मंडय़ा

कर्नाटकमधील वोंकलिंगबहुल मंडय़ा मतदारसंघात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल विरुद्ध अपक्ष सुमनलता असा सामना आहे. सुमनलता या कर्नाटकमधील प्रसिद्ध अभिनेते दिवंगत अंबरीश यांच्या पत्नी आहेत. विशेष म्हणजे अंबरीश येथून १९९८ ते २००९ या काळात ते तीन वेळा खासदार होते. स्थानिकांमध्ये ते लोकप्रिय होते. सुरुवातीला जनता दल नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. मंडय़ा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना कावेरीचे पाणी मिळावे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. हाच मुद्दा सुमनलता यांनी प्रचारात घेतला आहे. गेल्या वेळी येथून देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने या मतदारसंघात विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील सर्वच आठ जागा जनता दलाने जिंकल्या आहेत. देवेगौडा कुटुंबाची या जिल्ह्य़ात ताकद आहे. या ठिकाणी भाजपने सुमनलता यांना पाठिंबा दिला आहे, मात्र त्यांचे फारसे बळ येथे नाही. काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते मदत करतील अशी सुमनलता यांना अपेक्षा आहे.  राज्यात काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची आघाडी आहे.