‘एनडीए’तील ३६ घटक पक्षांचा एकमुखी पाठिंबा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा केंद्रात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच (एनडीए) सरकार स्थापन होण्याची खात्री बाळगत मंगळवारी तब्बल ३६ घटक पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर एकमुखी विश्वास व्यक्त केला.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी रात्री ‘एनडीए’ घटक पक्षांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनात या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने केलेल्या विकास कामांबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले!

बिगरभाजप आघाडी बनवण्यासाठी गेला आठवडाभर विरोधी पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तसेच मतदानोत्तर चाचण्यांनी ‘एनडीए’ आघाडीला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर भाजपने घटक पक्षांशी ‘समन्वय’ साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच भाग म्हणून घटक पक्षांच्या नेत्यांसाठी दिल्लीत अशोका हॉटेलमध्ये स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. या

अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक पक्षांना आश्वस्त केले. ‘एनडीए म्हणजे निव्वळ आघाडी नाही, माझे ते कुटुंबच आहे. ‘एनडीए’तील घटक पक्ष भारताच्या वैविध्यतेचे प्रतिनिधित्व करतात. त्याद्वारे भारताच्या विकासाचे लक्ष्य गाठता येणे शक्य होईल. एनडीए आघाडी प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अत्यंत योग्य आघाडी आहे. या आकांक्षांच्या पूर्तीतूनच देशाची प्रगती होऊ शकते’, असे विचार मोदी यांनी मांडल्याचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी स्नेहभोजनानंतर पत्रकारांना सांगितले.

मोदी सरकार राष्ट्रवाद, सुरक्षा आणि विकास या तीन सूत्रांच्या आधारे गेली पाच वर्षे कार्यरत राहिले. हेच धोरण पुढे कायम राखले जाईल. देशाला प्रगीतपथावर नेण्यासाठी १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य गाठले जाईल. दहशतवादाविरोधातील लढाईसाठी जागतिक स्तरावर भारत अधिक आक्रमकपणे प्रयत्न करील, अशा विविध मुद्दय़ांवर आधारित विकास कार्यक्रमांचा ठराव एकमताने संमत करण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

सत्ता मिळवण्याचे ध्येय आम्ही कधीही बाळगलेले नाही. देशाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी कार्यरत आहोत, असे मोदींनी घटक पक्षांच्या नेत्यांना सांगितल्याची माहिती लोकजनशक्तीचे प्रमुख रामविलास पासवान यांनी दिली. घटक पक्षाच्या नेत्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. मोदींच्या पाच वर्षांतील मेहनतीमुळे आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळेच विकास कामे झाली आहेत. यावेळी मोदींची लाट नव्हे तर मोदींची त्सुनामी आली आहे, असे पासवान म्हणाले.

काँग्रेसच आघाडीचे सरकार चालवू शकते असा अनेकांचा समज होता पण, गेल्या पाच वर्षांत मोदींनी अत्यंत यशस्वीपणे एनडीएच्या आघाडीचे सरकार चालवू दाखवले आहे, अशा शब्दांत पासवान यांनी मोदींचे कौतुक केले.

या स्नेहभोजनाला शिवसेना, अण्णा द्रमुक, अकाली दल या प्रमुख प्रादेशिक पक्षांसह ३६ घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. अन्य तीन पक्षांनी भाजप आणि ‘एनडीए’ला समर्थन देणारे पत्र पाठवले असल्याची माहितीही राजनाथ सिंह यांनी दिली.

अखेर उद्धव ठाकरे आले!

भाजपने स्नेहभोजनासाठी तयार केलेल्या निमंत्रण यादीत सर्वप्रथम शिवसेनेचे नाव होते. मात्र, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबद्दल सांशकता व्यक्त केली जात होती. मोदींचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी वाराणसीत झालेल्या शक्तीप्रदर्शनास उद्धव ठाकरे सहभागी झाले होते पण, स्नेहभोजनाला फक्त शिवसेनेचे नेते सुभाष देसाई प्रतिनिधी म्हणून येणार असल्याची चर्चा होती. अखेर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य  ठाकरे आणि सुभाष देसाई या तिघांनीही या बैठकीस हजेरी लावली.

जातीय समीकरणांऐवजी गरिबी हटविण्यावर भर हवा

जातीय समीकरणांवर भर देणारे राजकारण करण्याऐवजी गरीबी दूर करण्यासाठी भर हवा, असे मत पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केले. २०२२ साली देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तोवर हा देश समर्थ आणि प्रगत करण्याचा आमचा संकल्प आहे, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Belief in modis leadership
First published on: 22-05-2019 at 01:44 IST