नामदेव कुंभार, बार्शी

सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटीच्या प्रवाशांना बुधवारी सोलापूरमध्ये मनस्तापाचा सामना करावा लागला. दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होणार असून मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि अन्य निवडणूक साहित्य पोहोचवण्यासाठी एसटी बस गाड्यांचा वापर केला जात आहे. ऐन सुट्टीच्या कालावधीत डेपोत बस नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. विदर्भातील तीन, मराठवाड्यातील सहा तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर अशा दहा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. बुधवारी निवडणूक साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी बसचा वापर करण्यात आला. याचा फटका सोलापूर, उस्मानाबाद, बार्शी, पंढरपूर, कुर्डुवाडी, बीड, जालना या भागातील गाड्यांना बसला. एकादशीनिमित्त विशेष बसगाड्याही सोडण्यात आल्या. त्यामुळे गाड्यांची संख्या आणखी कमी झाली आणि प्रवाशांच्या हालात भर पडली.

सोलापूरमधील बार्शी डेपोमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत एसटी बसच नव्हती, अशी तक्रार प्रवासी करत होते. या डेपोमधील कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली. पंढरपूर डेपोमध्ये ९० ते १०० एसटी बस आहेत. त्यापैकी ४८ एसटी निवडणुकीसाठी गेल्या आहेत. एकादशी आणि त्यात सुट्टी. त्यामुळे गर्दी खूप आहे. जागेसाठी लोकामध्ये भांडण होत आहेत.

५५ वर्षीय श्यामसुंदर मदने सकाळी ९ वाजल्यापासून बार्शी स्थानकात आहेत. जवळच असणाऱ्या कळंबला त्यांना जायचे होते. वारीसाठी पंढरपूरला गेले होते. ‘पाच तास होत आले. बस मात्र मिळाली नाही. निवडणुकीतुन आम्हाला काय मिळणार. नुसता मनस्ताप. निवडणुकीनंतरही आणि आता असाही’, असे म्हणत श्यामसुंदर यांनी संताप व्यक्त केला.

एसटीचे एप्रिल महिन्यातील गर्दीचे नियोजन लोकसभा निवडणुकीमुळे बिघडल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांत निवडणूक होत असून त्या-त्या भागात विविध सरकारी कामांसाठी १० हजार बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात तीन ते चार दिवस बस गाडय़ांचा वापर निवडणूक कामांसाठी होणार असल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेला मनस्ताप सहन करवा लागत आहे.