16 October 2019

News Flash

‘शिट्टी’साठीचे अखेरचे प्रयत्न व्यर्थ

बविआचा पुनरावलोकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला

बविआचा पुनरावलोकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला

पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी या पक्षाला शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळावे म्हणून बहुजन विकास आघाडीने पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेली पुनरावलोकन फेरयाचिका पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्दबातल ठरवली आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीला बहाल केलेल्या ‘ऑटोरिक्षा’ या निवडणूक चिन्हावर समाधान मानावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज घेण्याच्या अखेरच्या दिवशी १२ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बहुजन महापार्टी या पक्षाचे उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याचे उल्लेख करून या पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आरक्षित केलेले ‘शिट्टी’ हे चिन्ह पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये मुक्त चिन्ह करण्याला नकार दिला. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने प्राधान्यक्रमाने मागणी केलेले शिट्टी हे चिन्ह नाकारून या पक्षाला ऑटोरिक्षा हे चिन्ह देण्यात आले.

बहुजन विकास आघाडीला ऑटोरिक्षा हे चिन्ह दिल्यानंतर ज्या तरतुदीच्या आधारे निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय दिला होता, त्याबाबत हरकत घेऊन यासंदर्भात निवडणूक कायद्यातील इतर तरतुदींचा उल्लेख करून या पक्षांनी निवडणूक आयोगाकडे या निर्णयाचे पुनरावलोकन करण्यासाठी फेरयाचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यासंदर्भात पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरयाचिका दाखल करण्याचे सूचित केले होते, त्या अनुषंगाने बहुजन विकास आघाडीचे सचिव उमेश नाईक यांनी १४ एप्रिल रोजी पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती.

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. सुधीर गुप्ता यांनी बहुजन विकास आघाडीचे तर अ‍ॅड. धर्मेद्र भट यांनी बहुजन महापार्टीच्या वतीने युक्तिवाद केला. पालघरच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेत बहुजन महापार्टी तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तसेच वैध उमेदवारांची यादी प्रकाशित झाल्याने बहुजन महापार्टी हा पक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्याच्या निर्णयावर निवडणूक निर्णय अधिकारी ठाम राहिले. त्यामुळे बहुजन महापार्टी या पक्षासाठी आरक्षित केलेले शिट्टी हे निवडणूक चिन्ह खुले करण्यास नकार देण्यात आला. या संदर्भात राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे फेरविचार करणारी याचिका दाखल करण्यात आली असल्याने त्या स्तरावर विचार होऊ  शकेल, असे नमूद करून

बहुजन विकास आघाडी या पक्षाला दिलेले ‘ऑटोरिक्षा’ हे निवडणूक चिन्ह बदलल्यास पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नकार दिला.

First Published on April 16, 2019 3:10 am

Web Title: bahujan vikas aghadi not to get whistle symbol