेच केरळमध्ये पुन्हा एकदा पिनराई विजयन मुख्यमंत्री होताना दिसत आहे. तर आसाममध्ये भाजपाने घरवापसी केल्याचं स्पष्ट दिसत आहे. तामिळनाडूमध्ये मात्र सत्तांतराला मतदारांनी कौल दिला आहे. पुदुचेरीत भाजपा आघाडीवर असली, तरी दुपारी चार वाजेपर्यंत चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं नव्हतं.