20 September 2020

News Flash

मी उमेदवार : ईशान्य मुंबई

भांडुप, विक्रोळी, घाटकोपरमध्ये अनेक झोपु योजना रखडल्या आहेत. ते मार्गी लावण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

प्रत्यक्ष काम करण्यावर विश्वास

संजय दिना पाटील, राष्ट्रवादी

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत खासदारांच्या कामगिरीबाबत काय सांगाल?

विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्व द्रुतगती महामार्गालगत केंद्र शासनाच्या ताब्यातील १६०० एकर मिठागराच्या जमिनीवर पाच लाख परवडणारी घरे बांधणार, भांडुप-कांजूरमार्ग येथील बंद कंपन्यांच्या जागेत आयटी झोन उभारून एक लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार, ही वचने दिली होती. काय झाले त्या वचनांचे? पाच वर्षांत साधा पत्रव्यवहारही सोमैया यांनी केला नाही. आयटी झोनचेही तेच झाले. नुसत्या थापा मारून मते मिळवली. भांडुप, विक्रोळी, घाटकोपरमध्ये अनेक झोपु योजना रखडल्या आहेत. ते मार्गी लावण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

मुंबईतील सर्वात महत्त्वाचा रेल्वे किंवा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी योजना काय आहे?

शहरात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे हे लक्षात घेऊन सुखकर प्रवासासाठी लोकलसंख्येत त्यातही जलद लोकलच्या फेऱ्या, जादा थांबे, स्थानके वाढवण्यासाठी प्रयत्न करेन. अपंगांसाठी राखीव डब्यांची व्यवस्था आहे; पण ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आसनव्यवस्था अपुरी पडते. ती वाढवण्यासोबत महिलांसह विद्यार्थ्यांसाठी राखीव डबा असावा यासाठी प्रयत्न करेन. महिलांसाठी राखीव डब्यात २४ तास पोलीस बंदोबस्त असणे ही काळाची गरज आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी फक्त रुंदीकरण हा एकमेव पर्याय नाही. येथील लालबहादूर शास्त्री मार्ग अनेक ठिकाणी फक्त अवैध पार्किंगमुळे चिंचोळा होतो. त्यामुळे ठिकठिकाणी पायाभूत सुविधा म्हणून वाहनतळ उभारण्यासाठी आणि तेथेच वाहने उभी करण्यासाठी आग्रही भूमिका घेईन.

तुम्हालाच लोकांनी मते का द्यावीत?

जनतेने विश्वास ठेवून माझे वडील दिना बामा पाटील, आई मनोरमा, भाऊ कमलाकर, वहिनी प्रमिला आणि मला नगरसेवक, आमदार, खासदार म्हणून निवडून दिले. आम्ही लोकप्रतिनिधी झालो तरी राजकारण न करता, जाती-धर्म, श्रीमंत-गरीब हा भेदभाव न करता फक्त समाजसेवा केली. माझ्या मुलीसह पुतण्या, सून अशी तिसरी पिढी सध्या राजकारणात, समाजसेवेत सक्रिय झाली आहे. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्यावर माझा विश्वास आहे.

पुढील पाच वर्षे कोणती कामे करणार? 

सर्वप्रथम संपूर्ण ईशान्य मुंबईत रखडलेल्या झोपु योजना मार्गी लावणार. रेल्वे प्रवास सुखकर व्हावा यासाठी आवश्यक ते बदल करून घेणार. ठिकठिकाणी वाहनतळ उभारण्यावर तसेच अवैध पार्किंग होणार नाही, यावर भर देणार. जुने पादचारी पूल काढून नवे उभारणार. आरोग्याचा अधिकार कायदा अस्तित्वात आणून तो लागू करून घेणार. याशिवाय मिठागर जागा, बंद कंपन्यांच्या उपलब्ध जागेचा जनतेसाठी विविध योजना, उपक्रमांसाठी उपलब्ध करून घेणार.

सोमय्यांच्या कामांचा फायदा

मनोज कोटक, भाजप

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात लोकांना उपयुक्त ठरतील अशी कोणती कामे झालीत?

आमच्यात पक्षाचे किरीट सोमय्या यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना गेल्या पाच वर्षांत मुंबईत सर्वाधिक विकासकामे केली आहेत. उपनगरीय रेल्वेवर होणारे अपघात रोखण्यासाठी ४२५ फ्लॅटफॉर्मची उंची वाढविणे असो वा १२ डब्यांच्या सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या करण्यासाठी ११२५ कोटी रुपयांचा प्रकल्प सोमय्यांच्या प्रयत्नांमुळेच मंजूर झाला. मुलुंड- गोरेगाव लिंक रोडसह अनेक रस्ते विकास प्रकल्प तसेच विद्याविहार, विक्रोळी येथे मध्य रेल्वेवर उड्डाणपूल, झोपडपट्टीतील लोकांसाठी १० हजार शौचालये, १२७ शाळांना संगणक वाटप अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून त्याचा लाभ आम्हाला निश्चित होईल.

मुंबईतील विशेषत: मतदारसंघातील रेल्वे किंवा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी काही योजना आहे का?

वाहतूक कोंडी ही मुंबईतील सर्वात गंभीर समस्या असून ती सोडविण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतून शहरातील वाहतुकीवर परिणामकारक ठरणारा ‘मुंबई ट्रॅफिक मोबिलिटी प्लॅन’ तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर असेल. रेल्वे स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुलुंड, घाटकोपर अशा काही स्थानकांच्या परिसरात ठाण्याप्रमाणे ‘सॅटिस’ प्रकल्प उभारणार आहे. तसेच काही ठिकाणी भू्मिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. मतदारसंघातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली जंक्शन, कांजूरमार्ग, घाटकोपर आणि छेडानगर या जंक्शनवरील वाहतूक कोंडी दूर करणार असून  मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा माझा मानस आहे.

तुम्हालाच लोकांनी का मते द्यावीत?

भाजपाचे लोकप्रतिनिधी नगरसेवकापासून खासदापर्यंत कोणत्याही पदावर असले तरी सातत्याने लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत असतात. एक नगरसेवक म्हणून मी गेल्या काही वर्षांत मुंबईकरांची सेवा केली. लोकसभा निवडणूक लढवत असतानाही मी पुढील पाच वर्षांच्या विकासकामांचा आराखडा माझ्या संकल्पपत्रमधून दिला आहे. समाजसेवेचे व्रत घेणाऱ्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणुकीत उभा असून मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लोक संधी देतील यावर माझा विश्वास आहे. भाजपा-शिवसेना युतीचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर सातत्याने लोकांची कामे करतात, प्रश्न मार्गी लावतात. शहर- राज्य- देशाचा- एकूणच समाजाचा सर्वागीण विकास हीच आमची सततची भूमिका राहिली आहे.

पुढील पाच वर्षे कोणती कामे करणार?

ईशान्य मुंबई मतदारसंघातील लोकाशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेऊन या समस्यांची सोडवणूक करणारे ‘संकल्पपत्र’ आम्ही तयार केले आहे. प्रामुख्याने मतदारसंघातून जाणाऱ्या तिन्ही मेट्रो मार्गाची कामे पूर्ण करणे, उपनगरीय रेल्वे फ्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, सर्व लोकल १५ डब्यांच्या करणे, कुर्ला टर्मिनसचे आधुनिकीकरण, घाटकोपर-अंधेरी लिंक रोडचे काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच मुलुंड कचराभूमीवर उद्यान विकसित करणे, भांडुप येथील मिठागरांच्या जमिनीवर दीड लाख घरे निर्माण करून तेथे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याची माझी योजना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:10 am

Web Title: believe in doing real work
Next Stories
1 रेल्वेत पैसे उकळणारे ७३ हजार तृतीयपंथीय अटकेत
2 मावळ्यांच सरकार पाहिजे की मावळला ‘गोळीबार’ करणाऱ्यांचं – उद्धव ठाकरे
3 उद्धव ठाकरे मी मैदानात उतरण्याची गरज नाही माझे पहिलवानच तुम्हाला भारी पडतील -शरद पवार
Just Now!
X