मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असणारे भाई जगताप हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर अमृता यांनी दिलेलं उत्तर आणि त्यावर पुन्हा जगताप यांनी साधलेला निशाणा यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. थेट राजकीय व्यक्त करण्याऐवजी ट्विटरवरुन व्यक्त होणाऱ्या भाई जगताप यांनी आता पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीर केलेल्या निवडणुक जाहीरनाम्यावरुन निशाणा लगावला आहे.


रविवारी भाजपाने जारी केलेल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक घरात एक नोकरी देणार असल्याचं नमूद केलं आहे. याचवरुन भाई जगताप यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “बंगालमध्ये भाजपा चे घोषणपत्र जारी – प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देणार… इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे?,” असं ट्विट भाई जगताप यांनी केलं आहे. भाई जगताप यांनी जरी सरकारी नोकरीवरुन टीका केली असली तरी भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक घरामध्ये एक नोकरी देण्याचं आश्वासन आहे. ही नोकरी सरकारी असेल की नाही यासंदर्भातील उल्लेख मात्र जाहीरनाम्यामध्ये सापडत नाही.

रोजगार, सामाजिक सुरक्षा बळकट करणे आणि नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीला मंजुरी इ. उपाययोजनांद्वारे ‘सोनार बांगला’ची निर्मिती करण्याचे आश्वासन देणारा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी जारी केला आहे. प्रत्येक कुटुंबात किमान एकाला नोकरी देण्याशिवाय, आयुष्मान भारत आरोग्य योजना आणि पंतप्रधान- किसान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची भाजप निश्चिती करेल, असे कोलकात्यातील सॉल्ट लेक येथे पक्षाचे ‘सोनार बांगला संकल्प पत्र’ जारी करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होतं.

भाजपाने काय आश्वासने दिली आहेत

> पीएम- किसान योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी १० हजार रुपये. या योजनेंतर्गत राज्यातील ७५ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी १८ हजार रुपयांची थकबाकी.

> कला, साहित्य व अशा इतर क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांचा सोनार बांगला निधी, तसेच नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर टागोर पुरस्कार.

> राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के आरक्षण.

> सर्व महिलांना ‘केजी टू पीजी’ मोफत शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत त्यांना मोफत प्रवासाची सुविधा.

> शाळांच्या विकासासाठी २० हजार कोटी रुपयांचा ईश्वरचंद्र विद्यासागर निधी.

> आयआयटी आणि आयआयएम यांच्या समकक्ष असलेली ५ विद्यापीठे सुरू करणे.

> कोलकात्याचे आंतरराष्ट्रीय शहरात रूपांतर करण्यासाठी २० हजार कोटी.

> प्रत्येक निर्वासित कुटुंबाच्या खात्यात दरवर्षी १० हजार रुपये थेट जमा करणे